कुणी तज्ञ देता का तज्ञ?
व्हाट्सअप, युट्यूब आणि इंस्टाग्रामवरचे आरोग्य सल्ले आणि व्यवहारिक सल्ले कमी होते की काय, म्हणून आता रोज वर्तमानपत्र सुद्धा नवनवीन आणि कधीही न ऐकलेले असे आरोग्यदायी सल्ले छापत असतात. मागणी तसा पुरवठा अशी त्यांची धारणा असावी बहुतेक! सकाळी उठल्यावर ह्याच्यात टाकून ते प्या आणि त्याच्यामध्ये टाकून हे प्या. रात्री झोपताना ह्याच्यात ते मिक्स करून खा. त्यात लिहिलेले असते: "तज्ञ सांगतात की", "तज्ञांनी सांगितल्यानुसार". हे कोणते, कुठले आणि कशाचे "तज्ञ" असतात हे आजपर्यंत समजलेले नाही. त्यांचे नावही तिथे लिहिलेले नसते.
नक्की ते तज्ञच सांगतात की पेपरवाले मनाने काहीतरी लिहून काल्पनिक तज्ञांच्या नावाखाली खपवतात असा प्रश्न मला नेहमी पडतो. कधी सांगतात की, चॉकलेट खाणे वाईट, कधी म्हणतात चॉकलेट खाणे चांगले. तसेच चहा आणि कॉफीचाही बाबतीत उलट सुलट छापलेले असते. कधी कधी मुंबईतले तज्ञ वेगळेच सांगतात आणि दिल्लीतले तज्ञ त्यांच्यापेक्षा उलट सांगतात. मध्येच अमेरिकेतले तज्ञ येऊन आपल्याला शहाणपण शिकवतात.
कधी कधी हे तज्ञ सांगतात की, त्यांनी भरपूर लोकांवर सर्वे केला आहे आणि मग हा निष्कर्ष काढला आहे. आता मला सांगा, आजपर्यंत आयुष्यात कोणताच सर्वे घेणारा माणूस अशा प्रकारचे प्रश्न घेऊन माझ्याकडे एकदाही आल्याचा मला आठवत नाही. हे सर्व नेमके कोणत्या लोकांना प्रश्न विचारून सर्वे घेतात काय माहिती?
बरेचदा बातमीच्या शेवटी असे सुद्धा लिहितात की: यात दिलेल्या माहितीचा वापर तज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा. म्हणजे लिहिणाऱ्या आणि छापणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाच त्याबद्दल खात्री नाही. मग छापता कशाला? त्यापेक्षा आम्ही बातमी वाचण्यापेक्षा डायरेक्ट तज्ञांकडे जाऊ ना!
बरं, या सर्व तज्ञांचे एखादे सिक्रेट गाव (किंवा एखादा स्वतंत्र ग्रह) वगैरे आहे का काय अशी शंका येते. कारण या तज्ञांना आपले नाव पेपर मध्ये छापावेसे का वाटत नाही? जणू काही हे सिक्रेट मिशनवर असलेले जासूस आहेत. या सगळ्या तज्ञांना एकदा एका ठिकाणी बोलावून (ती खरोखर अस्तित्वात असतील तर) चांगले खडसावून प्रश्न विचारले पाहिजेत. चला याचे उत्तर आपण तज्ञांना विचारूया. आहे का कुणाकडे या तज्ञांचा पत्ता??
Comments
Post a Comment