नवे अँथ्रोपिक टूल्स: एआय मधली क्रांती
अँथ्रोपिक (Anthropic) ही अमेरिकेतील एक AI (Artificial Intelligence) कंपनी आहे. जशी OpenAI कंपनी ChatGPT चॅटबॉट बनवते, तशीच Anthropic ही कंपनी Claude (क्लॉड) नावाचा AI चॅटबॉट बनवते. (उदा. Claude 1, Claude 2, Claude 3 इ.). अँथ्रोपिक ही कंपनी जास्त सुरक्षित, जास्त विश्वासार्ह, आणि मानवाला उपयोगी असे AI बनवते. तसेच मोठ्या कंपन्या आणि डेव्हलपर्सना AI वापरायला API सुद्धा पुरवते. Claude हा अँथ्रोपिकचा AI असिस्टंट आहे: ChatGPT सारखाच. तो प्रश्नांची उत्तरे देतो, लेखन/अनुवाद करतो, कोडिंगमध्ये मदत करतो, सारांश काढतो, डॉक्युमेंट समजावतो.
पण, अँथ्रोपिकचे ‘क्लॉड कोडेक्स’ हे साधन केवळ चॅटबॉट नसून ते संगणकावरील फाईल्स वाचणे, दस्तऐवज संपादित करणे आणि फाईल्सची मांडणी करणे अशी महत्त्वाची कामे करू शकते. हे टूल स्क्रीनशॉट्सवरून स्प्रेडशीट तयार करणे किंवा कच्च्या नोट्सवरून पूर्ण अहवाल बनवण्याचे काम अत्यंत वेगाने करते. क्लॉड कोडेक्स सारखे तंत्रज्ञान थेट संगणकाचा ताबा घेऊन मानवाप्रमाणे प्रक्रिया पार पाडत असल्याने, कंपन्यांना त्यांच्या पारंपरिक सेवांमध्ये मोठे बदल करणे अनिवार्य झाले आहे. बीपीओ आणि केपीओ क्षेत्रात जिथे कायदेशीर कागदपत्रांची हाताळणी, डेटा एंट्री आणि प्राथमिक स्तरावरील विश्लेषण केले जाते, तिथे मानवी श्रमाची गरज कमी होत आहे.
याव्यतिरिक्त अँथ्रोपिकचे ‘क्लॉड लीगल अँड डेटा’ हे विशेष टूल वकील आणि कंपन्यांसाठी कायदेशीर कागदपत्रांचे विश्लेषण करण्यासाठी बनवण्यात आले आहे. यामुळे कायदेशीर आणि कॉर्पोरेट प्रशासनातील मानवी हस्तक्षेप कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जगभरातील कायदेशीर संशोधन आणि करारांचे विश्लेषण करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. थॉमसन रॉयटर्स आणि आयरनक्लॅडसारख्या जागतिक कंपन्या, ज्या अनेक दशकांपासून कायदेशीर डेटा आणि विश्लेषणाच्या जोरावर आपला व्यवसाय करत आहेत, त्यांच्या अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या साधनामुळे ३० हून अधिक प्रकारच्या नोकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.
भारतीय आयटी कंपन्यांना मोठा महसूल हा प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमधील कंपन्यांच्या बॅक-ऑफिस कामामधून येतो. यामध्ये कायदेशीर करारांचे पुनरावलोकन, अनुपालन प्रक्रिया, डॉक्युमेंट प्रोसेसिंग आणि ग्राहक सेवा यांचा समावेश असतो. अँथ्रोपिकने सादर केलेली नवीन टूल्स ही नेमकी हीच कामे स्वयंचलित करण्यास सक्षम आहेत. यामुळे भविष्यात बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीय आयटी कंपन्यांना काम देण्याऐवजी एआय टूल्सचा वापर करतील, या भीतीने गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावला आहे.
अँथ्रोपिक सारख्या कंपन्यांचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे ते स्वतःचे मॉडेल स्वतः तयार करतात. बाजारपेठेत अशी अनेक स्टार्टअप्स आहेत जी दुसऱ्यांचे तंत्रज्ञान भाड्याने घेऊन सेवा देतात. मात्र अँथ्रोपिक, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपन्या मूळ पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे ते केवळ सॉफ्टवेअर कंपन्यांशीच नव्हे, तर इतर एआय स्टार्टअप्सशीही स्पर्धा करू शकतात. हे वर्षभर भविष्यात एकाधिकारशाही निर्माण करू शकते, ज्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होईल. अँथ्रोपिक कंपनीने ११ नवीन प्लगइन्स लाँच केले असून हे टूल्स व्यावसायिक कामांचे ऑटोमेशन करण्यास सक्षम आहेत. यामुळे पारंपरिक आयटी कंपन्यांच्या नफ्यावर आणि त्यांच्या मार्केट शेअरवर परिणाम होण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगाने बदलणाऱ्या प्रवाहामुळे केवळ उद्योगांचे स्वरूपच बदलत नाही, तर नोकरीच्या बाजारपेठेतील मागणी आणि आवश्यक कौशल्यांची व्याख्याही पूर्णपणे बदलली आहे. अशा परिस्थितीत, भविष्यातील रोजगाराच्या संधी टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी मानवी कौशल्यांमध्ये आमूलाग्र बदल करणे ही काळाची गरज बनली आहे. सर्वात महत्त्वाचे कौशल्य म्हणजे “एआय प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग”.
कृत्रिम बुद्धिमत्तेकडून आपल्याला हवे तसे आणि अचूक काम करून देण्यासाठी तिला योग्य सूचना देणे ही एक कला बनली आहे. आजच्या काळात केवळ तांत्रिक ज्ञान असून चालणार नाही, तर यंत्राशी प्रभावीपणे संवाद साधून त्याच्याकडून सर्वोत्तम निकाल मिळवून घेण्याचे कौशल्य असणे अनिवार्य आहे. कायदेशीर किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आता लांबलचक मसुदे लिहिण्यापेक्षा, त्या मसुद्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेल्या चुका शोधणे आणि त्याला योग्य दिशा देणे यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
‘अनुकूलनक्षमता’ म्हणजेच अडॅप्टेबिलिटी किंवा सतत नवीन शिकण्याची तयारी हे भविष्यातील यशाचे गमक आहे. तंत्रज्ञान दर सहा महिन्यांनी बदलत आहे. आज आपण जे शिकत आहोत, ते कदाचित पुढच्या वर्षी कालबाह्य ठरेल. त्यामुळे स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे आणि बदलांना सकारात्मकपणे स्वीकारणे ही काळाची गरज आहे.
दुसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे गंभीर विचार आणि विश्लेषण. कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती देऊ शकते, ती माहिती संकलित करू शकते, परंतु त्या माहितीचा संदर्भानुसार वापर करणे आणि त्यातून धोरणात्मक निर्णय घेणे हे केवळ मानवी मेंदूलाच शक्य आहे. कायदेशीर क्षेत्रात जेव्हा अँथ्रोपिकचे साधन कराराचे विश्लेषण करते, तेव्हा ते केवळ नियमांची पडताळणी करते. मात्र, त्या कराराचा मानवी संबंधांवर किंवा भविष्यातील व्यवसायावर काय परिणाम होईल, हे ओळखण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेचीच गरज भासणार आहे. त्यामुळे केवळ माहिती गोळा करण्यापेक्षा त्या माहितीचे सखोल विश्लेषण करणाऱ्या व्यावसायिकांची मागणी वाढणार आहे.
‘भावनिक बुद्धिमत्ता’ हे एक असे कौशल्य आहे जे कोणतेही यंत्र कधीही पूर्णपणे आत्मसात करू शकणार नाही. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी असलेले संबंध, ग्राहकांच्या भावना समजून घेणे, त्यांच्या समस्यांना सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद देणे आणि संघ बांधणी करणे ही कामे मानवी स्पर्शाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. भविष्यात ज्या नोकऱ्यांमध्ये मानवी भावना आणि परस्पर संबंधांना महत्त्व आहे, त्या नोकऱ्या अधिक सुरक्षित राहतील.
गुंतवणूकदारांना अशी भीती वाटत आहे की, जर एखादे एआय टूल (जसे अँथ्रोपिकचे ‘क्लॉड लीगल अँड डेटा’ ही टूल) काही सेकंदात हजारो पानांचे कायदेशीर दस्तऐवज तपासू शकत असेल आणि त्यातील त्रुटी काढू शकत असेल, तर सध्या उपलब्ध असलेल्या इतर महागड्या सॉफ्टवेअरची गरज काय? याच भीतीपोटी ही सर्व सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ही घसरण केवळ तात्पुरती नसून ती एका मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. अमेरिकन आणि भारतीय शेअर बाजारात या टूलच्या उदयानंतर माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. निफ्टी आयटी निर्देशांकात ८% पर्यंत घसरण झाली आहे. मार्च २०२० मधील कोरोना काळातील पडझडीनंतरची ही आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. इन्फोसिस, टीसीएस यांसारख्या दिग्गज आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रमी घसरण दिसून आली आहे.

Comments
Post a Comment