रविवारची रणभूमी



पुण्यातलं एक टिपिकल मध्यमवर्गीय घर. रविवार, सकाळी 9 वाजता.

सुमती (घर पुसते आहे): "राजेश, आज घरातलं काम करायचंय. कपाट साफ करायचंय, धूळ पुसायची, मग मला स्वयंपाक करायचाय!"

राजेश (क्रिकेट मॅच बघतोय): "सुमती, रविवार म्हणजे विश्रांती. शिवाय आज क्रिकेट मॅच आहे!"

सुमती: "तुम्ही काय मॅच बघायला माझ्याशी लग्न केलं होतं का?"

राजेश: "तू लग्नात एक करारपत्र बनवायला हवे होते आणि त्यात 'रविवारचे करार' लिहून माझी सही घ्यायला हवी होती!"

रोहन: "आई, बाबा, आपण लवासा फिरायला जाऊया ना! मी ड्रोन कॅमेरा सोबत घेईन! तिथले व्हिडिओ युट्यूबवर टाकेन."

रुचिरा: "हो, आणि मी माझे फॅशन रील्स अपलोड करण्यासाठी वेगवेगळे फॅशनचे ड्रेस सोबत घेईन! चेहरा शक्य तितका वेडावाकडा करून, ओठ तिरपे तारपे करून सेल्फी घेईन. लाईक मिळवीन. कमेंट कमवीन."

सुमती: "हो का? तुला तर मी इन्स्टाग्रामवरच नांदायला पाठवेल. आणि माझं काय? मी एकटी घरात राबते, आणि तुम्ही सगळे जाताय फिरायला?"

राजेश: "फिरायला तूही सोबत ये ना! आम्ही तुला थोडंच नाही म्हणतोय? पण रोहन आणि रुचिरा, ही मॅच संपू दे. मग निघू. यू ही कट जायेगा सफर साथ चलने से, की मंजिल आयेगी नजर..."

रुचिरा: "कोणती मंजिल बाबा? हे कोणत्या जमान्यातील गाणं म्हणतो आहेस तू?"

रोहन: "I can walk chasing freedom.... हू हू हू " हे इंग्रजी गाणं म्हण पप्पा!"

सुमती: "म्हणा, म्हणा, तुम्ही गाणं म्हणा, क्रिकेट बघा, सेल्फी काढा, ड्रोन उडवा आणि घरातली साफसफाई कोण करणार? मी एकटी नाही करणार!"

राजेश (टीव्हीवर कुणीतरी सिक्स मारतो, त्यामुळे राजेश टाळ्या वाजवून म्हणतो): "मी पण नाही करणार!"

रोहन: "मी तर नक्कीच नाही!"

रुचिरा: "माझ्या नाकाचा धुळीशी छत्तीसचा आकडा आहे!"

सुमती: (कंबरेवर हात ठेवून, आवाज चढवत) "अच्छा! म्हणजे तुम्ही सगळे घरातल्या कामासाठी 'नो-एंट्री' चा बोर्ड लावून बसले आहेत! राजेश, तुम्ही तर रविवार म्हणजे 'आंतरराष्ट्रीय झोप महोत्सव' असल्यासारखे वागता!"

राजेश: (टीव्हीचा आवाज वाढवतो, जणू ऐकलेच नाही) "अगं, टीव्हीवर काय चाललंय बघ! वेस्ट इंडिजची विकेट गेली! कमाल आहे!"

सुमती: (टीव्हीचा आवाज चिट्टी रोबोटच्या स्टाईलने कमी करते आणि ओरडून बोलते): "तुमच्या विकेटपेक्षा घरातल्या घरातल्या धुळीला क्लीन बोल्ड करणे महत्वाचे आहे! आणि रोहन, तू 'ड्रोन' वर फडके अडकवून घर साफ करशील का? की फक्त 'रील्स' बनवण्यासाठीच तुझा ड्रोन उपयोगी आहे?"

रोहन: (लगेच तोंड वाकडे करून) "आई! ड्रोनने घर साफ करायला गेलं तर त्याच्या पंख्यांना धूळ लागेल, मग तो खराब होईल! मला अजून नवीन ड्रोन घेऊन देणार नाहीत बाबा!"

रुचिरा: (गोड चेहऱ्याने, पण स्वार्थाने) "आई, माझं म्हणशील तर, मी मदत करेन. मी कपाटातले कपडे बाहेर फेकायला मदत करते. पण ते परत कपाटात ठेवायला मला नाही जमणार! कारण, मला माझ्या 'फॅशन'ची तयारी करायची आहे! यू नो. फॅशन इज माय पॅशन."

सुमती: "आली मोठी रविवार पेठेतली मिस इंडिया! अहो राजेश! तुम्ही तुमच्या रविवारच्या करारात हे पण लिहिलं होतं का, की आपली मुलं पण कामाला हात लावणार नाहीत?"

राजेश: (डोळे मोठे करून) "सुमती, अगं, केव्हा आणि किती मुलं होतील हे लग्न झाल्या झाल्या थोडच मला माहीत होतं? असा करार आपण खरंच केला आहे का? मी माझ्या मुलांना 'फ्रीडम ऑफ चॉईस' दिलं आहे! त्यांना त्यांचे निर्णय घेऊ दे! त्यांनी घरात मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा मी आदर करतो. जाओ बच्चो, जी लो अपनी जिंदगी" (अमरीश पुरीच्या आवाजात हातवरे करत राजेश म्हणाला)

रोहन: "हो आई! बाबा बरोबर बोलतायेत! मी माझा 'चॉईस' निवडला आहे. आता मी 'PUBG' खेळणार!"

रुचिरा: "आणि मी 'TikTok'वर नवीन डान्स स्टेप्स शिकणार!"

सुमती: (हताश होऊन सोफ्यावर बसते.) "मी पण आता माझा निर्णय घेते. बेडरूम मध्ये जाऊन झोपते, डोक्यावर पांघरूण घेऊन!"

राजेश: "नको गं नको असं करू."

सुमती: (गावठी स्टाईल आरोळी मारते आणि कंबर 360 डिग्रीमध्ये हलविते) नॅको नॅको काय नॅको नॅको? तुम्हाला काय वाटले की, मी 'घरकाम की कहानी' नावाच्या मालिकेतली 'एकटी हिरोईन' आहे? ते काही नाही. उठा. मला मदत करा! पुरुषासारखे पुरुष कुठचे!"

टीव्हीवर कुणीतरी क्लीन बोल्ड होतो.

राजेश: (नाइलाजाने उठतो आणि वास्तव सिनेमातल्या दीड फुट्या संजय नार्वेकरच्या आवेशात म्हणतो) "ए ssss, मेरी मर्दानगी को मत ललकार तू हसीना!"

या वाक्यामुळे लग्नानंतरच्या जीवनाचे "वास्तव" काय असते याचा साक्षात्कार झाल्याने दोन्ही पोरं टाळ्या वाजवत बोर्नव्हिटा बॉय आणि कॉम्प्लान गर्ल च्या थाटात उड्या मारायला लागतात.

सुमती: (जोराचा झाडू जमिनीवर आपटते): गप बसा रे पोरांनो. बाजूला व्हा. मी हसीना काय? उठता की नाही तिथून आता? इस हसीना के हाथ मी झाडू हैं. ये हसीना कब कातील बन जाएगी भरौसा नहीं हा... सांगून ठेवते!"

राजेश: (झाडू जमिनीवर आपटल्याचा प्रसंग त्याला दांडपट्टा गोल गोल फिरवून जमिनीवर आपटणाऱ्या रणरागिणी सारखा वाटतो आणि तो टुणकन सोफ्यावरून फरशीवर उडी मारतो) "बरं! बरं! पण एक अट! कपाट साफ करताना माझा जुना मी शोधत असलेला 'कॉलेजमधला टी-शर्ट' सापडला तर तो तू फेकणार नसशील तरच!"

सुमती: (डोळे वटारून मोठ्याने बोंब मरते) "बरे झाले, आठवण केली. तुमचा 'कॉलेज टी-शर्ट' आता एखाद्या 'ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयात' ठेवायची वेळ आली आहे! तो पांढरा कमी आणि पिवळा जास्त दिसतो! तो टीशर्ट मला दिसला गं बाई दिसला, की समजून चला मी तो फाडून फेकला गं बाई फेकला!" (मराठी गाण्याच्या चालीवर हावभाव करते)

(तोपर्यंत दारावर बेल वाजलेली असते आणि पोरांनी दार उघडलेले असते आणि शेजारचे शशिकांत आणि त्यांची पत्नी मीनल आत येऊन दोघांचे बोलणे ऐकत उभे असतात.)

शशिकांत: (शांत स्वरात, पण आत येताच वातावरणाची वाढलेली उष्णता पाहून थोडा चाचरत) "राजेशभाऊ, वहिनी! काय झालं? सगळं ठीक आहे ना? आवाज जरा जास्त येत होता, म्हणून आम्ही आलो. आणि वाहिनी काय छान गाणे म्हणत होता तुम्ही! दिसला गं बाई दिसला, मला बघून गालात हसला गं बाई हसला! बघ बघ मीनल बघ. वहिनी राजेशला दर रविवारी गाणं म्हणून दाखवतात. नाहीतर तू? मला काहीच दाखवत नाहीस."

मीनल: (जरब बसवणारे तिरपे डोळे करून आणि दात ओठ खाऊन) "अहो शशिकांत, तुम्हाला माझ्याकडून गाणी ऐकायची इच्छा आहे का? मी तुम्हाला घरी गेल्यावर गाणेच काय, तांडव नृत्य पण करून दाखवते. आणि सुमती, मला सांग तू का एवढी चिडली आहेस? रविवार म्हणजे शांत दिवस असतो ना!"

सुमती: (मीनलला बघून) "शांत दिवस? मीनल, या 'राजेशाही' घरात कुणी मला मदत करायला तयार नाहीये! कपाट साफ करायचंय, धूळ पुसायची आहे. पण कुणाला फुरसत नाही!"

राजेश: (मीनलला बघून) "नाही हो वहिनी! मी फक्त क्रिकेट मॅच पाहता पाहता थोडी विश्रांती मागतोय, पण सुमतीला वाटतं की मी 'आळशी' आहे! आणि हा बिचारा माझा मुलगा, खूप पब्जीचा भुकेला आहे. आणि पोरगी? ती लाईक आणि फॉलोची नेहेमी तहानलेली असते, म्हणून बिचारे दोघे आपापले "तहानभूक" भागवण्याचा प्रयत्न करत आहेत हो!"

मीनल: "अहो राजेशभाऊ! तुम्ही तर 'इंजिनिअर' आहात! तुम्हाला तर 'स्त्रियांच्या मनातले लॉजिक' आणि 'कुटुंबाचं सर्किट' कसं काम करतं, किती व्होल्टेज आणि करंट योग्य आहे हे कळायला पाहिजे! घरातलं काम फक्त बायकांचंच का असावे बरे? पुरुषांनी का बरे मदत करू नये?"

शशिकांत: (मीनलला थांबवत) "मीनल! तू शांत राहा! आपण इथे भांडण मिटवायला आलो आहोत! वाढवायला नाही."

मीनल: "मी तर फक्त 'सत्य' बोलत आहे, शशिकांत! आपल्या घरात पण तुम्ही हेच करता! रविवारी सकाळी फक्त पेपर वाचत बसता!"

शशिकांत: (कपाळावर आठ्या घालून) "मीनल! तू आपल्या घरचं इथे कशाला आणतेस?"

रोहन: (मिश्कीलपणे हसत) "अहो काका, काकू! तुम्ही आधी हे ठरवा की 'रविवार' कशासाठी असतो? 'विश्रांती'साठी, की 'काम' करण्यासाठी? काका, तुम्ही काकूंना मदत करायलाच पाहिजे आणि तुम्ही नुसते पेपर वाचत बसता? कमाल आहे बुवा."

रुचिरा: (गोड आवाजात, पण रोहनच्या सुरात सूर मिसळून) "हो ना! तुम्ही म्हणतात 'मी-टाइम' हवा, काकू म्हणते 'क्लीनिंग-टाइम' हवा. त्याचं सोडा पण तुम्ही दोघे तर भांडण सोडवायला जातांना सुद्धा 'फायटिंग-टाइम' मध्येच अडकलेले दिसताय!"

शशिकांत: (आता गोंधळून) "अहो! हे काय! ही मुलं तर आम्हालाच जाब विचारतायत!"

मीनल: (रागारागाने शशिकांतकडे बघते) "तुम्ही कशाला मला इथे घेऊन आलात? आपल्या घरात तर कधीच मदत करत नाही! इथे येऊन ज्ञान पाजळताय!"

शशिकांत: (आता शशीभाऊंचा संयम सुटतो) "मीनल! मी कुठे ज्ञान पाजळतो आहे? तू कायम माझ्यावरच का चिडतेस? मी फक्त या घरात शांततेचा प्रस्ताव घेऊन आलो होतो!"

मीनल: "शांतता प्रस्ताव? आले मोठे ट्रम्पचे चेले! तुमच्या या शांततेमुळेच घरातलं सगळं काम माझ्यावर पडतं! राजेशभाऊ, तुम्ही निदान 'इंजिनिअर' तरी आहात, 'एआय रोबोट' बनवून द्या की तुमच्या लाडक्या बायकोला!"

राजेश: (आता राजेशला मजा येऊ लागते) "बघा ना शशीभाऊ! ही मीनल वहिनी तर माझ्या 'टेक्नॉलॉजी'वरच प्रश्न विचारत आहे! आणि रोहन, रुचिरा, तुमच्या मीनल काकूंना सांगा, की रोबोट बनवायला किती वेळ लागतो ते? रोबोट बनवणे म्हणजे काही स्वयंपाक बनवण्यासारखे खायचे काम नाही काही!"

रोहन: (चुटकीसरशी) "हो काकू! रोबोट बनवायला खूप रिसर्च लागतो! तुम्ही काकांना सांगा की, आधी 'हाऊसहोल्ड रोबोटिक्स'वर एखादं पुस्तक त्यांनी तुम्हाला आणून द्यावं! ते वाचा. मग तुम्हाला समजेल. काकांनी तुम्हाला रोबोटिक्स पासून आजपर्यंत वंचित ठेवलं."

रुचिरा: (गोड हसत) "आणि काका, तुम्हाला माहित आहे का, की रोबोटला 'रविवारचा करार' नसतो! तो रोज काम करतो!"

शशिकांत: (आता दोघेही पूर्णपणे गोंधळले आहेत. त्यांना कळत नाही की मुलांना उत्तर द्यावं की एकमेकांशी भांडावं? ही मुलं तर आमच्यातच भांडण लावत आहेत!) "एक मिनिट, एक मिनिट! हे काय चाललंय? आम्ही का म्हणून रोबोटिक्सची पुस्तके विकत घ्यायची आणि वाचायची?"

रुचिरा: "काका, या मीनल काकू आमच्या बाबांना कसलाही अभ्यास न करता ज्ञान पाजळत आहेत. रोबोटिक्सचे. म्हणून आम्ही पुस्तक वाचायचा सल्ला दिला!"

शशिकांत: "बघ मीनल. मला म्हणत होतीस मघाशी आणि स्वतः तेच करतेस. ज्ञान पाजळतेस!"

मीनल: (शशिकांतला धक्का मारत) "तुम्ही गप्प बसा! तुमचा तरी कुठे 'रोबोटिक्स'चा अभ्यास झाला आहे? मग कशाला इतरांना रविवारी सकाळी सकाळी फालतू सल्ले देत फिरता?"

शशिकांत: (मीनलवर ओरडतो) "मीनल! मी कुठे सल्ले देत फिरतो? तुझ्या अशा या बोलण्यानेच मला 'राग' येतो! तू किती भांडखोर आहेस!"

मीनल: "मी भांडखोर? आणि तुम्ही किती 'आळशी' आहात, हे दाखवून दिलं तर राग येतो? मागच्या रविवारी काय झालं, ते सांगू का राजेश भाऊजींना?"

(राजेश आणि सुमती आता शांत होऊन एकमेकांकडे बघतात. शेजाऱ्यांच्या भांडणाने त्यांना स्वतःचे भांडण विसरायला लावले होते.)

राजेश: (सुमतीला हळूच डोळा मारत हळूच तिच्या कानात) "बघ सुमती! आपल्या मुलांना 'डिबेट' मध्ये टाकायला पाहिजे! किती छान 'ट्रिक' वापरली त्यांनी!"

सुमती: (हसत हळूच) "खरंच! आपलं भांडण मिटवायला आले होते, आणि स्वतःच भांडू लागले!"

शशिकांत: (मीनलला ओढत दाराकडे घेऊन जातो.) "चल मीनल! आपले मागच्या रविवारचे वाद आपण आजच्या रविवारी सोडवू. पण आपल्या घरातच जाऊन 'भांडण' करून सोडवू! आपली मुलगी तारिणी आपला वाद सोडवेल. आपल्याला तारेल. चल!"

मीनल: (जाता जाता सुमतीला म्हणते) "सुमती! तू बघच. शशिकांत नावाच्या या खलनायकाला 'धडा' शिकवल्याशिवाय मी आज स्वस्थ बसणार नाही. तुम्ही पण राजेशभाऊंना 'धडा' शिकवा!"

(शशिकांत आणि मीनल भांडत भांडत घरातून जातात. राजेश, सुमती, रोहन आणि रुचिरा एकमेकांकडे बघून मोठ्याने हसू लागतात.)

रोहन: (आई-वडिलांकडे बघून) "तर, आता काय? 'लवासाला' जायचं की 'कपाट' साफ करायचं? की क्रिकेट मॅच? धूळ पुसायची की स्वयंपाक?"

राजेश: (मुलांना हसत जवळ घेत) "यातलं आज आपण 'काहीच' करणार नाही! आज आपण फक्त 'हसणार' आहोत! आपण सगळे 'झोलमाल' हा विनोदी सिनेमा बघायला जाऊ. तिथे जेवण करू. मग आल्यावर सगळी कामे आपण सगळे मिळून करू. सिनेमातल्या जोकवर हसत हसत!"

सगळ्यांना ही आयडिया पसंत पडते.

सिनेमाला निघताना त्यांना शशिकांत आणि मीनलच्या घरातून जोराजोराचे भांडणाचे आवाज ऐकू येतात.

(समाप्त)

- निमिष सोनार, पुणे
© निमिष्कृत

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली