अपयशाचे खापर (अर्थ मराठी दिवाळी अंक 2025)

अपयशाचं आणि दु:खाचं 100 टक्के खापर फक्त परिस्थितीवर आणि इतर लोकांवर फोडण्यात तसेच आपले दोष सतत इतरांकडे फॉरवर्ड करण्यात आणि सतत काही ना काही तक्रार करण्यात वाकबगार असलेल्या लोकांच्या मानसिकतेचा घेतलेला हा वेध!

प्रथम "खापर" शब्दाचा अर्थ आणि "अपयशाचे खापर इतरांवर फोडणे" या वाकप्रचारातील त्याचा अभिप्रेत अर्थ समजून घेऊया. खापर म्हणजे मातीपासून बनवलेली भांडी, विशेषतः फोडके किंवा तुटलेले मातीचे भांडे. ग्रामीण भाषेत किंवा पारंपरिक वापरात, "खापर" हे तुटलेल्या मातीच्या भांड्याचे प्रतीक असते, जे आता उपयोगी नाही. "अपयशाचे खापर इतरांवर फोडणे" या वाकप्रचारात "खापर" हे अपयशाचे प्रतीक आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीत अपयश आले, चूक झाली, तर त्याची जबाबदारी स्वतः न घेता ती इतरांवर ढकलणे. जसे तुटलेले खापर कोणावर तरी फोडले जाते, तसंच स्वत:च्या चुकांची किंवा करु न शकलेल्या कामाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या प्रोजेक्टमध्ये चूक झाली, पण बॉसने ती चूक टीमवर ढकलली तर म्हणता येईल की, "बॉसने अपयशाचे खापर टीमवर फोडले." हे वाक्यप्रचार मराठीतील एक प्रभावी आणि चित्रदर्शी उदाहरण आहे, जिथे "खापर" हे दोषाचे प्रतीक बनते.

जीवनात यश आणि अपयश हे दोन्ही अपरिहार्य आहेत. पण काही लोक अपयश स्वीकारण्याऐवजी त्याचं खापर सतत परिस्थितीवर, नशिबावर किंवा इतर लोकांवर फोडतात. ही वृत्ती केवळ आत्मविकासाला अडथळा ठरते असं नाही, तर ती एक प्रकारची मानसिक सुटका बनते, जिथे स्वतःला आरशात पाहण्याची म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची गरजच वाटत नाही. अशी माणसे सतत इतर लोक किंवा परिस्थितीबद्दल तक्रार करत राहतात. कुणी परिस्थिती सुधारण्यासाठी काही सुचवले तर त्यातही त्यांना प्रॉब्लेम दिसतो.

दोषारोप करणाऱ्यांची मानसिकता अशी असते की, ते स्वतःला नेहेमी निर्दोष समजतात. “मी तर सगळं योग्य केलं होतं, पण…” या वाक्याने सुरुवात करणारे लोक स्वतःच्या चुका पाहण्याऐवजी आपल्या सोयीस्कर टॉर्चमधून इतरांवर दोषाचा लाल प्रकाश टाकतात. “ती वेळच चांगली नव्हती”, "सिस्टीमच चुकीची आहे”, अशा कारणांनी स्वतः घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी टाळली जाते. “त्याने मदत केली असती तर…”, “तिचं ऐकलं असतं तर…”, अशी वाक्ये अपयशाचं ओझं दुसऱ्याच्या खांद्यावर टाकतात. एखादे वेळेस यातील काही गोष्टी खऱ्या असतीलही, पण नेहेमीच आपल्या आयुष्यातील घडलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला दुसराच जबाबदार कसा काय? इतरांना दोष देण्याची वृत्ती का निर्माण होते? कारण, स्वतःच्या चुका स्वीकारायला भीती वाटते. अपयशाचं ओझं हलकं करण्यासाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवणं योग्य वाटायला लागतं.

पण त्यामुळे आपणच आपल्याला फसवत असतो आणि स्वतःचा विकास खुंटतो. जेव्हा आपण स्वतःच्या चुका स्वीकारत नाही, तेव्हा सुधारणा करण्याची संधीही गमावतो. समाजात नकारात्मक प्रतिमा निर्माण होते कारण अशा लोकांना ‘कधीच जबाबदारी न स्वीकारणारा’ अशी ओळख मिळते. यामुळे नात्यांमध्येही दुरावा निर्माण होतो, कारण सतत इतरांवर दोष ढकलल्याने एकमेकांवरचा विश्वास कमी होतो, आणि नाती ताणली जातात. नात्यांवर दोष ढकलणं म्हणजे एक प्रकारची भावनिक सुटका झाल्यासारखे वाटते, पण तो एक भ्रम असतो. ही वृत्ती क्षणिक भावनिक सुटका देते, पण नात्यांमध्ये दीर्घकालीन विष पेरते. नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. दोषारोपांमुळे विश्वास कमी होतो, संवाद तुटतो. गैरसमज वाढतात. समोरचा व्यक्ती आपल्यासाठी उगाच स्वतःला दोषी समजतो, जरी त्याचा काही संबंध नसला तरी! कारण तो बिचारा आपल्यावर प्रेम करत असतो आणि आपण त्याचा फायदा घेऊन त्याला दोष देऊन मोकळे होतो. यामुळे स्वतःचं आत्मपरीक्षण थांबतं. सतत इतरांवर बोट ठेवणं म्हणजे स्वतःकडे पाहण्याची संधी गमावणं!

आणखी एक गोष्ट. नशिबावर दोष! कधी काही वाईट घडलं की अनेक जण लगेच म्हणतात, “माझं नशीबच खराब आहे…”, “काय करणार, नशिबातच नाही…”. पण हे म्हणताना ते एक गोष्ट विसरतात. नशीब हे आकाशातून पडत नाही, ते आपल्या कर्माच्या धाग्यांनी विणलेलं असतं. नशीब म्हणजे आपल्याच कर्माचं फलित, जे आपल्या पूर्वीच्या आणि सध्याच्या कृतींवर आधारित असतं. कर्माची विस्मृती झाली की “मी भूतकाळात काय केलंय? मी पूर्वी काहीतरी चुकलो होतो का? कुणाला दुखावलं होतं का?” या प्रश्नाला माणूस टाळू लागतो.

कधी एखादी गोष्ट चुकली, एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं, किंवा मनाला ठेच लागली, तेव्हा परिस्थिती, लोक, वेळ, नशीब हे सगळं दोष घेऊन उभं राहतं. पण जो माणूस शंभर टक्के प्रत्येक गोष्टीसाठी या सर्व गोष्टींना जबाबदार धरतो, तो स्वतःच्या हातात असलेल्या बदलाच्या शक्तीला गमावतो!

नशिबावर मात करण्याचे मार्ग कोणते? तर, कर्मावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला जबाबदार ठरवा. नशीब बदलायचं असेल, तर कृती बदलावी लागते. कधी कधी चांगल्या कर्माचं फलित उशिरा मिळतं. पण मिळतं नक्की! आध्यात्मिक दृष्टिकोन जोपासा. योग, ध्यान, आणि आत्मचिंतन हे कर्माची जाणीव वाढवतात. तक्रारीऐवजी कृती करा. “नशीबच खराब आहे” म्हणण्याऐवजी “नशीब सुधारण्यासाठी मी काय काय चांगले कर्म करू शकतो?” असा विचार आपल्याला यशाच्या दिशेने नेतो!

अपयश आलं की “मी काय चुकलो?” असा प्रश्न विचारणं, स्वत:चे दोष स्वीकारणं हे ताकदीचं लक्षण आहे. चूक मान्य करणं म्हणजे कमजोरी नव्हे, तर आत्मविश्वासाचं प्रतीक असते. परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती हवी. “हे तर घडलं पण, आता पुढे काय?” असा दृष्टिकोन ठेवणं योग्य आहे!

या वृत्तीवर मात करण्याचे मार्ग काय? दोष देण्याऐवजी भावना व्यक्त करा. “मला एकटं वाटलं” असं म्हणणं हे “तू साथ दिली नाहीस” पेक्षा अधिक प्रभावी आणि संवेदनशील वाटतं.

‘मी’ पासून सुरुवात करा. “मी कदाचित चुकीचा निर्णय घेतला…”, “मी अवाजवी अपेक्षा ठेवल्या…”, अशी सुरुवात संवादात प्रामाणिकपणा आणते.

हे लक्षात ठेवा की, जीवनात प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मेहनत करावी लागते. पण ही मेहनत जर “ओझं” वाटू लागली, तर ती प्रेरणा देत नाही, ती थकवते! “मला हे करावं लागतंय” हा दृष्टिकोन म्हणजे एक अशी जड मानसिक साखळी आहे जी व्यक्तीला यशाच्या दिशेने चालूच देत नाही, जखडून ठेवते! या मानसिकतेचं स्वरूप कायम तक्रार करणे हेच असतं. काम करताना समाधान नाही, फक्त तक्रार! “सगळे मजेत आहेत, आणि मीच राबतोय…” अशी भावना निर्माण होते. आपण मेहनत का करतोय, हेच विसरायला होतं! म्हणजे, "आपल्याला कुटुंबासाठी काम करावं लागतं आहे", याचाही दोष कुटुंबावर दिला जातो. पण तुम्ही हे विसरता, की कुटुंब हाच तर तुमचा आधारस्तंभ आहे. तुमचं कुटुंब तुमच्यासाठी काय काय करतं, याचा खोलवर विचार केला आहे का?

या सगळ्या दोषारोपाचा परिणाम काय होतो? तर, उत्साह हरवतो. कामात आनंद वाटत नाही! नात्यांमध्ये कटुता येते. “तुमच्यासाठीच तर ही सगळं करतोय”, "मी तुला लहानपणी खूप सांभाळलं, त्याचं तू हे पांग फेडलं" हे वाक्य समोरच्या व्यक्तीच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करतं, कारण ते वाक्य प्रेरणेतून किंवा प्रेमातून नाही, तर तक्रारीमुळे निर्माण होते!

दोष देण्याची वृत्ती नष्ट करून यशस्वी होण्यासाठी दृष्टिकोनात बदल कसा करावा? “मला करावं लागतंय” ऐवजी “मी हे करणं निवडलंय” असे म्हणणे! काम हे ओझं नाही, तर स्वतःची निवड आहे असे म्हणणे. “मी कुटुंबासाठी काम करतोय” ऐवजी “माझ्या प्रेमाच्या लोकांसाठी मी माझे योगदान देतोय” असा विचार करणे! याचा अर्थ फक्त कामच करायचं असं नाही, तर स्वतःसाठी आनंदाचे क्षणही हवेत, जे मानसिक ताजेपणा देतात, जे छंद जोपासून आणि आवडीचे काम करण्यातून मिळतात. प्रेरणादायक लोकांचा सहवास आपल्याला योग्य विचार करायला मदत करतो!

दोष देण्याच्या मानसिकतेची वैशिष्ट्यं म्हणजे कृतज्ञतेचा अभाव! जेव्हा गोष्टी चांगल्या घडतात, तेव्हा असे लोक “हे मी केलं” म्हणतात. जेव्हा गोष्टी चुकतात, तेव्हा “याच्यामुळे किंवा त्याच्यामुळे झालं” असं म्हणतात आणि इतरांनी केलेली मदत, समर्पण, किंवा साथ याकडे दुर्लक्ष केलं जातं. मदत विसरण्याची वृत्ती घातक आहे. एखाद्याने पूर्वी अनेकदा वेळेवर साथ दिली, मार्गदर्शन केलं, किंवा मदत केली, हे सोयीस्कररित्या विसरलं जातं. पण एखाद्या प्रसंगी कुणाकडून मदत मिळाली नाही, तर ती गोष्ट मात्र वारंवार आठवली जाते. असे लोक तत्त्वाऐवजी व्यक्तीवर लक्ष देतात. “काय बरोबर?” या प्रश्नाऐवजी “कोण बरोबर?” या प्रश्नावर भर देतात. व्यक्तीच्या विचारांवर किंवा वागणुकीवर टीका करण्यापेक्षा व्यक्तीवर टीका करणे, ही वृत्ती संवादात कटुता निर्माण करते आणि दोष देण्याच्या वृत्तीला बळकट करते.

या मानसिकतेतून बाहेर पडण्याचे मार्ग म्हणजे, कृतज्ञता जोपासा. तत्त्वांवर लक्ष केंद्रित करा. स्वतःची जबाबदारी स्वीकारा. अपयशांमध्ये आणि चुकांमध्ये स्वतःचा वाटा किती आहे तो शोधा. ते आत्मविकासाचं पहिलं पाऊल आहे. इतरांच्या मदतीचं स्मरण ठेवा. एखाद्या व्यक्तीने पूर्वी अनेकदा मदत केली असेल, आणि नंतर फक्त एकदा मदत केली नाही म्हणून त्याचं आधीचं योगदान विसरू नका.

- निमिष सोनार, धानोरी, पुणे 

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली