सदानंदची सफर

सदानंद एक कॉमन मॅन असतो. जमिनीवर काहीतरी शोधत असतो. तो वारंवार खाली वाकून बघतो.

शेजारून जाणारा त्याच्या ओळखीचा दूसरा अति-कॉमन मॅन: अरे सदानंद, हे काय चाललंय? काय शोधतोयस जमिनीवर? 

सदानंद: अहो, माझा 'आनंद' शोधतोय. मघाशी टीव्हीवर बातमी आली की देशाचा 'आनंद निर्देशांक' वाढलाय. माझा आनंद इथेच कुठेतरी पडला असेल, तोच शोधतोय!

तेवढ्यात 'साहेब' आणि त्यांचे 'चमचे' पळत येतात.

साहेब: (ओरडून) अरे, महागाई कमी झाली! महागाई कमी झाली! 

सदानंद: (चमत्कारिक नजरेने) कुठे? साहेब, कुठे कमी झाली? पेट्रोल पंपावर की भाजी मंडईत? 

साहेब: (फाईल उघडून) अरे अडाणी माणसा, बाजारात नाही. या 'एक्सेल शीट' मध्ये! बघ, हा लाल ग्राफ खाली गेलाय! 

चमचा १: होय साहेब! महागाई इतकी कमी झाली की काल मी स्वप्नात ५००० रुपयांत सोनं घेतलं! 

सदानंद: साहेब, सोने सोडा. सकाळी मला कोथिंबीर ८० रुपयांना मिळाली! 

साहेब: तुझी चूक आहे! तू 'प्रत्यक्ष' कोथिंबीर का घेतोस? तू 'डिजिटल कोथिंबीर' का घेत नाहीस? स्वस्त जिओ डेटा आहे, तिथून डाऊनलोड कर. पोट डिजीटली भरेल. त्याला म्हणतात 'स्मार्ट डायटिंग'!

सदानंद डोक्याला हात लावतो.

पुढे एक तरुण मुलगा, बंड्या, कोपऱ्यात उभा राहून लांब लांब श्वास घेत प्राणायाम करत उभा असतो.

सदानंद: अरे बंड्या, तू इंजिनिअर ना? नोकरी मिळाली का? 

बंड्या: (श्वास घेत) नाही काका, पण सरकारी आकडेवारीनुसार मी 'पूर्ण वेळ कर्मचारी' आहे. 

सदानंद: कसं काय? 

साहेब: (मध्येच घुसून) आम्ही त्याला 'नॅशनल ऑक्सिजन टेस्टर' म्हणून नेमलंय. तो दिवसभर हवेतली ऑक्सिजन लेव्हल चेक करतो. पगार मिळत नाही, पण देशाला सेवा मिळतेय ना! 

चमचा २: आणि बघा, बेरोजगारीचा दर शून्यावर आलाय! आणि ज्यांना काम नाही, त्यांना आम्ही 'स्वेच्छेने विश्रांती घेणारे नागरिक' घोषित केलंय!

सदानंद पुढे चालताना एका खड्ड्यात पडतो आणि कळवळतो.

सदानंद: आ आई गं! मोडलं माझं कंबरडं! साहेब, हे काय रस्ते आहेत? रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते? 

साहेब: (रागवून) ए, खबरदार! त्या खड्ड्याला नाव ठेवायचं नाही. तो खड्डा नाहीये. 

सदानंद: मग काय आहे? 

साहेब: तो आमचा 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'चा (पाणी साठवण्याचा) स्मार्ट प्रोजेक्ट आहे! आणि तुला माहित नाही का? खड्ड्यातून गाडी चालवल्याने 'बॅक मसाज' फ्री मिळतो! आम्ही जनतेच्या आरोग्याची काळजी घेतोय. 

चमचा ३: साहेब, ह्याला खरे तर टॅक्स लावला पाहिजे. 'अ‍ॅडव्हेंचर टॅक्स'! लोक मनालीला जातात ट्रेकिंगला, आम्ही पुण्यातच सोय केलीये!

सदानंद: बस झालं साहेब आमचा उपहास! आता मला भूक लागलीये. जीडीपी वाढलाय ना? मग मला अर्धा किलो जीडीपी खायला द्या! 

साहेब: (हसतात) वेडा आहेस का? जीडीपी खायचा नसतो, तो फक्त 'दाखवायचा' असतो! हे बघ आकडे!

सदानंद: (चवताळून) ओह! मला वाटलं पाणीपुरीच्या गाडीवरची एसपीडीपी (शेव पुरी दही पुरी) असते तसा जीडीपी हा खायचा पदार्थ आहे. मला नको तुमचे आकडे! 

सदानंद साहेबांच्या हातातली फाईल हिसकावून घेतो आणि खड्ड्यात फेकून देतो.


सदानंद: करा आता 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' तुमच्या फाईलची. 

नंतर सदानंद खांद्यावर एक पाटी घेऊन येतो. त्यावर लिहिले आहे - "वडापाव स्टॉल". तो उत्साहात आहे.

सदानंद: माझी नोकरी गेली. ठीक आहे. नोकरी नाही तर नाही, आता मी 'आत्मनिर्भर' होणार! मी वडापाव विकणार! इतरांना देणार! स्वत:ही खाणार!

तो वडापाव तळण्याची ॲक्शन करतो. तेवढ्यात 'साहेब' आणि 'चमचा १' येतात. साहेबांच्या हातात एक मोठे कॅल्क्युलेटर आहे.

साहेब: (कॅल्क्युलेटर टिक-टिक करत) थांब! सदानंद, तुला माहित नाही का? व्यवसाय करायला परवानगी लागते. 

सदानंद: साहेब, ही घ्या परवानगी. महापालिकेचे संमतीपत्र!

साहेब: अरे, पण टॅक्स भरला का? 

सदानंद: कसला टॅक्स? अजून तर पहिलं गिऱ्हाईक पण आलं नाही! 

चमचा १: ए शहाण्या! ऐक टॅक्सची यादी - 

१. वडापाव तळायचा टॅक्स

२. धूर सोडायचा टॅक्स. 

३. रस्त्यावर उभा राहायचा भाडं. 

४. आणि वडापाव खाल्ल्यावर गिऱ्हाईक चवीने हसणार, त्याचा 'हॅप्पीनेस टॅक्स' 

सदानंद: (रडकुंडीला येऊन) अहो, १० रुपयांचा वडापाव, त्यात ८ रुपये टॅक्स? मग मी काय खाऊ? तेल की कढई? गॅसचे भाव किती वाढले!

साहेब: गॅस फ्री असतो. शरीरात मोफत तयार होतो. माहीत नाही का? तू टॅक्स भर! कारण टॅक्स भरला की जीडीपी वाढतो. त्यामुळे तुझा बीपी वाढला तरी चालेल!

सदानंद (मनात): बीपीच्या गोळ्या किती महाग आहेत, माहिती आहे का? 

अचानक ढगांचा गडगडाट (आवाजाने) होतो. सदानंद घाबरतो. आजूबाजूचे सर्व जण छत्री उघडण्याचा प्रयत्न करतात, पण छत्र्या फाटक्या आहेत.

सदानंद: अरे बापरे! पाऊस सुरू झाला. आता रस्ते बुडणार! गटारं तुंबणार! 

साहेबांचे चमचे जमिनीवर लोळतात आणि पोहण्याची ॲक्शन करतात.

साहेब: (उत्साहाने) सदानंद, बघ! ही संधी आहे. तुझ्या शहराचा 'व्हेनिस' झालाय! फुकटात वॉटर पार्क! 

सदानंद: साहेब, माझ्या घरात पाणी शिरलंय! सामान वाहून चाललंय! 

चमचा २: अरे, याला 'जल-समाधी' म्हण! तू पॉझिटिव्ह विचार कर. तुला आता अंघोळीला बाथरूममध्ये जावं लागणार नाही. निसर्ग खुद्द तुझ्या बेडरूममध्ये आलाय! 

सदानंद: (वैतागून) आणि ते झाड पडलंय रस्त्यावर, त्याचं काय? 

साहेब: ते झाड पडलेलं नाही, ते 'विश्रांती' घेतंय! आणि ते झाड आमच्या सरकारने नाही, पूर्वीच्या सरकारने लावले आहे. त्यांनी झाडे नीट लावली नाहीत, म्हणून ते पडलं. तो त्या सरकारचा दोष आहे. 

सदानंद: आणि वाढलेल्या प्रदूषणाचं काय?

साहेब: एकीकडे झाडं पडल्याची तक्रार करता. दुसरीकडे प्रदूषणाच्या नावाने आम्हाला दूषणे देतात. आमच्या आकडेवारीनुसार, शहरात ३००% झाडे लावली आहेत. फक्त ती जमिनीत नाही, तर 'फाईल' मध्ये लावली आहेत.

सदानंद: फाईलमध्ये पाऊस पडत नाही, प्रदूषण होत नाही. पूर येत नाही! 

पाऊस थांबतो. सदानंद शेजारच्या दुकानातून विकत घेऊन समोसा खात असतो. तेवढ्यात चमचे एक दोरी घेऊन येतात. त्यावर गरिबीची रेषा असे लिहिले आहे. ती दोरी कमरेच्या उंचीवर धरतात.

साहेब: आता बघा जादू! देशातली गरिबी कशी गायब करतो ते बघा! 

सदानंद आणि काही गरीब वेषातले लोक दोरीच्या खाली बसलेले आहेत.

सदानंद: साहेब, आम्ही गरीब आहोत. आम्हाला रेशन द्या. 

साहेब: (चमच्यांना इशारा करत) ए, ती 'दारिद्र्य रेषा' (दोरी) खाली करा! अजून खाली! 

चमचे ती दोरी जमिनीला टेकवतात. आता सदानंद आणि बाकीचे लोक दोरीच्या 'वर' दिसतात.

साहेब: (टाळ्या वाजवत) अभिनंदन! सदानंद, आता तू दारिद्र्य रेषेच्या 'वर' आला आहेस! आता तुला गरीब म्हणता येणार नाही. 

सदानंद: पण साहेब, माझ्या खिशात आज महिना अखेरीस फक्त १००० रुपये आहेत! मागील नोकरीचे शेवटचे उरलेले. कमीत कमी रेशन तरी द्या. 


साहेब: आमचा नियम बदललाय. ज्याच्याकडे 'श्वास' आहे, तो श्रीमंत! तुला ऑक्सिजन फुकट मिळतोय ना? मग तू मध्यमवर्गीय झालास! त्यामुळे आता रेशन बंद!

निराश होऊन सदानंद पुढे जातो. एक मुलगा लॅपटॉपवर वेगाने टाइप करत बसलाय. तिथे साहेब आणि चमचे मागोमाग येतात. 

सदानंद: अरे बाळा, काय करतोयस? आयटी इंजिनिअर आहेस का? काही सॉफ्टवेअर बनवतोयस का? 

मुलगा: नाही काका, मी 'ट्रोल कर' आहे! मला एका निगेटिव्ह कमेंटचे १०० रुपये मिळतात. मी द्वेष पसरवतोय. मी ट्रोलकर, ट्रोलकर, ट्रोलकर सोशल मिडियचा राजा!

सदानंद: अरे पण हे शिक्षण आहे का? भारतीय मेंदूंची वाहवा होते, ती यासाठी का? 

साहेब: सदानंद, गप्प बस! हा 'डिजिटल रोजगार' आहे. आधी लोक हाताने दगड मारायचे, आता शब्दाने मारतात. हेच तर 'डिजिटल इंडिया'चं यश आहे! 

सदानंद: (संतापून) हा विकास नाही, हा विनाश आहे! डोळ्यासमोर पिढी बर्बाद होतेय आणि तुम्ही आकडे मोजताय?

सदानंद आता आक्रमक होतो. तो साहेबांच्या हातातला लॅपटॉप/फाईल बंद करतो.

सदानंद: बस! आता बस! हे 'आकड्यांचे खेळ' आणि हा 'बुडबुड्यांचा महाल' आपल्यालाच फोडावा लागेल. त्यांच्या चार्टमध्ये आपली भूक मावत नाही. त्यांच्या ग्राफमध्ये आपल्या व्यथा दिसत नाहीत...

सदानंद आणि इतर सामान्य माणसे मिळून साहेब आणि त्यांच्या चमच्याभोवती रिंगण करतात आणि गातात:

आम्हाला नको आकडेवारी, आम्हाला हवी भाकरी! 

आम्हाला नको स्मार्ट सिटी, आम्हाला हवी सुरक्षित वस्ती! 

आम्हाला नको द्वेषाचा आरडाओरडा, आम्हाला हवी शांतता खरी!

तुम्ही म्हणता देश बदलला, पण माझा खिसा का रिकामा राहिला? 

तुम्ही म्हणता रस्ते गुळगुळीत, मग माझा मणका का मोडला?

तुम्ही म्हणता रस्ते गुळगुळीत, मग माझा मणका का मोडला?


निमिष सोनार, पुणे 


Comments

Popular posts from this blog

उपग्रह इंटरनेट सेवा आणि भारत

कथा: ताऱ्यांचे गांव

गुढीपाडव्याचे महत्व