भगवदगीतेचे महात्म्य काय आहे?

भगवद्गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर मानवजीवनाचे संपूर्ण मार्गदर्शन करणारा अमृतग्रंथ आहे. महाभारतातील युद्धभूमीवर, अर्जुनाच्या विषादाच्या क्षणी, स्वतः श्रीकृष्णांनी दिलेला हा उपदेश असल्यामुळे गीतेला अद्वितीय स्थान आहे.


श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व केवळ शब्दांनी वर्णन करणे कोणालाच शक्य नाही. कारण हा एक अत्यंत रहस्यपूर्ण ग्रंथ आहे. यात सर्व वेद आणि उपनिषद यांचे सार आहे. गीतेचा आशय आणि अर्थ इतका सखोल आहे की, जन्मभर सतत अभ्यास करीत राहूनही त्याचा संपूर्ण थांग लागत नाही. प्रत्येक वेळेस वाचताना नवनवे भाव उत्पन्न होत राहतात, त्यामुळे ही नेहमीच नवी वाटते.

नेहमी श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन गीता वाचून त्यावर मनन करू लागल्यास यातील प्रत्येक शब्दात मोठे रहस्य दडल्याचे प्रत्यक्ष अनुभवाला येते. भगवंतांचे गुण, प्रभाव आणि मर्म यांचे वर्णन ज्या रीतीने गीताशास्त्रात केले गेले आहे, तसे इतर ग्रंथांत सापडणे कठीण आहे. कारण इतर ग्रंथांत बहुतेक काही ना काही सांसारिक विषय आढळतात. पण भगवंतांनी गीता हे एक असे अनुपम शास्त्र सांगितले की, ज्यात सदुपदेशाव्यतिरिक्त एकही शब्द नाही.

कोणत्याही वयाच्या, वर्णाच्या (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र) व आश्रमाच्या (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास) प्रत्येक माणसाला गीताशास्त्र अभ्यासण्याचा अधिकार आहे. मात्र त्याची भगवंतांच्या ठिकाणी भक्ती व श्रद्धा अवश्य असली पाहिजे. कारण स्वतः भगवंतांनी आपल्या भक्तांमध्येच याचा प्रचार-प्रसार करण्याची आज्ञा दिली आहे. कारण, परमतत्त्व प्राप्तीचा (जीवात्मा परमात्म्यात विलीन होणे किंवा जीवात्म्याला परमात्म्याची जाणीव होणे) सर्वांना अधिकार आहे किंवा तोच सर्वांचा अंतिम उद्देश आहे.

परंतु या विषयाचे मर्म न कळल्यामुळे ज्यांनी केवळ ‘गीता’ हा शब्द ऐकला आहे, असे कित्येकजण म्हणतात की, “गीता केवळ संन्याशांसाठी आहे”. ते आपल्या मुला मुलींना या भीतीने गीता शिकवत नाहीत की, गीता शिकून आपला मुलगा घर सोडून संन्यासी होईल!

परंतु त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, “मोहामुळे क्षात्रधर्म सोडून भिक्षा मागून उदरनिर्वाह करण्यास तयार झालेल्या अर्जुनाने ज्या अत्यंत रहस्यमय अशा गीतेच्या उपदेशामुळेच जन्मभर गृहस्थाश्रमात राहून आपल्या कर्तव्याचे पालन केले, त्या शास्त्राचा असा उलटा परिणाम (सन्यासी होणे) कसा होऊ शकेल?”

म्हणून आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या माणसांनी अत्यंत श्रद्धा-भक्तीपूर्वक आपल्या मुलांना अर्थ व भावसहित गीता शिकवावी. तसेच स्वतःही तिचे पठण व मनन करून श्रीभगवंतांच्या आज्ञेनुसार साधना करण्यात तत्पर व्हावे.

वराह पुराणात 'गीता माहात्म्य' या भागात गीतेच्या पठणाचे महत्त्व सांगणारे अनेक श्लोक आहेत, जिथे भगवान विष्णू पृथ्वीला (धरणीमातेला) गीतेचे महत्त्व सांगत आहेत.

श्लोक:
गीताश्रयोऽहं तिष्ठामि गीता मे चोत्तमं गृहम्।
गीताज्ञानमुपाश्रित्य त्रींल्लोकान्पालयाम्यहम् ।।
अर्थ:
"मी गीतेचा आश्रय घेऊन राहतो, गीता हे माझे उत्तम घर आहे. गीतेच्या ज्ञानाचा आश्रय घेऊनच मी तिन्ही लोकांचे पालन करतो."

श्लोक:
योऽधीते सततं गीतां, स मुक्तो भवबन्धनात्।
न तस्य जायते शोकः, पापं नैव च लिप्यते ।।
अर्थ: जो सतत गीतेचे अध्ययन करतो, तो भवबंधनातून मुक्त होतो. त्याला कधीही शोक करावा लागत नाही आणि त्याला पाप लागत नाही.

आणखी एक प्रसिद्ध श्लोक 'महाभारत भीष्म पर्व' (गीता माहात्म्य) मध्ये श्री व्यासांनी लिहिलेला आढळतो:

श्लोक:
गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मविनिःसृता ।।
अर्थ: भगवद्गीता नीटपणे समजून घेऊन अभ्यासली पाहिजे. गीता हे सर्व शास्त्रांचे सार आहे. गीतेचा अभ्यास केला तर इतर कोणत्याही शास्त्रांची गरज उरत नाही. स्वयं भगवान श्रीकृष्णांनी (पद्मनाभांनी) उच्चारलेली असल्यामुळे तिचे महत्त्व सर्वोच्च आहे.

अध्याय 6 श्लोक 40:
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत्कश्चिद्‍दुर्गतिं तात गच्छति ।।
अर्थ: गीतेचे नित्य पठण करून त्यानुसार कर्म करणाऱ्याची कधीही दुर्गती/पतन होत नाही.

भगवान किंवा भगवंत म्हणजेच ईश्वर किंवा परमेश्वर. भगवंत म्हणजे विविध देव देवी देवता नाही, हे लक्षात घेऊन वाचल्यास सोपे होईल. विविध देव देवी देवता हे ईश्वराचे फक्त अंश आहेत, ज्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही.

गीता पलायन शिकवत नाही, तर म्हणते, “स्वधर्मे निधनं श्रेयः” म्हणजेच, आपले नियत कर्म किंवा कर्तव्य (म्हणजे धर्म) प्रामाणिकपणे करत राहूनही मोक्ष साधता येतो. गीता वाचल्याने भीती कमी होते, मन स्थिर होते आणि विवेक जागृत होतो. आजच्या तणावग्रस्त जीवनात गीता म्हणजे मानसिक औषध आहे. गीता वाचण्यासाठी संन्यासी व्हावे लागत नाही. उलट संसारात राहून कर्तव्य करतानाच आत्मज्ञान शक्य आहे हे सांगणारी गीता आहे.

भगवद्गीतेत मोक्ष प्राप्ती किंवा परमतत्त्व प्राप्तीसाठी तीन प्रमुख योग स्वतः भगवंतांनी सांगितले आहेत.

1. ज्ञानयोग.
हा विवेक व आत्मज्ञानाचा मार्ग आहे. “मी शरीर नाही, आत्मा आहे” ही अनुभूती होणे, हे ज्ञान होणे आणि त्यामुळे आसक्ती व मोह यांचा नाश होणे. शरीरात इंद्रियांच्या सर्वात जवळ मन असते, मग बुद्धी आणि त्याजवळ प्रत्येक जीवाचा स्वतंत्र आत्मा (जीवात्मा) असतो. तसेच शरीरात एक परमात्मा (ईश्वर) सुद्धा असतो. हा योग सत्य-असत्याचा विचार, आत्मचिंतन करायला लावतो. हा योग कोणासाठी योग्य आहे? विचारशील, तत्त्वचिंतक, अंतर्मुख लोक यांच्यासाठी. ज्ञानयोग म्हणजे स्वतःला (आत्मस्वरूप) ओळखणे आणि मोक्षाकडे पाऊल टाकणं म्हणजे आत्म्याला परमात्म्यात विलीन करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणं.

2. कर्मयोग.
हा निष्काम कर्तव्याचा मार्ग आहे. कर्तव्य करावे, पण फळाची आसक्ती न ठेवता, असे सांगणारा योग. कर्म ईश्वरार्पण भावनेने करणे. या योगाद्वारे संसारात राहूनही साधना करता येते. हा योग कोणासाठी योग्य आहे? गृहस्थ, कर्तव्यशील, सक्रिय लोकांसाठी. कर्मयोग म्हणजे काम करा, पण अहंकार व अपेक्षा सोडा. आसक्तीरहित कर्म करा.

3. भक्तियोग.
हा प्रेम, श्रद्धा व शरणागतीचा मार्ग आहे. ईश्वरावर निःस्वार्थ प्रेम करा. त्याचे नामस्मरण, पूजा, सेवा करा. इथे ईश्वर म्हणजे श्रीकृष्णांना विविध देव देवी देवता अभिप्रेत नाही, तर परमात्मा म्हणजे "ॐ" अपेक्षित आहे. “सर्व काही तुझ्यावर सोपवतो” अशी भावना म्हणजे शरणागती. अशी शरणागती पत्करून आपले नियत कर्तव्य करत राहणे, हाच भक्तीयोग! सर्व कर्म आणि त्याची फळे ईश्वराला अर्पण करत करत पुढे चालणे. भक्तीयोग कोणासाठी योग्य आहे? भावनाशील, श्रद्धावान लोकांसाठी आहे. ईश्वरावर प्रेम केले की मार्ग सोपा होतो. अर्थात गीतेचा उपदेश पाळून जो भक्ती करतो त्यालाच हे लागू आहे. सकाम भक्ती नव्हे तर निष्काम भक्ती इथे अपेक्षित आहे.

भगवंतांनी गीतेतील सातव्या (7:20-23) आणि नवव्या अध्यायात (9:23-30) स्पष्टपणे सांगितले आहे की, विविध देव देवी देवता हे ईश्वराचे फक्त अंश आहेत आणि त्यांची पूजा हे फळ देतं (ते फळ पण स्वतः भगवंतच देतात) पण ते फळ नाशवंत असून जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवतं, जे मोक्ष प्राप्तीला अडथळा आणतं. त्यामुळे एकमेव ईश्वराची (माझी) भक्ती करा, जो फक्त साधे झाडाचे पान, फुल, फळ, पाणी (जे भगवंताने निर्माण केलेल्या निसर्गाचीच रूप) अर्पण केल्यानेही भक्तावर प्रसन्न होऊन त्याचे योगक्षेम पहातो.

अध्याय 7 श्लोक 15:
न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ।।
अर्थ: मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे, असे आसुरी स्वभावाचे, पुरुषांमध्ये नीच असणारे, दुष्ट कर्मे करणारे मूढ लोक मला भजत नाहीत.

अध्याय 7 श्लोक 19:
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ।।
अर्थ: पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्त्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे, असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे.

ज्ञानाने समज वाढते, कर्माने जीवन शुद्ध होते, आणि भक्तीने मन निर्मळ होते. तीनही योग वेगळे नाहीत, तर एकमेकांना पूरक आहेत.

शेवटी मी आणखी काही श्लोक देत आहे, जे गीतेतील ज्ञानाचे परिपूर्णत्व सिद्ध करतात आणि ईश्वर चिंतनाचे आणि निष्काम कर्मयोगाचे महत्त्व सांगतात.

अध्याय 7 श्लोक 2:
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥
अर्थ: मी तुला (या गीतेच्या उपदेशात) विज्ञानासह संपूर्ण तत्त्वज्ञान सांगेन, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहात नाही.

अध्याय 9 श्लोक 22:
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥
अर्थ: नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

अध्याय 9 श्लोक 30/31:
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्‌ ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥
अर्थ: एखादा दुराचारी सुद्धा जर शेवटी "ईश्वरभजनासारखे दुसरे काहीही नाही", असा पूर्ण निश्चय करून मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतो, तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो. हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की, माझा भक्त नाश पावत नाही.

गीतेचे तत्त्वज्ञान हे व्यवस्थापन, नेतृत्व, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता यांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. म्हणूनच गीता हा कालातीत ग्रंथ आहे. गीता म्हणजे जीवन जगण्याची कला आहे.

लेखक: निमिष सोनार, पुणे

Comments

Popular posts from this blog

उपग्रह इंटरनेट सेवा आणि भारत

कथा: ताऱ्यांचे गांव

गुढीपाडव्याचे महत्व