चिंटूचे सफेद कारनामे

रविवारची दुपार होती. दुपारचे जेवण झाल्यावर घरात एक सुखद आळस भरलेला होता. चिंटूचे बाबा, सुरेशराव, हॉलमधल्या सोफ्यावर "फक्त पाच मिनिटं डोळा लावतो" असं म्हणून मागील दोन तासांपासून घोरत होते. मंद आवाजात.टीव्ही सुरू होता. चिंटूची आई, सुप्रिया, बेडरूममध्ये पुस्तक वाचता वाचता केव्हा झोपी गेली, हे तिलाच कळलं नाही.


​आणि घरातला सर्वात महत्त्वाचा सदस्य, अडीच वर्षांचा चिंटू, मात्र जागा होता.


​चिंटूला दुपारी झोपायला अजिबात आवडत नसे. त्याला वाटायचं की झोपल्यामुळे जगातल्या महत्त्वाच्या गोष्टी जसे की, रिमोट चघळणे किंवा चप्पल फ्रीजमध्ये ठेवणे या करायच्या राहून जातात. आज त्याला घरातली शांतता खायला उठत होती. ​


त्याने हळूच पलंगावरून खाली उडी मारली. आपल्या इवल्याशा पायांनी तो हळूच हॉलमध्ये आला. बाबांचं घोरणं हे एखाद्या ट्रॅक्टरसारखं रखडत चालत होतं. चिंटूने बाबांच्या पोटावर आपलं आवडतं खेळणं 'पिचकणारा बदक' ठेवलं, पण बाबांना काहीच फरक पडला नाही. बदक त्यांच्या ढेरीवरून वर खाली होत पिचकत होता. चिंटूने टाळ्या वाजवल्या. पण थोड्या वेळाने तो बोर झाला.


​"बोअल..." (बोर) चिंटू स्वतःशीच पुटपुटला.


​तो हळूच ड्रेसिंग टेबलकडे गेला. तिथे त्याला एक मोठा पांढरा डबा दिसला. तो होता 'टाल्कम पावडर'चा डबा. चिंटूने अनेकदा आईला हा डबा वापरताना पाहिलं होतं. त्याला वाटलं, "बाबा सावळे आहेत, आई पण कधीकधी म्हणते उन्हात मी काळी पडली, मग आपण सगळ्यांना गोरे करूया!" मनात तो स्पष्ट उच्चारात विचार करत होता. पण, बोलतांना बोबला (बोबडा) बोलायचा. काय करणार? इतक्या लहान मुलांना स्पष्ट उच्चारात बोलायची परवानगी नसते ना!


" गोले गोले मुखले पे काला काला चपमा!", गाणे म्हणत ​चिंटूने आपल्या इवल्याशा हातांनी कसाबसा तो डबा उघडला.

​पहिली चाचणी स्वतःवर. त्याने डबा उपडा केला. 'भस्स' आवाज झाला, पावडर वर उडाली आणि चिंटूचं तोंड पूर्णपणे पांढरं झालं. मग त्याने आंघोळीचा साबण लावतो कशी आता पायांना पावडर लावली. आता तो एखाद्या बुटक्या निरुपद्रवी भूतासारखा दिसत होता. त्याला आरशात बघून स्वतःचं खूप हसू आलं. 


​"आता बाबा!" तो उत्साहाने ओरडला.


​तो हॉलमध्ये गेला. बाबा अजूनही आ वासून झोपले होते. चिंटूने आपली 'मोहीम' सुरू केली. त्याने बाबांच्या एका गालावर पावडर ओतली. मग कपाळावर. मग थोडी मिश्यांवर. सुरेशराव आता अर्धे साधे आणि अर्धे 'कथकली' डान्सर दिसत होते.


चिंटूचा पाय रिमोटवर पडला, चॅनेल बदलले आणि गाणे दिसायला लागले. "ए कथकली, कथकली, ए कथक कथक कथक... तू मिशी झटक, जरा पैर पटक... हवा में उड़, तू हीरा पन्ना रे..." अनिल कपूरची मुलगी रेल्वे स्टेशन वर कथकली करत होती. या गाण्यावर चिंटूने नाचून घेतले.


​पण पावडर अजूनही खूप उरली होती. 


चिंटूने विचार केला, "जमिनीला पण खिडकीतून ऊन लागतं, ती पण गोरी झाली पाहिजे."


​पुढच्या १० मिनिटांत, चिंटूने संपूर्ण हॉलमध्ये पावडरचा सडा टाकला. एक डबा संपला तेव्हा त्याने दुसरा, तिसरा सगळे पावडरचे डबे वापरले. टीव्ही, सोफा, आणि अगदी जमिनीवरही पांढरी चादर पसरली होती. हॉल आता हिमालयातील बर्फाच्छादित डोंगरासारखा दिसत होता आणि त्या डोंगरावरचा एकमेव जागृत रहिवासी होता - पांढराधोप चिंटू.


टीव्ही पांढरा झाल्यामुळे टीव्हीवर आता, "ये हंसी वादियां, ये खुला आसमान, आ आ गए हम कहां, ओ मेरी जानेजां!" हे गाणे सुरू झाले.


एखादा सीआयडी ऑफिसर "दया, ऊस कमरे में छुपा होगा वो कमीना क्रिमिनल!" असे म्हणत म्हणत दबा धरून आणि बंदूक धरून हळूहळू दुसऱ्या रूममध्ये जातो आणि एकदम बंदूक समोर करतात, त्याच स्टाईल मध्ये चिंटू आई झोपली होती त्या रूम मध्ये गेला आणि त्याने पावडरचा झाकण उघडलेला डबा बंदूक ताणतात तसं आईकडे ताणला, तेवढ्यात सुप्रियाला जाग आली. ​समोरचं दृश्य पाहून तिला हसावं की रडावं हेच कळेना. चिंटूला पाहून तिने डोक्यावर हात मारला आणि ती हॉलमध्ये आली. चिंटू सुद्धा पावडरचा डबा खाली फेकून पळत पळत तिच्या मागे टाळ्या वाजवत हॉल मध्ये आला.


​संपूर्ण घर पांढरं झालं होतं. सुरेशराव अजूनही झोपेत होते, आणि त्यांचा विनोदी चेहरा बघून त्यांच्या ढेरीवरून बदक हसत हसत खाली पडले होते आणि घरातील "हालत" बघून पिचकत पिचकत इकडे तिकडे पळत हसत होतं. आता सुरेशरावांच्या काळ्या मिश्या पांढऱ्या झाल्या होत्या, जणू काही एका झोपेतच ते म्हातारे झाले होते. 


आणि आता सोफ्यावर चढून बसलेला चिंटू, पावडरच्या रिकाम्या डब्यासोबत, उभा होता - पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण पांढरा!


​सुप्रियाने ओरडून खाली बसत म्हटलं, "अरे देवा! हे काय केलंस?"


चिंटू टाळ्या वाजवत म्हणाला, "देवाने नाही केलं. मी केलं!"


त्या आवाजाने सुरेशराव दचकून जागे झाले. त्यांनी डोळे उघडले आणि समोर पाहिलं. त्यांना वाटलं आपण स्वर्गात आलोय की काय, कारण सगळीकडे पांढरं दिसत होतं, स्वर्गातील ढगांसारखं. आणि समोर एक पांढरं भुसभुशीत बाळ उभं होतं.


​"मी मेलो की काय? आणि चित्रगुप्त इतका बुटका असतो असे कुठे वाचले नव्हते बुवा?" सुरेशराव घाबरून ओरडले.


​चिंटूने बाबांकडे बघितलं आणि टाळ्या वाजवत म्हणाला, "बाबा गोये (गोरे)... आई गोयी... चिंटू गोया... सगळं गोयं गोयं!" 


​त्याचा तो निरागस आनंद आणि सुरेशरावांचा तो 'अर्धा-म्हातारा' चेहरा बघून सुप्रियाला हसू आवरेना. तिने आधी चिंटूचा फोटो काढला आणि मग सुरेशरावांना आरसा दाखवला. तशीही ती त्यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीचा आरसा रोज दाखवायची. आज मात्र खरा आरसा दाखवला.


​त्या दिवशी संपूर्ण घराची साफसफाई करताना सुप्रिया आणि सुरेशरावांची कंबर मोडली, नाकी पांढरे नऊ आले. पण आईने पांढऱ्या साबणाने रगडून धुतलेला चिंटू मात्र आपल्या 'पराक्रमा'वर खुश होऊन शांत झोपी गेला होता.


​तात्पर्य: घरात लहान मूल शांत असेल, तर समजून जा की तुमचा साबण, पेस्ट किंवा 'पावडर' धोक्यात आहे!

Comments

Popular posts from this blog

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली

आरोग्यदायी सांबार