फुलपाखरू
अमावस्येची रात्र होती. चंद्र सुट्टीवर होता. आकाश काळेकुट्ट होते आणि एकही चांदणी उपस्थित नव्हती. रात्रीचे अकरा वाजले होते.जुन्या बसचं घरघर करणारं इंजिन थरथरत थांबलं, आणि दामोदरने आपले पोते पाठीवर घेतले आणि बस मधून उतरला.
स्टॉप पासून त्याच्या गावातलं घर फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं.
दामोदरचे छोटे किराणा दुकान होते. दिवसभर शहरात माल खरेदी करून तो आता परत आला होता. पाठीवर गाठोड्यासारखे पांढरे कापडी पोते, हातात टॉर्च, आणि खिशात आपल्या मुलीसाठी (टिना साठी) छोटं खेळणं. सेलवर चालणारं, बटण दाबल्यावर उडणारं रंगीबेरंगी फुलपाखरू, ज्याला पाहून त्याची दोन वर्षाची मुलगी हसत हसत आनंदाने नाचेल, हे त्याला माहीत होतं.
दामोदर रस्ता चालू लागला. तो शहरातून नेहमी माल आणायचा परंतु आज जरा त्याला जास्तच उशीर झाला होता.
रस्त्यावर एकही माणूस नव्हता. थंड वारा सुटला होता, आणि पायवाटेच्या दोन्ही बाजूला दाट झाडं होती. पानांचा सळसळता आवाज, आणि दूरवरून कधीमधी एखाद्या घुबडाचा घोगरा आवाज. दामोदरने टॉर्चचा प्रकाश पुढे टाकला. झाडांच्या सावल्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्या.
अर्धा रस्ता पार झाल्यावर, तो त्या ठिकाणी पोचला जिथे जुनं स्मशान लागायचं.गावातल्या लोकांमध्ये अफवा होती की, त्या स्मशानाजवळून जातांना रात्रीच्या वेळी अतृप्त आत्मे एकट्या चालणाऱ्या व्यक्तीला चकवा बसवतात. भ्रमिष्ट बनवतात. फक्त एखाद दुसराच धीट मनाचा व्यक्ती त्यातून सही सलामत सुटतो म्हणे!
पण दामोदर या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवत नव्हता.आणि मला सांगा, विश्वास ठेवला किंवा नाही ठेवला तरी, आज त्याला या रस्त्यावरून चालणे भाग होतेच!
स्वतःला दिलासा देत तो मनात म्हणाला, “लोक काहीही सांगतात. मनाचा खेळ असतो हा सगळा. विविध डॉक्टर आणि सायंटिस्ट हेच सांगतात, की भूत वगैरे सगळे खोटं असतं!"
"भूत बित सामने आया, तो देख लेंगे उसको!", असे मुद्दाम तो मोठ्याने ओरडला, आणि तेवढ्यात टॉर्चचा प्रकाश मंद झाला, बल्ब मधून फडफड आवाज आला आणि प्रकाश बंद झाला. आणि इकडे त्याच्या खिशातील मोबाईल, एखाद्या मरणाऱ्या किड्यासारखा वळवळ करून भयंकर पद्धतीने व्हायब्रेट होऊन आपोआप स्विच ऑफ झाला.
या प्रकारामुळे घाबरून त्याने मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि स्विच ऑन करण्याचा प्रयत्न केला पण तो ऑन होतच नव्हता. शेवटी त्याने नाद सोडला आणि मोबाईल खिशात ठेवून दिला.
“अरे बापरे, हे काय झाले! मोबाईल बंद आणि टॉर्च पण बंद.” दामोदरने हाताने टॉर्चवर जोरजोरात ठोकले, पण प्रकाश आला नाही. शेवटी त्याने टॉर्च पण दुसऱ्या खिशात ठेवून दिली.
त्याच वेळी, झुडपातून घुssss सुssss असा आवाज आला. जणू एखादं कष्टाने श्वास घेणारं जनावर, गुरगुर करत होतं.
दामोदरच्या लटलट कापू लागला. थंड हवेतही त्याला घाम आला. त्याने चालण्याची गती वाढवली.पण वाट जसजशी पुढे गेली, तसं त्याला वाटायला लागलं की, हा रस्ता काहीतरी वेगळाच आहे. झाडं एकसारखी दिसत होती, पायवाट गोल गोल फिरतेय असं भासत होतं.
काही मिनिटांतच दामोदरला कळलं की, तो जागेवरच फिरतोय. त्याने ओळखीचा खडक पाहिला, तोच खडक तो दहा मिनिटांपूर्वी तो ओलांडून गेला होता.
“हे काय चाललंय?” तो स्वतःशी पुटपुटला.
चकवा?
पाठीवरचे पोते हळूहळू जड होत चालले होते. पोत्याचे वजन वाढतच गेले, त्यामुळे त्याला वेगाने चालता येईना. शेवटी त्याने पोते खाली ठेवले आणि दीर्घ श्वास घेत एका झाडाखाली बसला.
थोड्या वेळाने मागून कुणीतरी हळू आवाजात हाक मारली, “दामोदर...!”
आवाज अपरिचित होता.
तो दचकला, मागे वळला आणि वर झाडाकडे पाहिले.पण तिथे कोणी नव्हतं.फक्त पांढऱ्या धुक्याचा हलका पडदा हवेत तरंगत होता, आणि झाडांच्या फांद्यांमधून दोन लाल ठिपके चमकत होते. जणू पक्ष्याचे डोळे.
त्याने घाबरून जड पोते उचलले आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. पोते जड होते पण इलाज नव्हता. गुडघे दुखायला लागले, पायात गोळे आले.
एका झाडाजवळ येताच स्मशानाकडून वेगाने येणाऱ्या वाऱ्याने राखेसारखा धूर सोबत आणला आणि त्याच्या चेहऱ्यावर उडवला.त्या धुरात त्याला एक भयानक चेहरा दिसला, डोळे काळे होते, आणि ओठांवर भयानक हसू होते.
आता मात्र त्याची सहनशक्ती संपली. त्याने पोते त्या झाडाखाली ठेवले. पैशांचे नुकसान होणार होते, पण जिवापेक्षा पैशाचे काय मोल?
पोते तिथेच सोडून तो घाबरून पळू लागला.पण कितीही पळला तरी रस्ता संपत नव्हता.दरवेळी ते झाड ओलांडल्यावर, पुन्हा तेच झाड दिसायचं. तिथे त्याचे पोते ठेवलेले दिसायचे. जणू वेळ थांबली होती, जागा फिरत होती, आणि तो स्वतःच त्या चक्रात अडकला होता.
त्याच्या मागे मागे तो राखेचा धूर पाठलाग करत होता.
पुन्हा ते झाड आलं आणि तिथे ठेवलेल्या त्याच्या पोत्याला ठेच लागून अंधारात धडपडला, पडला. खिशातून रंगीत फुलपाखरू जमिनीवर पडलं. जमिनीवर पडलेला असताना त्याला दिसलं की, ते फुलपाखरू चकाकत होतं. जणू फुलपाखराचे डोळे त्याच्याकडे बघत होतं. ते अचानक उडायला लागलं.
धूळ झटकून दामोदर उठून उभा राहिला.
आता फुलपाखराच्या पंखांतून फडफड आवाज येऊ लागला आणि तो आवाज इतका मोठा झाला की, त्याच्या कानाला असह्य झाला.
"पोते गेले तर गेले, पण कमीत कमी फुलपाखरू तरी हातचे जायला नको. टीना छकुलीसाठी, तिच्या आनंदासाठी मला फुलपाखराला पकडायलाच हवे!" असे म्हणून त्याने ते फुलपाखरू पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण ते त्याला हुलकावणी देत गेले. तसेच, त्याच्या चेहऱ्याच्या अवतीभवती सर्व बाजूंनी राखेचा धूर पसरला. त्यामुळे काही वेळ त्याला दिसेनासे झाले.
शेवटी ते फुलपाखरू झाडावर जाऊन बसले.
फुलपाखराच्या पंखांचा फडफड आवाज खूपच मोठा झाला.
शेवटी त्याने कान झाकून घेतले. डोळेही बंद केले कारण, आता त्या राखेच्या धुराने अक्राळ विक्राळ चेहऱ्याचे रूप धारण केले. नाकात धुराचा विचित्र वास असह्य झाला. त्यामुळे त्याने थोडा वेळ श्वास घेणे बंद केले.
अचानक आवाज बंद झाला.
राखेच्या धुराचा वास येणे बंद झाले.
फुलपाखरू झाडावर बसलेले असल्याने ते पकडणे शक्य नव्हते. कसल्या तरी अमानवी घटना घडत होत्या. गावातले लोक सांगतात ते खरे आहे की काय?
आता त्याने मनाशी एक निश्चय केला.
"फुलपाखरू गेले तर गेले, फक्त इथून जिवंत घरी जायचे!"
ऊन लागू नये म्हणून डोक्यावर बांधायचा मोठा पांढरा रुमाल त्याने खिशातून बाहेर काढला. त्याची घडी करून पट्टी बनवली आणि डोळ्यावर बांधली. आता तो डोळ्यावर पट्टी बांधूनच चालणार होता.
टॉर्च चालत नाही आणि आकाशातून पावसाऐवजी अंधारधारा बरसत होत्या. मग उघड्या डोळ्यांनी अंधारात अभद्र गोष्टी पाहण्यापेक्षा डोळ्यावर पट्टी बांधून चाललेले बरे, असे ठरवून तो पुढे पुढे चालू लागला.
कुठे धडकलो तरी हरकत नाही, पण मी आता डोळ्यावरची पट्टी काढणार नाही. कारण चकव्यामुळे पुन्हा पुन्हा तेच तेच ठिकाण आल्यावर जी भीती निर्माण होते त्या भीतीपासून आता सुटका होईल! कधी ना कधी तरी सकाळ होईलच ना? असा ठाम निश्चय करून तो वेगाने चालू लागला.
पुढची पायवाट सरळच होती.
डोळ्याला पट्टी बांधलेल्या अवस्थेत तो पळत राहिला.
"पप्पा SSSSS....!"
मागच्या बाजूने आवाज आला.
दामोदर अचानक पळता पळता थबकला. टिना? इथे?
"अहो पप्पा. माझे फुलपाखलु तुमी विशलू नका. ते झालावल बशले आहे. त्याला पकला!"
"नाही हा भ्रम आहे! मागे माझी मुलगी नाही."
अशी मनाची समजूत करून तो आणखी वेगाने पुढे पुढे चालू लागला आणि पळायला लागला.
"पप्पा. मी ते फुलपाखलु पकलायला झालावल चडले, पन ते वल उंच उलाले. पप्पा, वाचवा. मी झालावलून खाली पलते आहे....!"
पण हा आवाज तोंडात बोळा कोंबून बोलल्यासारखा वाटत होता.
एका क्षणी त्याला वाटले की, डोळ्यावरची पट्टी काढून मागे वळून बघावे. पण त्याने तिच्या मनात दाबली आणि घाबरून तो अक्षरशः पिसाटल्यासारखा वेगाने पळत सुटला आणि पुन्हा ते झाड आलं. त्याने ठेवलेल्या जड पोत्याला अडखळून तो जोराचा हवेत उडाला आणि झाडाला जोरात चेहरा, नाक आणि डोके आपटले जाऊन खाली एका दगडावर पडला आणि गतप्राण झाला.
ते तेच झाड होते, जिथे त्याचे पोते ठेवलेले होते आणि झाडावर ते फुलपाखरू एका फांदीवर बसून पंख फडफडवत होते.
"पप्पा. झालावल फुलपाखलु बशले..."
"पप्पा. झालावल फुलपाखलु बशले!"
झोपेत टिना बडबड करत होती. हे ऐकून दामोदरची वाट बघत झोप लागलेली दामोदरची पत्नी दामिनी दचकून जागी झाली.
केव्हाचा फोन लावते आहे पण यांचा फोन स्विच ऑफ का येतो आहे, याची तिला आधीच काळजी वाटत होती आणि आता ही टिना बडबड करते आहे.
आधीच आज अमावस्या आहे आणि तशात यांना उशीर झाला!
तिने टीनाला हलवून जागे केले. टीना जागी झाली, पलंगावर उठून बसली आणि डोळे चोळत मोठ्याने रडू लागली.
तेवढ्यात दरवाजावर जोरात टकटक झाली.
"टिना बेटा. मी आलोय गं. हवेत उलनालं फुलपाखलु आनलं मी माझ्या छकुलीसाठी! दाल उगल बाला!"
रडायचे थांबून आनंदाने टिना छकुलीने बेडवरुन खाली उडी मारली आणि " माझा पप्पा आला, माझा पप्पा आला!" असे म्हणत ती दार उघडायला धावली.
तेवढ्यात घरातल्या घड्याळाने बाराचे ठोके दिले आणि टिनाने दार उघडलं.
(समाप्त)

Comments
Post a Comment