आरोग्यदायी सांबार
सांबार हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे जो पोषणमूल्यांनी भरलेला असतो. यात विविध भाज्या, डाळी, मसाले असतात आणि तांदळाच्या पदार्थाबरोबर याचा बरोबर वापर केला जातो. सांबार हा शब्द इडली-वडा-डोसा अशा सगळ्यांचा हक्काचा साथीदार आहे. दक्षिण भारतातील तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगण या प्रांतांतील खासीयत असलेले इडली सांबार, वडा सांबार हे पदार्थ जगभरात पोचले आहेत. तमिळ भाषेत सांबार शब्द हा विशिष्ट आमटीसाठी वापरतात. तमिळ शब्दकोश सांगतो की सांबार हा शब्द मराठी भाषेतून तमिळमध्ये आला कारण सांबार हा शब्द संभाजी राजे यांच्या नावामुळे (संभा + आहार = सांभार) पडला व त्याचे मूळ मराठी डाळीच्या आमटीत आहे. अर्थात सांबार म्हणा किंवा सांभार, त्याची व्युत्पत्ती पाहत बसण्यापेक्षा त्याची चव आणि आरोग्याचे फायदे महत्त्वाचे. तमिळनाडूचा डोसा, वडा, इडली यांचे सांभारशी असलेले नाते हे तमिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्यातील चविष्ट नाते आहे.
विविध स्वादांचा एकत्रित अनुभव देणारा सांबार एक वाटीभर खाल्ला तरी आरोग्यास फायदेशीर ठरतो.एक वाटी सांबार म्हणजे संतुलित आणि संपूर्ण आहार म्हणून ओळखला जातो.
सांबारातून आरोग्य राखण्यास महत्त्वाचे ठरणारे अँटीऑक्सिडंट्स मिळतात. वजन कमी करण्यासाठी, बॉडी डिटॉक्ससाठी सांबार खाणं उत्तम पर्याय आहे. सांबार हा रसदार म्हणजे त्यात पाण्याचं प्रमाण चांगलं असतं आणि फायबरचं प्रमाणही भरपूर असल्यानं सांबार आणि त्यासोबत खाल्ले जाणारे पदार्थ सहज पचतात. सांबार करतांना कढीपत्ता, कसूरी मेथी, कोथिंबीर यासारख्या औषधी मूल्यं असलेलेल्या वनस्पती, आरोग्यदायी मसाले, चिंचेचा कोळ, हळद, अख्खी लाल मिरची, मेथ्या दाणे हे सर्व घटक अँटीऑक्सिडंट्स असतातात. एकाच पदार्थातून विविध गुणधर्माचे घटक पोटात जातात आणि त्याचा एकत्रित फायदा आरोग्यास फायदेशीर असे अँटीऑक्सिडंट्स वाढण्यासाठी होतो म्हणून सांबार खाणं फायदेशीर मानलं जातं.
सांबारातून शरीराला प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात मिळतात. सांबारसाठी तूर डाळ वापरली जाते, जी प्रोटीनचा चांगला स्रोत आहे आणि फायबरयुक्त भाज्या असतात, जसे की दोडका, भेंडी, गाजर आणि वांगी. सांबारातील प्रोटीनमुळे भूक शमते, जास्त खाण्याची लालसा कमी होते, पोट भरल्याचं समाधान मिळतं आणि पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं आणि त्यातील फायबरमुळे पचन व्यवस्थित होतं, पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. सांबार खाल्ल्याने प्रथिनं, फायबर, झिंक, फोलिक ॲसिड, लोह, जीवनसत्त्व आणि खनिजं मिळतात. हे सर्व घटक पचन, चयापचय क्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास महत्त्वाचे असतात. सांबारमध्ये वापरलेले तमालपत्र, हिंग, जिरे आणि मेथी हे पचनासाठी उपयुक्त असतात. सांबारमध्ये भाज्यांमधून मिळणारी जीवनसत्त्वे (A, C, E) आणि खनिजे (कॅल्शियम, पोटॅशियम) शरीरासाठी उपयुक्त असतात. सांबारमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स कमी असतात, तसेच मसाल्यांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.
सांबारात शेवग्याच्या शेंगा (Drumsticks) असतात ज्या पोषणमूल्यांनी समृद्ध असतात आणि अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म प्रदान करतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, जे हाडे आणि दात बळकट करण्यास मदत करतात. या शेंगांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्त शुद्ध करतात आणि त्वचेला तजेलदार बनवतात. जीवनसत्त्व C आणि इतर पोषकतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, ताप यांसारख्या संसर्गांपासून संरक्षण मिळते. शेवग्याच्या शेंगांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते, जी मधुमेहींसाठी उपयुक्त आहे. त्यातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात.
पण हे लक्षात ठेवा की, सांबार आरोग्यदायी तेव्हाच होतो जेव्हा त्यातील घटकांचं प्रमाण सांभाळलं जातं. सांबारात भरपूर मसाले घालणं, खूप तेल वापरणं म्हणजे सांबार रुचकर करणं नव्हे. उलट अशा पध्दतीने सांबार करुन त्यातील पोषक घटक आपण नष्ट करत असतो.

Comments
Post a Comment