अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?

 


"अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?" इतक्या लांबलचक नावाचा काल 16 जानेवारीला रिलीज झालेला मराठी चित्रपट मी आज कुमार पॅसिफिक मॉलमध्ये PVR ला पहिला. चांगले मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघितले पाहिजेत. आणि हो! हा चित्रपट जुन्या पुराण्या टिपिकल मराठी सासू सून छाप चित्रपटापेक्षा वेगळा आहे!
केदार शिंदे आणि टीम, तसेच कसलेले कलाकार आहेत म्हटल्यावर चित्रपट चांगलाच असणार हा माझा अंदाज खरा ठरला. पाहिल्या प्रसंगापासून चित्रपट पकड घेतो तो शेवटपर्यंत. सर्वांचाच अभिनय अतिशय उत्तम झालेला आहे.
या चित्रपटाची कथा वेगळी आहे. आधी कधीही न वाचलेली, पाहिलेली आणि ऐकलेली. त्याबद्दल लेखकांचे अभिनंदन! आयुष्यात सर्वच काही फील गुड नसतं, आयुष्यातील सगळ्याच उपकथनकांचं हॅपी एंडिंग नसतं, असे सांगून हा चित्रपट वास्तववादी टच देतो.
घाटकोपरच्या एका सोसायटीत वडिलांच्या फ्लॅटमध्ये (राजन भिसे, निर्मिती सावंत) रहाणारे दोन्ही नोकरी करणारे मुलगा आणि सून रहात असतात (नकुल घाणेकर, प्रार्थना बेहेरे).
सून वर्क फ्रॉम होम असते. सासू सुनेचे वारंवार खटके उडतात. त्यातील काही प्रसंग विनोदी तर काही गंभीर. शेवटी मुलगा सून वेगळे रहायचा निर्णय घेतात.
इथे कथेत एक खूपच अनपेक्षित ट्विस्ट येते. ती सांगता येणार नाही.
बरं, एक विचारतो! तुम्ही घाटकोपरला पूर्वी पावसाळ्यात घडलेली एक घटना वाचली आहे का? असो. जास्त सांगू शकत नाही. ही ट्विस्ट त्याच संदर्भात आहे. तो प्रसंग (नकुल घाणेकर आणि राजन भिसे यांच्यावर चित्रित झालेला) चित्रपटातील हाय पॉइंट आहे. अतिशय छान लिहिलाय.
त्या एका घटनेमुळे सासू सुनेचे आयुष्य एकदम बदलून जाते. पण त्यांच्यातील भांडणे काही कमी होत नाहीत.
त्यानंतर आणखी एक ट्विस्ट येते. त्या ट्विस्टनंतर कथा एक वेगळे वळण घेते.
बॅकग्राऊंड म्युझिक अतिशय जबरदस्त आहे. थिएटरमध्ये इमोशनल आणि थरारक सीनमध्ये ते खूपच परिणामकारक वाटते. चित्रपटाची निर्मितीमूल्ये खूप उच्च दर्जाची आहेत.
आधुनिक टेक्नोलॉजी कथेत बेमालूमपणे मिसळून जाते. जसे की, ऑनलाइन, वर्क फ्रॉम होम, लबाड लांडगे व्हॉट्सॲप ग्रुप आणि चॅट जिपीटी (AI चा वापर लोक जीवनातील महत्वाचे निर्णय घेतांना कसा करतात).
वडा पाव आणि पावभाजी हे पण या चित्रपटातील जणू महत्वाचे पात्र. पावभाजी खातांनाचा Anuual Gathering वाला विनोद पण खासच आहे. गौतमी पाटीलवर पण विनोद केलाय बरं त्यांनी.
मिक्सर चालवताना "साखर किती बारीक करू?" "तुझ्या इतकी!" हा पण जोक मस्तच. मोलकरणीवर चित्रित झालेला!!
विनोदांमध्ये बऱ्यापैकी नाविन्य आहे. प्रसंगानुरूप ते फिट होऊन जातात.
"दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे!" आणि "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे", ही गाणी पण झकास झालीत. छान वाटतात ऐकायला. "आलो होतो काही श्वासांसाठी फक्त!" या ओळी प्रसंगानुसार अगदीच चपखल बसतात.
एका पुलावर सासू सुनेचे विनोदी कन्फेशन प्रसंग आहे. भारी जमून आलाय.
शेवटी आणखी एक ट्विस्ट आहे.
निर्मिती सावंतने दगड उचलून वास्तवमधील संजय नार्वेकर (देढ फुट्याची) अक्टिंग केलीय: "एssss"
निर्मिती सावंतचा एक्टिंगच्या बाबतीत नाद करायचा नाय!
आणि प्रार्थना बेहेरेनी तर खूपच छान ऍक्टिंग केली आहे. मागेपण मी तिच्याबद्दल लिहिले होते की तिने आपला अभिनय, वर्षानुवर्षे चालणाऱ्या निरर्थक डेली सिरीयलमध्ये वाया घालवू नये. असो.
शेवटी हा चित्रपट बागबानच्या वाटेवर जातो की काय असे वाटताना "अर्धांगिनी, पूर्णांगिनी" वाला एक छान लिहिलेला डायलॉग त्या शक्यतेला पूर्णविराम देतो.
एकूण हा एक सहज हसवणारा आणि सहज रडवणारा फिफ्टी फिफ्टी चित्रपट आहे. सुंदर कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि संगीत. माझ्याकडून या चित्रपटाला पाच पैकी साडे चार स्टार.

Comments

Popular posts from this blog

उपग्रह इंटरनेट सेवा आणि भारत

कथा: ताऱ्यांचे गांव

गुढीपाडव्याचे महत्व