गोंधळ एक्सप्रेस डबा नंबर 420

मुंबई ते गंगोवा या मार्गावर रुळावरून सटकत सटकत धावणाऱ्या एका भरगच्च बुलेट ट्रेनमधला 420 नंबरचा एसी टू-टायर डबा. 

डॉ. कवळीकर जे एक ज्येष्ठ दातांचे डॉक्टर होते, आपल्या लोअर बर्थवर बसून आपल्या बॅगेतून एक प्लास्टिकचा जबडा आ वासून साफ करत होते. त्यांच्या तोंडातून फॉस्फरस सारखा फस फस आवाज येत होता. त्यांच्या समोरच्या सीटवर सिव्हिल इंजिनियर मिस्टर खड्डेकर बसले होते, जे खिडकीबाहेर बघून "या पुलाचा पिलर किती वाकडा आहे" असे पुटपुटत होते.

मग डब्यात एक वादळ घुसलं. हे वादळ होतं मिस बेबी डॉल, एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल. पण ती सोन्याची नव्हती. हाडा'मासाची' बनलेली होती. म्हणजे कमी हाडाची आणि भरपूर मांसाची.

तिने फॅशनच्या नावाखाली इतके कमी कपडे घातले होते की, तिला बघून डॉ. कवळीकर घायाळ झाले आणि त्यांचा प्लास्टिकचा जबडा सटकून खाली पडला. 

ती इंजिनिअर खड्डेकर यांच्या बाजूला येऊन बसली. एवढी सुंदर स्त्री जवळ बसल्याने त्यांच्या हृदयात मोठ्ठा खड्डा पडला. त्यामुळे त्यांच्या हृदयातल्या रक्ताला अती हर्ष झाल्याने उमजत नव्हते की, कुठून कुठे धावू आणि कुठे येऊन थांबू. मिस्टर खड्डेकर एकसारखा तिच्याकडे पाहू लागला, आणि तिला परत परत स्माईल देऊ लागला. त्यामुळे ती वैतागली आणि ओठ वेडावून त्यांच्याकडे बघू लागली.

इतरांना इंजिनियरचा हेवा वाटू लागला. ते मनातल्या मनात इंजिनिअरसाठी शापवाणी उच्चारू लागले.

"खड्डे पडो या इंजिनिअरने बनवलेल्या रस्त्यावर!"

"विमान पडो मेल्या या इंजिनियरने बनवलेल्या इमारतीवर!"

आपल्या एकसारख्या बघण्याने बेबी डॉल आपल्या जवळून उठून जाऊ नये म्हणून, खड्डेकर इंजिनिअरने मुद्दाम तिच्याकडे खोटे दुर्लक्ष करायचे म्हणून तातडीने खिशातून 'कंपास' आणि 'टेप' काढला आणि उगाचच सीटचे माप घ्यायला सुरुवात केली. 

इंजिनिअर खड्डेकर हळू आवाजात म्हणाला. 

"मॅडम, मी स्ट्रक्चर चेक करतोय... स्ट्रक्चर फारच भारी आणि मजबूत आहे... आय मीन, ट्रेनचं!"

गाडी सुरू झाली आणि रुळांवरून सरकत सरकत सटकायला लागली. तेवढ्यात तिकडे एका अप्पर बर्थवर बसलेल्या दोन तरुणांची पण एकदम सटकली आणि ते खाली उड्या मारत उतरले. एक होता रॉकी (फुटबॉल प्लेयर) ज्याने पायात फुटबॉलचे स्टड्स घातले होते आणि दुसरा होता बंटी (क्रिकेटर) जो झोपेतही 'कव्हर ड्राईव्ह'ची प्रॅक्टिस करत होता.

रॉकी: "ए बंटी, जागा दे रे, मला वॉर्म-अप करायचंय."

बंटी: "अरे हट, ही काय पेनल्टी बॉक्स आहे का? ही खेळपट्टी आहे, मी इथे गुगली टाकणार!"

या विचित्र 420 प्रवाशांच्या गर्दीत, कोपऱ्यातील सीटवर तीन शालेय मुले (चिंटू, पिंटू आणि बंड्या) बसली होती. ही मुले इतकी खोडकर होती की, त्यांच्या शाळेने त्यांना सहलीसाठी नाही, तर शिक्षकांना शांतता मिळावी म्हणून काही दिवस बाहेर पाठवले होते. त्यांचेकडे एक नकली रबरी पाल होती.

डॉ. कवळीकर इम्प्रेशन मारण्यासाठी मिस बेबी डॉलला म्हणाले, "मॅडम, तुमचे दात मोत्यासारखे आहेत, पण मला वाटतं खालच्या बाजूला डावीकडे थोडी कॅव्हिटी दिसतेय. मी आत्ताच चेक करू का?" असे म्हणत त्यांनी खिशातून पकड काढली आणि हातांचा थरथराट करत तिच्या सुंदर दंतपंक्तीकडे हात नेऊ लागले.

ते बघून अभिनेत्री घाबरली,उठून उभी राहिली आणि जोरात ओरडली, "हेल्प! हा म्हातारा माझे दात चोरतोय!"

तिला घाबरलेलं बघून इंजिनिअर खड्डेकर हिरो बनण्यासाठी पुढे सरसावले.

"घाबरू नका मॅडम! मी आहे ना. तुमच्या दाताचा 'पाया' पकडीने पकडून कमकुवत करू पाहणाऱ्या या दंतचिकित्सकाला मी धडा शिकवतो आणि त्याची कमकुवत कुवत दाखवतो."

पण घाईघाईत फुशारकी मारून उठून उभा राहताना त्याची पँट सीटच्या एका उघड्या खिळ्यात अडकली. जसे तो पुढे सरकला, तसा 'चर्रर्र' असा आवाज झाला आणि इंजिनिअर साहेबांचे 'सिव्हिल कन्स्ट्रक्शन' उघडे पडायची वेळ आली.

तिकडे पॅसेज अडवून रॉकी आणि बंटीचा वाद सुरू झाला.

रॉकी: "फुटबॉलमध्ये ताकद लागते, क्रिकेट काय, फक्त उभं राहायचं काम!"

बंटी: "क्रिकेटमध्ये ताकद आणि डोके दोन्ही लागते. फुटबॉल म्हणजे फक्त टोलवाटोलवी!"

याचा राग येऊन रॉकीने बंटीच्या सीटवर ठेवलेल्या हँडबॅगला फुटबॉल समजून लाथ मारली. ती डॉक्टर कवळीकरांच्या दातांवर जाऊन आदळली. 

डॉक्टर जोरात ओरडले, "अरे माझा रूट कॅनल हलला!"

हे सर्व कमी होते म्हणून की काय, चिंटूने आपली रबरी पाल गुपचूप मिस बेबी डॉलच्या खांद्यावर ठेवली आणि ती तिथेच हलकीशी चिकटली.

बेबी डॉल किंचाळली, "आई ग!!! मगर, वाचवा!!" 

बिचारी! तिला पाल आणि मगर यातला फरक माहित नव्हता. 

तिने घाबरून उडी मारली आणि ती थेट इंजिनिअर खड्डेकरच्या अंगावर जाऊन धडकून पडली. इंजिनिअर खाली पडला आणि ती त्याच्या अंगावर. खड्डेकर लाजेने लाल झाले आणि त्यांनी आपली "लोड बेरिंग कॅपॅसिटी" किती असावी याचे मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली. एवढे बरे झाले की, ट्रेनला खालून खड्डा पडला नाही. 

हा गोंधळ बघून बंटीने ती चिकटलेली पाल उडवण्यासाठी आपली बॅट फिरवली.

"मी पालीचा सिक्सर मारतो थांबा!"

बॅट फिरली, पाल हवेत उडाली. पण बॅट हातातून सटकून थेट जाऊन लागली ती डॉ. कवळीकरांच्या हाताला आणि मग दातांना. त्यांच्या हातातली पाण्याची बाटली उडाली आणि त्यातील सर्व पाणी बेबी डॉलच्या मेकअपवर पडले.

आता ती 'सुंदर मॉडेल' एखाद्या भयकथेतील 'भुतासारखी' दिसत होती, कारण तिचे काजळ गालावरून खाली ओघळले होते.

पिंटू आणि बंड्याने खोडकरपणा करण्यासाठी बाथरूमजवळ जाऊन मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली, "टी.सी. आला! टी.सी. आला!!"

हे ऐकताच, मिस बेबी डॉल (जिचे तिकीट कन्फर्म नव्हते) बाथरूममध्ये लपायला पळाली आणि अर्धवट दरवाज्यात अडकली. इंजिनिअर खड्डेकर (ज्यांनी फाटलेली पँट लपवण्यासाठी चादर गुंडाळली होती) अप्पर बर्थवर चढू लागले, पण अडकले. डॉक्टर कवळीकर आपले दात शोधण्यासाठी जमिनीवर रांगत होते आणि त्यांचा हात सीटच्या खाली अडकलेला होता. रॉकी आणि बंटी हे खिडकीतून बाहेरून बॉल टाकून दुसऱ्या खिडकीतून बाहेरून बॅट मारत क्रिकेट खेळत होते. तिन्ही गोजिरवाणी मुले एका बर्थवरून दुसऱ्या आणि तिसऱ्या बर्थवर टारझन सारखे उड्या मारत होते. 

टी.सी. ने कपाळावर स्वतःचा हात छापला आणि म्हणाला, "पुढच्या स्टेशनवर मी उतरतो, मला ही नोकरी नको!"

निमिष सोनार, पुणे


Comments

Popular posts from this blog

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली

आरोग्यदायी सांबार