भगवदगीतेतील कर्म संदर्भातील सर्व महत्त्वाचे श्लोक
2.47:
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥
अर्थ: आपल्याला फक्त कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. कृतींच्या परिणामांची चिंता करू नये. कर्मांच्या फळांची इच्छा धरू नये. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नये.
3.5:
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥
अर्थ: खरं तर कोणीही मनुष्य क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही, कारण प्रत्येक जण आपल्या स्वभावातील गुणांमुळे (प्रकृतीमुळे) कर्म करण्यास बाध्य असतो.
4.16:
अर्थ: किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिता: ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥
अर्थ: कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे, याबाबत विद्वान लोकही गोंधळात पडले आहेत. म्हणून मी तुला कर्माचे खरे स्वरूप सांगतो; ते समजल्यावर तू पापातून मुक्त होशील.
4.17:
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण: ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गति: ॥
अर्थ: कर्म काय आहे हे समजणे आवश्यक आहे, विकर्म (चुकीचे कर्म म्हणजे शास्त्र विरुद्ध वर्तन) काय आहे हेही जाणून घ्यावे लागते, आणि अकर्म (कर्मात असूनही कर्मबंधन न होऊ देणे) हेही समजून घ्यावे लागते. कारण कर्माची गती अत्यंत गूढ आहे.
4.18:
कर्मण्यकर्म य: पश्येदकर्मणि च कर्म य: ।
स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्त: कृत्स्नकर्मकृत् ॥
अर्थ: जो माणूस कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो,
तोच खरा ज्ञानी आहे. तो योगयुक्त आहे आणि सर्व कर्मे योग्य प्रकारे करणारा आहे.
4:20:
त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥
अर्थ: जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो, तो कर्मांमध्ये उत्तमप्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही.
18.5:
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥
अर्थ: यज्ञ, दान आणि तप रूप कर्म टाकणे योग्य नाही. उलट ते अवश्य केले पाहिजे. कारण यज्ञ, दान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. ही सर्व कृती व्यक्तीच्या आंतरिक आणि बाह्य शुद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.
18.7:
नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥
अर्थ: निषिद्ध आणि काम्य कर्मांचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे. परंतु नियत कर्मांचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे.
18.10:
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः
अर्थ: जो मनुष्य कुशल नसलेल्या (म्हणजेच ज्या कृती त्याच्यासाठी फायदेशीर नाहीत) कर्मांचा द्वेष करीत नाही आणि कुशल असलेल्या (आपल्यासाठी फायदेशीर ठरतील असे) कर्मात आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्त्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय.
18.8:
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥ १८-८ ॥
अर्थ: जे काही कर्म आहे, ते दुःखरूपच आहे, असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही.
18.47:
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥
अर्थ: उत्तम प्रकारे आचरिलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म (आपले नैसर्गिक स्वभाववैशिष्ट्य) श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही.
18.48:
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥
अर्थ: सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. कारण धुराने जसा अग्नी, तशी सर्व कर्मे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात.
संकलन: निमिष सोनार
Comments
Post a Comment