लॉर्ड्सवरचे हसरे फटकारे
लॉर्ड्स स्टेडियमवर त्या दिवशी एक वेगळीच खळबळ होती. नेहमी जिथे शांतपणे क्रिकेट खेळलं जातं, तिथे आज गवतही उत्साहाने थोडं जास्त ताठ दिसत होतं. कारण मैदानावर उतरणार होते बॉलिवूडचे तारे तारका आणि गायक गायिका! महिला विरुद्ध पुरुष असा क्रिकेटचा सामना खेळला जाणार होता.
👩🦰 महिला टीम – “खतरनाक क्वीन्स”
कप्तान: दीपिका पदुकोण
ओपनर्स: कृती सेनन & आलिया भट
मिडल ऑर्डर: माधुरी दीक्षित, काजोल देवगण, करीना कपूर
फिनिशर्स: करिष्मा कपूर, शिल्पा शेट्टी
स्पेशल परफॉर्मन्स डिपार्टमेंट:
🎤 शिल्पा राव, नेहा कक्कड, अलीशा चॅनॉय
👨🦱 पुरुष टीम – “खानदानी खुन्नस”
कप्तान: शाहरुख खान
व्हाइस कॅप्टन: अजय देवगण (कारण तो काहीच न बोलता निर्णय घेतो)
ओपनर्स: रणवीर सिंग & रणबीर कपूर
मिडल ऑर्डर: अक्षय कुमार, हृतिक रोशन, कार्तिक आर्यन
ऑलराऊंडर्स: राजकुमार राव, आयुष्मान खुराना
🎤 स्पेशल गायक पॉवर: उदित नारायण, कुमार सानू
📺 लाईव्ह ब्रॉडकास्ट: Star Drama Sports + Netflix Comedy + Colors Dhamaal
प्रेक्षकांत भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे नामवंत क्रिकेटपटू बसले होते.
मैदानात अंपायर अमिताभ बच्चन टॉस उडवत म्हणाला, “देवियो आणि सज्जनो. सिक्का उडणार आहे, देखते हैं कौन बनेगा खोटा सिक्का!”
दीपिका तो सिक्का हवेतच टपली मारून वरच्यावर उडवून लावते आणि म्हणते, “हेड्स आलं तर आमची बॅटिंग, टेल आलं तरी आमची बॅटिंग. कारण आम्ही महिला आहोत. लेडीज फर्स्ट!”
महिला टीमची कप्तान दीपिका पदुकोण आत्मविश्वासाने मैदानात खेळाडूंना प्रोत्साहित करायला उतरली. महिला टीमची सुरुवात कृती सेनन आणि आलिया भट यांनी केली.
रणबीर कपूर बॉल टाकायला आला, पण समोर आलियाचा हसरा खळी पडलेला चेहरा असा आकर्षक दिसत होता की, तो बॉल टाकतांना स्वतःलाच विचारत होता, "आपण इथे शूटिंगला आलोय, घरी बायकोशी रोमान्स करतोय की क्रिकेट खेळतोय?"
पहिल्याच बॉलवर आलियाने सहज चौकार मारला.
आलियाने डोळा मारत म्हटलं, “इतका विचार करशील तर बॉलही कंटाळून सीमापार होतो.”
कोहली शांतपणे सामना पाहायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्याही चेहऱ्यावरचं हसू आवरत नव्हतं.
स्टीव्ह स्मिथ वहीत काहीतरी लिहीत होता.
कोहलीने विचारलं, “काय रे, रणनीती लिहितोयस का?”
स्मिथ हसून म्हणाला, “नाही रे, आज मी क्रिकेट नाही, तर कॉमेडी शोसाठी स्किट लिहायला आलो आहे.”
दुसऱ्या बॉलवर "कृती" सेननने तिच्या मिमी चित्रपटातील एक "कृती" केली आणि त्याला आरसा दाखवला, त्यामुळे रणबीरने मी मी म्हणत थरथरत बॉल टाकला आणि त्यावर तिने सरळ षटकार मारला.
थोड्याच वेळात माधुरी दीक्षित मैदानात आली आणि वातावरणच बदललं. तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच लय होती. हृतिक रोशनने "एक पल का जीना" स्टाईलने पूर्ण ताकदीने बॉल फेकला आणि माधुरी क्लीन बोल्ड.
अलिशा चॅनॉय गाऊ लागली आणि करिश्मा पुरुष संघाला चिडवत नाचू लागली, "तुझको मिरची लगी तो मैं क्या करू!" प्रेक्षकांमध्ये सर्वात मागच्या बाजूला पासून गोविंदा भेळपुरी खात होता. त्याच्या बाजूला डेव्हिड नावाचा धवन बसला होता.
करीना कपूर अशोका चित्रपटातील कौरवाकीच्या भूमिकेतील कपडे घालून मैदानात आली, तिच्या हातातील बॅट एक तळपती तलवार भासू लागली.
अजय देवगण बॉल घेऊन समोर उभा होता, समोरच्या करिश्माई "दृश्यम" ने विचलित न होता नेहमीसारख्या शांत आविर्भावात त्याने बॉल फेकून मारला. करीना फटका मारत म्हणाली, "आज मी फक्त खेळायला नाही, जिंकायला आले आहे!" पण उदित नारायणने उडी मारून कॅच घेतला.
मग अक्षय कुमारने नाचायला आणि ओठांची हालचाल सुरू केली आणि उदित त्याला पाठीमागे उभा राहून पार्श्वगायन करून आवाज देऊ लागला, "हम खिलाडी, तुम अनाडी!"
पण तरीही महिलांनी एवढ्या धावा केल्या की, स्कोअरबोर्डही नंबर असह्य झाल्याने पडता पडता वाचला आणि म्हणाला, "इतकं सगळं माझ्या क्षमतेबाहेर आहे!"
ब्रेकमध्ये गायक गायिकांनी गाणं सुरू केलं आणि प्रेक्षकांना कळेचना, टाळ्या बॅटिंगसाठी वाजवायच्या की बॉलिंगसाठी की गाण्यासाठी?
पुरुषांची बॅटिंग सुरू झाली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये शिल्पा शेट्टी बॉलिंगला आली. तिचा प्रत्येक बॉल म्हणजे योगासनासारखा अचूक. रणवीर सिंग दोनचार बॉल खेळला पण लवकरच त्याचा स्टंप उडाला आणि तो जाताना स्वतःच म्हणाला, "आज मी धुरंधरपणे खेळलो केला, पण तरीही बॅटमधून धूर निघाला. बहुतेक क्रिकेटची पटकथा नीट लिहिली नव्हती!"
शाहरुख खान क्रीजवर आला तेव्हा स्टेडियम थोडं शांत झालं. त्याने हलकंसं हसून पाहिलं, जणू सगळ्यांना धीर देत होता. पण काजोलचा एक अचूक बॉल सरसरत आला आणि काय आश्चर्य! तो पुन्हा आपोआप क्षणभरात परत काजोलकडे आला.
दोघे गाऊ लागले.
"जाती हुं मैं!"
"जल्दी हैं क्या?"
प्रेक्षकातून धोनी म्हणाला, "अरे. वाह. क्या बात हैं! जल्दी कुछ नहीं है। अपना समय लेलो। बॉल को समझा बुझाके वापस लेकर आओ"
तेवढ्यात अमिताभ म्हणाला "आपका समय समाप्त।"
ब्रेक झाल्यावर सलमान सर्वांसाठी गरमागरम कोल्ड ड्रिंक घेऊन आला.
सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहोचला. शेवटच्या बॉलवर पुरुष संघाला जिंकायला 6 धावा हव्या होत्या. कार्तिक आर्यनने फटका मारला. सगळे प्रेक्षक उभे राहिले.
बॉल हवेत गेला आणि त्या क्षणी वेळ थांबल्यासारखा वाटला. बॉल माधुरीकडे येत होता.
ती म्हणाली, "साजन बेटा, आज मेरा दिल पुरी तरह से पागल हैं. भूल भुलैया को आज भुलने का वक्त हैं. मेरा वजुद आज मुझे वापस बनाना हैं!"
मग एक चमत्कार घडला. अदृश्य भूतनी रूपात विद्या बालनने माधुरीला वर उचलले आणि मग माधुरीने कॅच घेतला. इतक्या सहजतेने, जणू तो क्षण तिच्यासाठीच लिहिला होता.
महिला टीम जिंकली. लॉर्ड्स स्टेडियममध्ये टाळ्यांचा आवाज घुमू लागला. दीपिकाने ट्रॉफी उचलताना शांतपणे म्हटलं, "आज हा सामना पुरुष विरुद्ध महिला नव्हता. आज आत्मविश्वास विरुद्ध अति आत्मविश्वास असा होता!"
सामना संपल्यानंतर लॉर्ड्स स्टेडियम शांत होईल, असं कुणालाच वाटत नव्हतं. कारण, प्रेस कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार आधीच बसले होते. कुणाच्या हातात माइक, कुणाच्या हातात कॅमेरा, तर कुणाच्या चेहऱ्यावर “आज काहीतरी ऐतिहासिक घडणार” असा भाव.
दीपिका, माधुरी आणि करीना एका बाजूला बसल्या होत्या. दुसऱ्या बाजूला शाहरुख, अक्षय आणि अजय देवगण.
पहिला प्रश्न आला, “दीपिका जी, हा विजय महिलांच्या सबलीकरणाचं प्रतीक मानता येईल का?”
दीपिका हसली आणि म्हणाली, “हा विजय सबलीकरणाचा नाही… हा योग्य बॉल योग्य ठिकाणी टाकण्याचा आहे.”
त्याच क्षणी शाहरुखने माइक घेतला, “मी एवढंच सांगू इच्छितो, आज मी हरलो नाही. आज कथानक थोडं वेगळं होतं. पण पिक्चर अभी बाकी हैं”
मागून कुणीतरी पत्रकार पुटपुटला, “सर, कथानक नव्हे… स्कोअरबोर्ड.”
अक्षय कुमारला प्रश्न विचारला गेला, “तुम्ही फिट असूनही का हरलात?”
अक्षय अगदी गंभीर चेहऱ्याने म्हणाला, “फिटनेस शरीराचा असतो. पण आज भाग्याचा फिटनेस कमी पडला.”
अजय देवगण अजूनही शांत. पत्रकारांनी विचारलं, “सर, तुम्ही इतके शांत का?”
अजय थोडा वेळ थांबून म्हणाला, “मी बोललो तर लोक म्हणतील ‘अजय बोलला!’ घरी काजोलचे बोलणे ऐकायचे माहीत मला. म्हणून मी आज शांतच बरा.”
त्या वेळी माधुरीला विचारलं गेलं, “तो शेवटचा कॅच?”
ती हसून म्हणाली, “तो कॅच नव्हता. तो माझा कोल्हापुरी लावणी झटका होता.”
पत्रकार परिषद संपेपर्यंत कुणालाच कळेना, ही स्पोर्ट्स कॉन्फरन्स आहे की मनोरंजन कार्यक्रम?
नंतर महिला टीमच्या ड्रेसिंगरूममध्ये वातावरण अगदी वेगळं होतं.
करिष्मा शांतपणे बसून शूज काढत होती. करीना मोबाईलवर स्वतःचा फटका पुन्हा पुन्हा पाहत म्हणत होती, “हा शॉट मी उद्या तरी इन्स्टावर टाकणार.”
शिल्पा शेट्टी योगा मॅट अंथरून म्हणाली, “मॅचनंतर शरीर स्ट्रेच नाही केलं तर दुखतं.”
आलियाने हसत उत्तर दिलं, “आज पुरुष टीमचं ईगो जास्त स्ट्रेच झालंय.”
दुसरीकडे पुरुषांच्या ड्रेसिंगरूममध्ये वेगळाच सीन होता. रणवीर सिंग बेंचवर बसून म्हणत होता, “मी आऊट झालो नाही. मी कथेतून बाहेर पडलो.”
रणबीर त्याला पाहून म्हणाला, “तू तरी लवकर बाहेर पडलास. मी तर कन्फ्यूजनमध्येच गेलो.”
राजकुमार राव म्हणाला, "काय राव! मला बॅटिंग मिळालीच नाही!"
आयुष्यमान खुराना म्हणाला "काळजी नक्को रे. रिलॅक्स!"
शाहरुख एका खुर्चीत मागे टेकून बसला होता. तो हळू आवाजात म्हणाला,“आज मला कळलं. ड्रामा माझा असतो, पण टाइमिंग माधुरीचं.”
उदित नारायण आणि कुमार सानू कोपऱ्यात बसून चर्चा करत होते.
उदित म्हणाले, “आपण गाणं गायलो, पण विकेट वाचली नाही.”
कुमार सानू उत्तरले, “गाणं सुरात होतं. पण बॉल तालात नव्हता.”
अमिताभ बच्चन ड्रेसिंगरूममध्ये डोकावले आणि गंभीर आवाजात म्हणाले, “आजचा सामना तुम्हाला एक गोष्ट शिकवून गेला आहे.”
सगळे शांत झाले.
ते पुढे म्हणाले, “क्रिकेटमध्ये रन महत्त्वाचे असतात. पण आयुष्यात हसणं.”
क्षणभर शांतता… आणि मग सगळे हसले.
रात्री लॉर्ड्सच्या बाहेर सगळे कलाकार एकत्र उभे होते. थंडी होती, पण वातावरण उबदार. कुणीतरी सहज म्हणालं, “पुन्हा मॅच ठेवूया का?”
दीपिका हसून म्हणाली, “हो, पण पुढच्या वेळी पुरुष टीमने नीट सराव करावा.”
शाहरुख लगेच उत्तरला, “आणि महिलांनी कमीत कमी अंगप्रदर्शन करावं.”
सगळे हसले.
आणि लॉर्ड्सच्या जुन्या भिंतींनी विचार केला:
“क्रिकेट आम्ही खूप पाहिलं. पण इतकं हसणं कधीच नाही.”
- निमिष सोनार, पुणे
Comments
Post a Comment