वास्तववादी अभिनयाचे गिरणगाव
नवीन वर्षात मी "असंभव" आणि "अगं अगं सुनबाई.." या त्या-त्या वेळेस नवीन रिलीज झालेल्या चित्रपटांचे परीक्षण लिहिले होते. आज मात्र मी एका जुन्या सिनेमांच्या गल्लीत शिरलो आणि मला वाटते आपल्या फेसबुकच्या सिनेमा गल्लीमध्ये नव्या जुन्या गल्ल्यांना भेट देण्याची मुभा आहे. आज जुन्याच एका चित्रपटाचे परीक्षण लिहित आहे, कारण तो मी आज प्रथमच पाहिला. 2010 सालात रिलीज झालेला, लालबाग परळ!
परिंदा, सत्या, ॲनिमल, किल, धुरंदर यासारख्या चित्रपटात असलेला नृशंस हिंसाचार आणि रक्तपात या चित्रपटात 2010 सालात सुद्धा होता हे बघून आज आश्चर्य वाटते. फक्त हिंसाचाराचे नव्हे तर इतरही अनेक बोल्ड विषयावरची दृश्ये अंगावर येतात. मेंदूत रुतून बसतात. "मुळशी पॅटर्न" मधले काही हिंसक प्रसंग पण असेच अंगावर येतात.
‘लालबाग–परळ’ हा मराठी चित्रपट मुंबईच्या गिरणगावातील (मिल कामगार परिसर) वास्तवावर आधारित आहे. गिरणी बंद पडल्यावर किंवा मुद्दाम बंद केल्यावर कामगारांचे आयुष्य उध्वस्त होते. बेरोजगारी, उपासमार, दारिद्र्य आणि असहायता वाढते. या परिस्थितीत काही राजकीय व गुन्हेगारी शक्ती कामगारांच्या रागाचा गैरफायदा घेतात. संघर्ष, हिंसा आणि अन्याय यांचा विळखा घट्ट होत जातो. चित्रपट कामगारांचे प्रश्न, त्यांची फसवणूक, आणि समाज–राजकारणातील सडलेली यंत्रणा ठळकपणे दाखवतो.
यात दाखवलेली धुरी फॅमिली फॅमिली ही प्रतीकात्मक आहे. म्हणजे एका कुटुंबाच्या माध्यमातून संपूर्ण लालबाग–परळच्या गिरणकामगार वर्गाचं दुःख, संघर्ष आणि असहायता दाखवली आहे.
मराठी कलाकारांबद्दल तर बोलायलाच नको. त्यांचा अभिनय हा अतिशय वास्तववादी असतो. चाळीचे व इतर लोकेशन्स अगदी परफेक्ट निवडले गेल्यामुळे हा महेश मांजरेकरचा मराठीतला "वास्तव" वाटतो. स्क्रीन प्ले चांगला लिहिलेला आहे.
जयंत पवार यांनी लिहिलेली कथा, महेश मांजरेकरचे दिग्दर्शन आणि शशांक शेंडे, वीणा जामकर, सीमा बिस्वास, अंकुश चौधरी, अनुषा दांडेकर, सिद्धार्थ जाधव, विनय आपटे, कश्मिरा शाह, सतीश कौशिक, सचिन खेडेकर, समीर धर्माधिकारी, गणेश यादव, सई ताम्हणकर यासारखे कलाकार असल्यावर भट्टी चांगली जमून येणार यात वाद नाही.
सोनी मराठीच्या "भेटी लागी जीवा" या सोनी मराठीच्या सिरीयल मधला थोडा निगेटिव्ह शेड असलेला समीर धर्माधिकारी त्याच पद्धतीने या चित्रपटातही दिसतो.
वजूद चित्रपटात वेड्यासारखा समुद्रकिनारी पळत जाणारा नाना पाटेकर आणि या चित्रपटात शेवटी शेवटी आपल्या नारु या मित्राच्या अंगावर वेगाने धावून जाणारा सिद्धार्थ जाधव, दोन्ही प्रसंग सारखेच वाटतात.
सीमा विश्वास, शशांक शेंडे आणि वीणा जामकर यांच्यातील आपली मुलगी वीणा लग्नाआधी प्रेग्नंट झाल्याचे कळल्यावर तिला शशांक शेंडेने मारणे, तिच्या अंगावर पेट्रोल ओतणे हे प्रसंग सुद्धा अंगावर शहारे आणतो. रिअल वाटतो.
या चित्रपटात कॅरमचा खेळ महत्त्वाची भूमिका बजावत राहतो.
मराठी कुटुंबांमध्ये आणि मित्रांमध्ये कॅरम खेळ 90 च्या दशकात लोकप्रिय होता असे म्हणावे की, मग महेश मांजरेकर, वास्तव, संजय दत्त, मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडियट्स यातील ते मिक्स कनेक्शन मानावे?
आणि हो! शेवटी टाकण्याऐवजी या चित्रपटात सुरूवातीलाच रेशम टिपणीसचे आयटम साँग टाकले आहे. आज वय झालेल्या या कलाकारांना सोळा वर्षांपूर्वीच्या अवतारात बघणे वेगळा अनुभव देऊन जातो.
कावळ्यातील का आणि प्रश्नार्थक का अशी शाब्दिक कोटी या चित्रपटात केली गेली आहे. असो.
ज्यांनी हा चित्रपट बघितला आहे त्यांनी आपापले मत व्यक्त करावे.

Comments
Post a Comment