गुढीपाडव्याचे महत्व

 


✅ ज्योतिषीय महत्त्व: 

👁️‍🗨️ वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे. इतर दोन मुहूर्त आहेत अक्षयतृतीया आणि दसरा! दिवाळी पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा) हा अर्धा मुहूर्त आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या साडेतीन मुहूर्तावर आपण करू शकतो. हे साडेतीन मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे दिनशुद्धी बघण्याची गरज नसते.

👁️‍🗨️ वाहन, सोने, चांदी आणि घर खरेदी करणे तसेच नवीन व्यवसाय सुरू करणे, जमीन, प्लॉट खरेदी यासाठी गुढी पाडवा हा एक उत्तम मुहूर्त आहे.

👁️‍🗨️ आपल्या राशी चक्राची सुरुवात मेष राशी पासून होते. चैत्र महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. म्हणून चैत्र हा वर्षातील पाहिला महिना आहे.

👁️‍🗨️ चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो. म्हणून या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याला चैत्र असे नाव पडले आहे.

👁️‍🗨️ या दिवशी नवीन वर्षाचे पंचांग, अभ्यासाची पुस्तके आणि पाटीवर सरस्वतीचे चिन्ह काढून त्यांची पूजा केली जाते. नंतर पंचांगातील संवत्सर फल आणि राशिभविष्य वाचले जाते.

👁️‍🗨️ संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती, जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते.

👁️‍🗨️ वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे गुढीपाडवा जर रविवारी असेल तर सूर्य हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात.

👁️‍🗨️ 30 मार्च 2024 ला रविवारी श्री शालिवाहन शके 1947 हे वर्ष सुरु होत आहे.

✅ ब्रम्हदेव आणि गुढीचे प्रतीक:

👁️‍🗨️ चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करून याच दिवशी सृष्टीला चालना दिली. त्यामुळे गुढीला ब्रम्हध्वज म्हणतात. याचा उल्लेख ऋग्वेदात आहे. पुढे "सत्य-युगाची" सुरुवात झाली.

👁️‍🗨️ ब्रम्हध्वज हे मानवी शरीरात घडणाऱ्या सर्जनाचे प्रतीक आहे. छोट्याशा धान्याला फुटलेला कोंब हासुद्धा सर्जनचे निदर्शन करतो आणि हाच तो ब्रम्हध्वज. कलश हे ब्रम्हाचे (मेंदूचे) स्थान आणि खालचा बांबू हा ब्रम्हदंड होय.

👁️‍🗨️ गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. उंच बांबूपासून काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला एखादे वस्त्र किंवा रेशमी वस्त्र, साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या बसविला जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो.

👁️‍🗨️ त्यानंतर ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

👁️‍🗨️ पाटावर पांढऱ्या रंगाचे कापड पसरवून त्यावर हळद, कुंकवानी अष्टकेनी कमळ बनवावे. त्यांनतर कमाळावर मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवून पूजा करावी. गणपतीची आराधना करावी. ‘ओम ब्रह्मणे नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विधीपूर्वक ब्रह्मदेवाची पूजा करावी.

✅ पौराणिक महत्त्व:

👁️‍🗨️ महाभारतातील आदिपर्वात अंशावतरण मध्ये एक कथा आहे की चेदी राज्याच्या वासू उपर्चार नावाच्या राजाने वारंवार पडणाऱ्या दुष्काळाला कंटाळून इंद्राची कठोर तपश्चर्या केली तेव्हा इंद्राने त्याला प्रसन्न होऊन वेळू दंड दिला आणि त्याची वस्त्रालांकृत करून पूजा करायला सांगितली, तेव्हा पासून गुढीची प्रथा पडली.

👁️‍🗨️ रामायणात सांगितल्यानुसार रावणावर विजय मिळवून प्रभू श्रीरामचंद्र याच दिवशी अयोध्येत परतले, तेव्हा त्यांचे स्वागत प्रजेने गुढ्या उभारुन आणि तोरणे बांधून केले. गुढी हे विजय, आनंद आणि मांगल्याचे प्रतीक आहे.

👁️‍🗨️ प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली ती देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले. अनेक जण या दिवशी घटस्थापना करून उपवास करतात. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याला पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने समृद्धी, सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

✅ ऐतिहासिक संदर्भ:

👁️‍🗨️ "भा" म्हणजे तेज आणि "रत" म्हणजे रममाण. अशा तेजात रममाण देशावर अनेक आक्रमणे झाली. राजा विक्रमादित्य याच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाने शकांवर ऐतिहासिक विजय मिळवला त्या विजयाचे स्मरण म्हणून "विक्रम संवत" सुरू झाले.

👁️‍🗨️ विक्रमादित्य नंतर सव्वाशे वर्षांनी पुन्हा शकांनी भारतावर आक्रमण केले त्यावेळी शालिवाहनाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. या विजयाच्या निमित्ताने शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना "शालिवाहन शक" सुरू झाली. या शालिवाहन शकात एकूण 60 संवत्सर आहेत.

👁️‍🗨️ पैठण (प्रतिष्ठान) नगरीत राजधानी असलेल्या सातवाहन राजाने जडबोजड, पराक्रमशुन्य प्रजेत आत्मतेज फुंकून प्रोत्साहित केले व त्यांच्यात चैतन्य जागृत केले तो हा दिवस. सातवाहन राजाच्या राज्यातील आजच्या गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात हीच कालगणना आजही प्रचलित आहे.

👁️‍🗨️ कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये ''युगादी'' तथा ''उगादी'' या नावाने हा दिवस साजरा केला जातो. ''पडव, ''पाडवो'' या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश ''पाडवा''. या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला. चैत्र शुध्द प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ''चैत्रपाडवा'' हे गोंडस मराठी नामकरण लाभले.

✅ गुढी पाडवा कसा साजरा करतात:

👁️‍🗨️ गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे.

👁️‍🗨️ गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृृतीची झलक दाखविणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात. त्याला "शोभा यात्रा" म्हणतात.

👁️‍🗨️ या दिवशी घराची साफसफाई करून दारासमोर रांगोळी काढली जाते. पुरुष आणि महिला पारंपरिक पोशाख घालून हा सण साजरा करतात. सगळीकडे चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण असते.

👁️‍🗨️ गुढीपाडव्याला खास महाराष्ट्रीय पदार्थांचा बेत आखला जातो. या दिवशी कुटुंब अथवा मित्रमंडळींसोबत अगदी खास  साग्रसंगीत पद्धतीत पंगतीचेही जेवण केले जाते. महाराष्ट्रीयन थाळी म्हटली की समोर येतात ते पदार्थ म्हणजे श्रीखंडपुरी, खीरपुरी, बासुंदीपुरी, भाजीपुरी, पुरणपोळी, मसालेभात, कोशिंबीर, विविध प्रकारच्या चटण्या, लोणची, पापड, कोथिंबीर अथवा अळूच्या वड्या, बटाटवडे अथवा भजी. या महाराष्ट्रीयन थाळीत सर्व प्रकारच्या चवी आणि रंगाचा समावेश असतो. जणू काही खाद्यपदार्थही आपल्या स्वाद आणि रंगातून नववर्षाचं स्वागत करत असतात.

✅ गुढीपाडवा आणि रामरक्षा स्तोत्र:

👁️‍🗨️ विष्णुसहस्त्रनाम या स्तोत्रात असा उल्लेख आहे की, आदिशक्ती भगवती पार्वतीने भगवान आशुतोष शिव शंकरांना असा प्रश्न विचारला होता की, असे कुठले नाम आहे की ज्याचा उच्चार केला असता संपूर्ण विष्णुसहस्त्रनाम पठणाचे पुण्य मिळेल? त्यावर नीलकंठ महादेव शंकरांनी असे उत्तर दिले की, 'राम' हे एकच नाम आहे ज्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. पारमार्थिक आणि प्रापंचिक कल्याण होते. संपूर्ण विष्णुसहस्त्रनाम पठणाचे पुण्य मिळते.

👁️‍🗨️ 'पद्मपुराणात' सुध्दा याचा संदर्भ आलेला आहे. राम नामाचा महिमा असलेलं हे स्तोत्र महादेवांनी पार्वतीला एकांतात सांगितले. पुढे बुधकौशिक ऋषींना स्वप्नात या स्तोत्राचा महादेवांनी दृष्टांत दिला.

👁️‍🗨️ सर्व पापांचे निरसन करणारे, पूर्व कर्माचे संस्कार बीज नष्ट करणारे असे हे राम रक्षा स्तोत्र आहे. त्यातील प्रत्येक अक्षर अन अक्षर श्रीरामाच्या नाम सामर्थ्याने पुरेपूर भारलेलं आहे. या स्तोत्राच्या पठणामुळे निर्माण होणारे शक्तिशाली स्पंदन घरातील आणि मनातील नकारात्मक विचारांना, दुष्ट शक्तींना क्षणार्धात पळवून लावतात. असा अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी हे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करून मगच रोज 11 पाठ करणे अपेक्षित आहे.

👁️‍🗨️ रामरक्षा सिद्ध करण्यासाठी, चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडवा या दिवशी सूर्योदयाला शुचिर्भूत होऊन भस्म लाऊन रामरक्षा स्तोत्राचे संकल्पपूर्वक 11 पाठ करावेत. असे रामनवमी पर्यंत रोज करावे. आपण करत असलेली कुठलीही उपासना ही गुप्त ठेवावी. त्याची वाच्यता कुठेही करू नये

👁️‍🗨️ या रामरक्षा मंत्राच्या नित्य पठणामुळे साधकाचे दुष्ट शक्तीपासून संरक्षण होते. सूक्ष्म असे संरक्षक कवच साधकाच्या शरीराभोवती तयार होते. अपघातापासून संरक्षण होते. ज्या साधकाने हे स्तोत्र सिद्ध केले आहे तो साधक इतरांसाठी देखील याचा (अर्थात विनामूल्य) उपयोग करू शकतो.


✅ गुढीपाडवा महाराष्ट्राच्या पलीकडचा:

👁️‍🗨️गुढी पाडवा हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यांमध्येही वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो:

कर्नाटक व आंध्रप्रदेश: 'उगादी'

पंजाब: 'बैसाखी'

मणीपूर: 'सजिबू चेइराओबा'

सिंधी समाज: 'चेटीचंड'


✅ गुढी पाडव्याचा संदेश:

हा सण नवे संकल्प करण्याचा, नवीन ऊर्जा घेऊन जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करण्याचा आहे. तो विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. 




Comments

Popular posts from this blog

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली

आरोग्यदायी सांबार