कोणती भक्ती श्रेष्ठ? सगुण की निर्गुण? भगवदप्राप्तीची कोणती पद्धत श्रेष्ठ?
भगवदगीतेतील अध्याय 12 मध्ये, श्लोक 1 ते 12 हे याच विषयाला वाहिलेले आहेत. अर्जुन विचारतो की, सगुण परमेश्वराची भक्ती करणारे श्रेष्ठ आहेत, की निराकार (निर्गुण) ब्रह्माचे ध्यान करणारे?
श्रीकृष्ण उत्तर देतात की, सगुण भक्त सर्वात श्रेष्ठ. जे मन पूर्णपणे माझ्यात लावून, श्रद्धेने माझी भक्ती करतात ते मला सर्वांत श्रेष्ठ वाटतात. कारण निर्गुण उपासना ही तुलनेने कठीण असते. निर्गुण (निराकार) ब्रह्माचे ध्यान करणारेही शेवटी मलाच येऊन मिळतात. पण, ही निराकाराची साधना कठीण असते. देहधारी माणसांना ती फार अवघड जाते. म्हणून सगुण भक्ती अधिक सोपी आणि प्रभावी आहे.
त्यानंतर भगवंत क्रमाक्रमाने भक्तीचे (परमात्मा प्राप्तीसाठी) वेगवेगळे मार्ग सुचवत जातात.
1. ज्ञानयोग: अज्ञानात कर्म करणापेक्षा ज्ञानात कर्म करणे केव्हाही चांगले. ज्ञान म्हणजे काय? भगवंत सांगतात की, आपल्या शरीरात असलेले इंद्रिय मन बुद्धी आत्मा आणि परमात्मा यांचे आपल्याला ज्ञान होणे. मी म्हणजे शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी नसून केवळ आत्मा (जीवात्मा) आहे अशी सतत जाणीव ठेवणे. म्हणजे कर्तेपणाचा त्याग. जे कर्म घडत आहेत, ते शरीर करीत आहे, मी नाही. मी फक्त आत्मा रूपाने साक्षी आहे आणि शरीरात असलेल्या परमात्म्याच्या मला दिवसेंदिवस जवळ जायचे आहे.
2. सगुण भक्ती: ज्ञानयोग जमत नसेल तर पुढची पायरी सगुण भक्ती आहे, ज्याबद्दल भगवंत काय सांगतात, ते मी आधीच लेखाच्या सुरुवातीला लिहिले आहे.
3. अभ्यासरूप योग: भगवंत पुढे सांगतात की, जर सगुण भक्ती करणे शक्य होत नसेल तर अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. "अभ्यास योग" म्हणजे भगवंताच्या नामांचे व गुणांचे श्रवण कीर्तन आणि मनन करणे. तसेच श्वासाद्वारा जप करणे आणि भगवत प्राप्ती विषयक विविध शास्त्रांचे नियमित आणि वारंवार पठण करणे, याला अभ्यास म्हणतात.
4. भगवंतांसाठी कर्म: भगवान पुढे सांगतात की, जर वर सांगितलेल्या अभ्यास या पद्धतीचे आचरण करायला जमत नसेल तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने केवळ माझ्यासाठी कर्म केल्याने सुद्धा माझी प्राप्ती होईल. "भागवत कर्म करण्याला परायण होणे" म्हणजे स्वार्थाचा त्याग करून आणि परमेश्वरालाच आपला परम आश्रय आणि परमगती समजून निष्काम प्रेम भावनेने आपल्या मनाने वाणीने व शरीराने केवळ परमेश्वराकरता सर्व कर्तव्य कर्मे करणे.
5. कर्मफलत्याग: भगवंत पुढे सांगतात की, जर भगवंतांसाठी कर्म या पद्धतीचा अभ्यासही जमत नसेल, तर फक्त एकच कर. मन आणि बुद्धी इत्यादींवर विजय मिळवून सर्व कर्मफळांचा त्याग कर. तू जे काही कर्म करतोस, खातोस, हवन करतोस, दान देतोस, तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. म्हणजे सर्व कर्मांची फळे परमेश्वराला अर्पण करणे.
Comments
Post a Comment