ऐतिहासिक पौराणिक मालिका आणि चित्रपट यांचे सुगीचे दिवस (सप्तर्षि दिवाळी अंक 2025)
मी लहान होतो तेव्हा दूरदर्शनवर रामानंद सागर यांचे रामायण, तसेच चाणक्य आणि बी आर चोप्रांचे महाभारत लागायचे. तेव्हाही त्या वयातल्या आकलनाप्रमाणे मला त्याबद्दल खूप उत्सुकता आणि कुतूहल असायचे. दर शनिवारी त्या वेळेस लोकमत पेपरसोबत येणाऱ्या चित्रगंधा पुरवणीत महाभारताचे शूटिंग रिपोर्ट यायचे, तेही आवडीने मी वाचायचो. त्यावेळेस नुकतेच चित्रलेखा साप्ताहिक सुरू झाले होते, त्यातही मालिकांबद्दल माहिती यायची. नंतर चित्रलेखाचे जी नावाचे सिनेमा क्षेत्राला वाहिलेले मासिक आले परंतु ते कालांतराने बंद पडले. आता तर चित्रलेखा पण बंद झाले. नंतर दूरदर्शनला स्पर्धा सुरू होऊन खासगी वाहिन्या एका पाठोपाठ एक सुरू झाल्या. बी आर चोप्रांच्या महाभारत नंतर पुन्हा महाभारत बनवण्याचा प्रयत्न लवकर कुणी केला नाही. रामानंद सागर यांनी उत्तर रामायण आणि श्रीकृष्ण नावाची सिरीयल मात्र बनवली होती. मग मला आठवते की, स्टार प्लसवर एकता कपूरने महाभारत सुरू केले होते, परंतु तिला ते जमले नाही आणि लोकांचा रोष पत्करून बंद करावे लागले. मग प्रेक्षकांना असे वाटायला लागले की, बी आर चोप्रा व्यतिरिक्त कोणी दुसरा व्यक्ती महाभारत बनवू श...