सुहास शिरवळकर, स्टार हंटर्स आणि अमर विश्वास
“अमर विश्वास” ही वेब सिरीज Amazon MX Player वर 11 फेब्रुवारी 2026 ला रिलीज झाली. ही एक कोर्ट ड्रामा आणि क्राइम-थ्रिलर हिंदी वेब सिरीज आहे. एकूण 10 एपिसोड आहेत. माझ्यासाठी तरी ही एका बैठकीत बघून संपण्यासारखी नव्हती. मी अंदाजे चार दिवसात ही बघून पूर्ण केली.
ही सिरीज सुप्रसिद्ध मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्टार हंटर्स या कादंबरीवर आधारित आहे. कादंबरी जुनी असली तरी वेब सिरीज रूपांतर करताना सोशल मीडिया, सीसीटीव्ही, मोबाईल फोन, हॅश टॅग मिटू, निर्भया केस असे सगळे संदर्भ आहेत. त्यांनी आजच्या काळाला अनुसरून बदल केले असतील. मी मूळ कादंबरी वाचली नाही.
अमर विश्वास एक बुद्धिमान वकील आहे. तो मुंबईत राहतो आणि समाजात दुर्बल लोकांसाठी लढतो. एक प्रसिद्ध फिल्म प्रोड्यूसर जेसु मोमिन ची रात्री एका हॉटेलमध्ये हत्या होते. या हत्या प्रकरणात वीस वर्षीय बहर चक्रवर्तीला मुख्य संशयित म्हणून अटक होते कारण ती सकाळी हॉटेलमध्ये त्या खुनीच्या रूममध्ये खुनीजवळ झोपलेली सापडते. पण त्या सकाळी घडलेल्या एका योगायोगामुळे अमर विश्वास तिची केस स्वीकारतो आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो, ज्यात अनेक गुपितं, कारस्थाने, मीडिया-दबाव, आरोपींची भूमिका आणि न्याययंत्रणेतील गुंतागुंत दिसून येते. बहर चक्रवर्ती सारख्या आणखी दोन स्ट्रॅगलिंग ॲक्ट्रेसची उपकथा यात आहे.
कथा सरळ रेषेत आणि वेगाने पुढे सरकते. फक्त अमर विश्वासच्या लहानपणाचे थोडे थोडे फ्लॅशबॅक येत राहतात. यात उगाच फॅन्सी ट्विस्ट नाहीत. खांडेकर नावाच्या पोलिसाची थोडीशी रंजक उपकथा यात आहे. मूळ कथेचा त्याच्याशी काहीएक संबंध नसला तरी ती बघायला चांगली वाटते.
यात अनेक अनुभवी कलाकार आहेत जसे राजीव खंडेलवाल, रवी बहल, उर्वशी परदेशी, सौरभ गोखले वगैरे. दिग्दर्शक आहे शशांत शाह. सर्वांची एक्टींग अगदी चांगली झाली आहे.
खंडेलवाल आणि बहल (एकमेकांचे प्रतिस्पर्धी वकील) यांचे अभिनय पाहण्यासारखे. शेवटपर्यंत संशयाची सुई 6 पात्रांच्या अवतीभोवती आळीपाळीने फिरत राहते. खुनी कोण याचा अंदाज बांधणे खरोखर कठीण आहे. स्क्रीन प्ले छान आणि एडिटिंग क्रिस्प आहे.
ही नक्कीच बघण्यासारखी आहे. आपणही जरूर बघावी आणि आपल्याला कशी वाटली हे सांगावे.


Comments
Post a Comment