आकड्यांचा तमाशा आणि वास्तवातील निराशा
महागाई निर्देशांक कमी झाला म्हणे...
पण बाजारात पाऊल टाकताच,
वाढलेल्या किमतीची थापड बसते,
आणि महिनाअखेर खिसा रिकामाच का राहतो?
बेरोजगारी निर्देशांक उतरला म्हणे...
पण मग हातात पदवी घेऊन,
उभा असलेला तरुण,
आजही नोकरीची वाट का पाहत राहतो?
नोकरी नको व्यवसाय कर म्हणे...
त्या स्वप्नांना कर्जाचे ओझे जड होऊन,
बड्या 'मॉल्स'च्या आणि टॅक्सच्या धुक्याखाली,
छोटी छोटी दुकाने दिसेनाशी का होतात?
जीडीपी खूप वाढला म्हणे...
वाढला म्हणे अर्थव्यवस्थेचा आकार,
पगार मात्र तिथेच थांबला,
जगण्याच्या खर्च मग इतका का वाढला?
आनंद निर्देशांक वाढला म्हणे...
मग डोक्यावर कर्जाचं ओझं घेऊन,
हसणं हरवलेली करोडो सामान्य माणसं,
या जगातली नाही आहेत का?
दारिद्र्य रेषा सरकली म्हणे...
आकड्यांत गरिबी कमी झाली,
पण रस्त्याच्या कडेला ट्राफिकमध्ये,
भूक आजही भीक मागत उभी का राहिली?
भारतीय मेंदूंची वाहवा होते म्हणे...
आणि आयटीचं यश जगभर गाजतं,
पण त्याच आयटी दुनियेत,
भारतीयांविषयी आज द्वेष का वाढला?
खड्ड्यांनी भरलेले रस्ते,
पावसाळ्यात शहर बुडतं,
कोसळणारी झाडं, घाणेरड्या नद्या,
हे दृश्य खोटं कसं ठरतं?
हे सगळं डोळ्यांनी दिसतं,
हाडामांसात जाणवतं,
मग आकड्यांतून फुगवलेलं,
हे वेगळंच स्वप्न कुणाचं?
डोळ्यांनी दिसणारं वास्तव,
कोणत्याही चार्टमध्ये मावत नाही,
आकड्यांचा खेळ चालूच राहतो,
सामान्य माणूस त्यात मोजलाच जात नाही.
आकड्यांच्या खेळात अडकलेली सत्ता,
सत्याकडं पाहायला घाबरते.
कारण वास्तव आकड्यांत मावत नाही,
ते रस्त्यावर चालते, भिजते, झुंजते, मरते!
रोजचं जाहीर होणारं,
हे आकड्यांचं खोटं गणित,
दिशाभूल करणारा केवळ,
सोयीस्कर देखावा ठरतं.
खोटा प्रचार नको आम्हाला,
द्वेषाचं राजकारण नको.
पोटासाठी रोजगार हवा,
भाषणांचा बाजार नको.
हवेतले आकडे नकोत आता,
जमिनीवरचे परिणाम हवेत.
चार्टवरचा विकास नाही,
डोळ्यांना दिसणारा विकास हवा.
आकड्यात दिसणारे इंटॅन्जिबल यश नाही,
प्रत्यक्षात दिसणारे टॅन्जिबल बदल हवेत.
शुद्ध पाणी, खड्डेमुक्त रस्ते, रोजगार आणि शिक्षण,
हेच ठरावे विकासाचे ठोस पुरावे.
(c) निमिष्कृत
Comments
Post a Comment