मिडनाईट मटकीचे वरण
कोकणातल्या एका आडवळणाच्या गावात 'सावळीरामचा वाडा' नावाचा एक प्रचंड जुना आणि मोडकळीस आलेला बंगला उभा होता. हा बंगला इतका जुना होता की खुद्द पुरातत्व खात्यालाही पुरातत्वपणा प्राप्त होऊन त्याचा विसर पडला होता. बंगल्याची अवस्था अशी होती की, तिथे राहणाऱ्या वटवाघुळांनी सुद्धा 'आम्हाला दुसरीकडे शिफ्ट करा' असा अर्ज दिला असता, पण त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं.
या ओसाड बंगल्यात गेल्या दोनशे वर्षांपासून चमेली चुडेल एकटीच राहत होती. चमेली ही काही साधीसुधी चुडेल नव्हती. ती होती 'मिस कोकण - 1750' ची विजेती! तिचे सौंदर्य पाहून आजही अमावास्येची रात्र लख्ख उजळल्याचा भास व्हायचा. पण बिचारी चमेली एकटेपणाला प्रचंड कंटाळली होती.
"काय हे नशीब! मेल्यावर तरी थोडी 'सोशल लाईफ' असेल वाटलं होतं, पण इथे तर साधी पोस्टमनची सायकल सुद्धा येत नाही," असे पुटपुटत ती आपले लांबसडक केस विंचरत, कधी छताला उलटी लटकून तर कधी आरशात बघून (जिथे ती दिसतच नव्हती) टाईमपास करत असे. तिचे पाय उलटे होते, पण तिची रसिकता मात्र सुलट होती.
रात्र धो-धो पावसाची होती. आकाशात विजा अशा कडाडत होत्या की जणू ढगांमध्ये दिवाळीचे उरलेसुरले फटाके फोडून संपवायची स्पर्धा होत होती. नेमक्या याच वेळी, बबन आणि त्याची 'बिजनेस पार्टनर' बिजली या दोन चोरांनी बंगल्यात प्रवेश केला. बबन दिसायला असा होता की त्याला बघून लहान मुले रडायचे थांबतील, पण मनाने तो उंदरापेक्षाही भित्रा होता. बिजली मात्र खमकी होती.
"ए बबन्या, पाय उचल लवकर!" बिजली ओरडली.
"अगं पण बिजली, लोक म्हणतात इथे भूत आहे..." बबनची दातखीळ बसली होती.
"भूत? अरे, महागाई इतकी वाढलीय की भुतांना सुद्धा घरं परवडत नाहीत. हा बंगला रिकामाच असणार!" बिजलीने टॉर्चचा प्रकाश टाकला.
नेमक्या त्याच क्षणी, बंगल्याच्या बाहेर एक आलिशान गाडी 'धूर-धूर' करत बंद पडली. त्यातून एक गोरापान माणूस आणि एक थरथरता ड्रायव्हर बाहेर पडले. तो होता अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. जॉन स्मिथ आणि त्याचा स्थानिक ड्रायव्हर मिस्टर दगडू उर्फ ब्लॅक रॉक.
डॉ. स्मिथ भारतात 'पॅरानॉर्मल' (अनैसर्गिक) गोष्टींवर संशोधन करायला आले होते, पण येतांना त्यांचा विचार बदलून भारतातल्या खड्ड्यांवर संशोधन करणे जास्त गरजेचे वाटू लागले होते. पुढचा संशोधन विषय आता ते खड्डे हाच घेणार होते.
"Oh wow! Look at this place Dagdu! इट्स सो... स्पूकी! अस्सल हॉरर मूव्ही सेट!" स्मिथ उत्साहाने ओरडले.
दगडू मात्र, "साहेब, हे 'स्पूकी' नाही, हे यमदेवाचं हेडक्वार्टर आहे. चला परत जाऊ," अशी विनवणी करत होता.
पण स्मिथनी दरवाजा ढकलला आणि ते दोघे आत घुसले. किचन मध्ये कपाटात किराणा समान भरलेला दिसत होता. त्यांना भूक लागली होती. ते पुढे गेले तेव्हा त्यांना दिसले की, आत बबन आणि बिजली खजिन्याच्या मोहाने एका जुन्या पेटीचे कुलूप तोडत होते. स्मिथना बघून ते थिजले.
"हॅलो! आर यू द केअरटेकर्स? और यू आर परेनॉर्मल ऍक्टिव्हिस्ट??" स्मिथनी विचारले.
बबनला वाटलं हे इन्कम टॅक्सवाले आहेत.
तो पटकन म्हणाला, "नाही साहेब, आम्ही... आम्ही तर फक्त... साफसफाई करायला आलो होतो. रात्रीची शिफ्ट!"
इतक्यात वरून एक मंजूळ पण अंगावर काटा आणणारा आवाज आला, "हॅलो. मी इथली मालकीण चुडेल. चमेली. आणि माझ्या परवानगीशिवाय इथे सफाई काय धुलाई सुद्धा होऊ शकत नाही."
सगळ्यांनी वर बघितलं. तिथे चमेली, आपली शुभ्र साडी हवेत फडकवत, छताच्या झुंबरासारखी लटकली होती. तिचे सौंदर्य पाहून बबन 'आ' वासून बघत राहिला, तर दगडूनची जागीच अर्धी शुद्ध हरपली. उरलेली अर्धी शुद्ध त्याने धरून ठेवली. नाहीतर तीही हरवली असती.
चमेली हळूच खाली उतरली (म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे नियम धाब्यावर बसवून तरंगत खाली आली).
डॉ. स्मिथनी लगेच खिशातून एक मशीन काढलं. "Amazing! 3D प्रोजेक्शन! व्हर्च्युअल रिअलिटी, होलोग्राम. भारताचं तंत्रज्ञान खरंच खूप पुढे गेलंय!" ते चमेलीच्या साडीला हात लावून बघायला गेले.
चमेली वैतागली. "ए हॅलो, मिस्टर गोरे साहेब! मी प्रोजेक्शन नाही, मी ओरिजिनल, ISI मार्क असलेली चुडेल आहे. घाबरा मला!" आपल्या एका वेळेवर ISI छापलेले होते ते तिने दाखवले आणि तिने डोळे मोठे केले आणि "ह्याऽऽ ह्याऽऽ ह्याऽऽ" असे हसण्याचा प्रयत्न केला. पण घसा बसल्यामुळे आवाज एखाद्या जुन्या ट्रकला किक मारल्यासारखा आला.
बबन आणि बिजली एकमेकांना बिलगले. दगडूने कोपऱ्यात जाऊन स्वतःच्या डोळ्यावर हात ठेवले. पण स्मिथ मात्र भलतेच खुश होते. त्यांच्या संशोधनासाठी त्यांना मटेरियल भेटले होते.
"मॅडम, तुम्ही हवेत कशा तरंगता? अँटी-ग्रॅव्हीटी बूट्स घातले आहेत का?"
या अनपेक्षित प्रश्नाने चमेली कन्फ्युज झाली.
"अरे, मी मेलेली आहे! मी बुट घालत नाही. मला भूक नाही, तहान नाही... कधी कधी हौस म्हणून मी काहीतरी पाककृती करून खात असते. बरेचदा माणसांना पण खाते!"
भूक शब्द ऐकताच बबनच्या पोटातून ढगांच्या गडगडाटासारखा आवाज आला. पाठोपाठ स्मिथ आणि दगडूच्या पोटानेही साथ दिली.
भुते घाबरवू शकतात, पण भूक लागली की माणसाला भुताची सुद्धा भीती वाटेनाशी होते. म्हणून बबन हिंमत करत धडपडत पुढे आला, आणि म्हणाला, "चुडेल मॅडम, तुम्ही आम्हाला नंतर खा. पण आधी आम्ही काहीतरी खाऊ शकतो का? पोटात उंदीर कबड्डी खेळतायत. काय गोरे साहेब? तुम्हालाही भूक लागली ना?"
"हो, हो. आधी स्टमक कोर्टशिप, मग विठोबा वार्शिप !"
"अमेरिकेत पण हीच म्हण आहे? कमाल आहे!"
चमेलीला 500 वर्षांत पहिल्यांदाच कोणीतरी अशी रिक्वेस्ट केली होती. तिच्यातील जुनी 'गृहिणी' जागी झाली.
"बरं बाबांनो! स्वयंपाकघरात काय आहे बघते. पण मदत तुम्हालाही करावी लागेल."
मग त्या मोडक्या स्वयंपाकघरात जे दृश्य दिसले ते अकल्पनीय होते!
चमेली हवेत अधांतरी बसून एका बोटाच्या इशाऱ्यावर कांदे चिरत होती (जे बघून दगडू पुन्हा बेशुद्ध पडला).
डॉ. स्मिथ मसाल्यांच्या डब्यांवरचे लेबल वाचून "Sodium Chloride" आणि "Turmeric" चे प्रमाण मोजत होते.
बबन थरथरत्या हाताने गॅस शेगडी पेटवत होता, आणि बिजली चमेलीला विचारत होती, "ताई, तुमची साडी कुठून घेतली? फॅशन भारी आहे!"
"हिला गोजिरवाणी पैठणी म्हणतात. तुला हवी असेल तर तुला आधी चुडेल बनावे लागेल. ही साडी फक्त आमच्या जगातल्या क्लॉथ सेंटरवर मिळते. त्यासाठी चुडेल कोऑपरेटिव्ह बँकेचे डेबिट कार्ड असावे लागते."
"नको, नको. नंतर मरेल मी. साडी साठी मरण नको. आता आपण वरण बनवण्याकडे लक्ष देऊ!"
"मी आज मस्त मोड आलेल्या मटकीचे वरण आणि भात बनवते!"
"पण आम्ही त्याला मटकीची उसळ म्हणतो."
"आमच्या चुडेलींच्या पाककृतींची नावे वेगळी असतात! चपातीला लपलपाती, जिलेबीला गोलगरी, मिरचीला हिरवी परी, भाकरीला कर्रम कुर्रम, अशी नावे आहेत!"
बिजली मनात म्हणाली, "बापरे, भाकरीची लिज्जत सॉरी इज्जतच काढली हिने!"
अर्ध्या तासात तिथे भाताचा आणि मटकीच्या वरणाचा घमघमाट सुटला. चमेलीने स्वतःच्या हाताने (जे कधी कधी लांब व्हायचे) सगळ्यांना वाढले. भूक इतकी होती की ती वरण भात 'अमृततुल्य' सारखा लागला. बाहेर पाऊस आणि आत भुतासोबत डिनर पार्टी!
"ताई, तू लै भारी आहेस. लोक उगीच नावं ठेवतात भुतांना," बबनने तोंड पुसत भुतांना पसंतीची पावती दिली. चमेलीने ती पावती फाडून फेकून दिली.
तेवढ्यात बाहेर पोलिसांच्या जीपचा सायरन अटकत अटकत वाजला कारण तो बिघडला होता. पण पोलिसांची गाडी मात्र खरडत खरडत आली. इन्स्पेक्टर साळुंखे आणि हवालदार शिंदे, ज्यांना वाटलं होतं की बंगल्यात दारूचा अड्डा सुरू आहे, ते धाडकन आत घुसले.
"हँड्स अप! जो जिथे आहे तिथेच राहील... तुमचे फक्त हॅण्ड्स अप राहतील. बाकी शरीराचा इतर प्रत्येक अवयव डाऊन राहील. अरे बापरे! हा काय वास येतोय?" साळुंखेना गुन्हेगारापेक्षा गरम मसाल्याचा वास आधी आला.
त्यांनी पाहिलं - एक गोरा माणूस, एक बाई माणूस, एक ड्रायव्हर आणि एक... हवेत तरंगणारी बाई? जेवणारे कपल तिला चमेली नावाने हाक मारत होते.
"शिंदे, मला जे दिसतंय ते तुला दिसतंय का? की मी डोळे बदलू?" साळुंखे उद्गारले.
"साहेब, ती बाई जमिनीपासून दोन फूट वर आहे. बहुदा नवीन योगासन असेल, योगासनाचे क्लासेस चालले आहेत बहुतेक. रात्रपाळी असेल. रात्र पाळी, घागर काळी, यमुनाजळें ही पाळी वो माय!" भोळे शिंदे भोळेपणाने यमक जुळवून गाऊ लागले.
"ए. गप रे! कवितेच्या नावाला कलंक कुठला. या चमचमत्या चमेली चुडेलची चौकशी करू दे ना मला", चमेलीकडे प्रेमाने बघत इन्स्पेक्टर साळुंखे तिच्या सौंदर्याने प्रभावित होऊन म्हणाले.
चमेलीने पोलिसांना पाहून एक गोड स्माईल दिली आणि विचारले, "तुम्ही पण जेवणार का? थोडी वरण भात उरला आहे."
त्यांनी बबन आणि बिजलीला ओळखलं की ही गुन्हेगार वाँटेड आहेत.
साळुंखेंची आणि शिंदेंची अवस्था अशी झाली की, चमेलीला घाबरून पळावं, की गुन्हेगार जोडीला पकडावं की चमेलीकडे पाहून डोळ्यांनी आणि ती ऑफर करत असलेलं जेवण पोटाने जेवावं?
पण कर्तव्य कठोर झालं.
"अरे हे तर वॉन्टेड गुन्हेगार आहेत!" असे म्हणून साळुंखेनी दोघांना पकडलं. मग दोघे पोटभर जेवले.
हवालदार शिंदे म्हणाला, "साळुंखे, देखो अभी इधर कुछ भी गडबड नहीं हैं! यहाँ पे सब शांती शांती हैं."
बबन आणि बिजलीला पोलीस घेऊन गेले, पण जाताना चमेलीने बिजलीला प्रॉमिस केलं की, ती जेलमधून सुटल्यावर तिला नवीन चुडेली छाप साडी तिच्या फ्री कोट्यातून आणून देईल. डॉ. स्मिथनी चमेलीवर एक थेसिस लिहिले.
गाडी सुरू झाली. बंगला पुन्हा शांत झाला. पण आता चमेली खूश होती. तिने कुणा माणसाला खायचा प्लॅन रद्द केला, कारण पोट भरलं होतं. सकाळी सायंटिस्ट आणि ड्रायव्हर निघून गेले. परत जाताना चमेलीसोबत सेल्फी काढला (ज्यात फक्त स्मिथ आणि एक पांढरा धुरकट डाग आला).
निदान एका रात्रीसाठी का होईना, चमेलीने 'होस्ट' म्हणून ड्युटी बजावली होती. तेवढाच एकटेपणा दूर झाला. तिने समाधानाने एक जांभई दिली आणि पुन्हा छताला जाऊन लटकली.
निमिष सोनार, पुणे
Comments
Post a Comment