गीतामृत: ज्ञान, कर्म आणि भक्तीचा त्रिवेणी संगम
श्रीमद्भगवद्गीता हा केवळ ७०० श्लोकांचा ग्रंथ असला, तरी त्याच्या अर्थावरून शतकानुशतके विद्वानांमध्ये चर्चा झडत आहेत. कोणाच्या मते गीता 'ज्ञानयोगाचा' पुरस्कार करते, तर कोणाला त्यात 'कर्मयोगाचा' जयघोष ऐकू येतो. काही जण मात्र 'भक्तियोगाला' गीतेचा प्राण मानतात. एकाच ग्रंथाचे इतके वेगवेगळे अर्थ का लावले जातात? हे समजून घेण्यासाठी एक गोड उदाहरण पाहूया.
कल्पना करा की, गहू, शुद्ध तूप आणि साखर या तीन मुख्य घटकांपासून एक स्वादिष्ट पक्वान्न म्हणजे कणिकेचा शिरा बनवले आहे. आता हा शिरा खाणाऱ्याच्या आवडीनुसार त्याचे वर्णन बदलेल:
गव्हाचे महत्त्व: ज्याला धान्याची चव महत्त्वाची वाटते, तो म्हणेल, "हे गव्हाचा (कणकेचा) शिरा आहे."
तुपाची ओढ: ज्याला स्निग्धता आणि सुवास प्रिय आहे, तो म्हणेल, "हा तर अस्सल तुपाचा शिरा आहे."
साखरेची गोडी: ज्याला गोडव्याची ओढ आहे, तो म्हणेल, "हा साखरेचा शिरा आहे."
येथे पदार्थ एकच आहे, पण त्यातील कोणता घटक 'मुख्य' मानायचा, हे प्रत्येकाच्या व्यक्तिगत आवडीवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते.
तंतोतंत हाच न्याय भगवद्गीतेच्या बाबतीत लागू होतो. गीतेचे तत्त्वज्ञान हे ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही घटकांनी मिळून बनलेले एक 'अमृत' आहे. तिघांचा उद्देश शेवटी एकच. कुठलाही एक योग किंवा तिघे योग पाळले तरी उद्देश एकच साध्य होतो.
ज्ञान: हा योग विवेकाची बैठक प्रदान करतो. म्हणजे सांख्ययोग चे ज्ञान आपल्याला होते, ज्यात आपल्याला आपल्या शरीरात असलेले इंद्रिय मन बुद्धी आत्मा (जीवात्मा) आणि परमात्मा या वेगवेगळ्या असलेल्या घटकांची नेहमी जाणीव (ज्ञान) होत राहते, यामुळे आपण शरीराला मी न मानता आत्म्याला मी मानून अलिप्त राहून कर्म करू शकतो आणि परमात्म्याची विलीन होण्याचा प्रयत्न करू शकतो.
कर्म: जगण्याची दिशा आणि कर्तव्य ठरवते. प्रत्येक कर्म हे फळाची अपेक्षा न करता अलिप्त राहून कर्म केल्यास, मिळालेले फळ ईश्वराला अर्पण केल्यास, तसेच सुखदुःखाच्या स्थितीत स्थितप्रज्ञ राहिल्यास जीवात्मा हा परमात्म्याला प्राप्त होतो. शेवटी ज्ञान योगातीलच उद्देश साध्य होतो.
भक्ती: हा योग जीवनात भगवंतावरील निस्सिम प्रेम आणि भगवंताकडे शरणागतीचा ओलावा निर्माण करतो. आयुष्यात जेही काही कर्म करणार ते भगवंताच्या चरणी अर्पण करत पुढे जाणे असा हा योग सांगतो. याद्वारे सुद्धा मूळ उद्देश साध्य होतो.
ज्याप्रमाणे गव्हाशिवाय शिऱ्याला आकार नाही, तुपाशिवाय स्वाद नाही आणि साखरेविना गोडी नाही; त्याचप्रमाणे या तिन्ही योगांशिवाय गीता पूर्ण होऊ शकत नाही.
अभ्यासक आपापल्या प्रकृतीनुसार आणि आवश्यकतेनुसार एका विशिष्ट योगावर अधिक भर देतात. कोणत्या योगाला प्राधान्य द्यायचे, हे 'वेळ' आणि 'प्रसंग' पाहून ठरवावे लागते. ज्याला बुद्धीचा अहंकार आहे त्याला ज्ञान हवे, जो आळसात आहे त्याला कर्म हवे आणि ज्याचे हृदय कोरडे पडले आहे त्याला भक्तीची गरज आहे. थोडक्यात सांगायचे तर, ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा समतोल म्हणजे 'गीतामृत' होय.
Comments
Post a Comment