इमोजी – भावना व्यक्त करणारे डिजिटल मुखवटे (साहित्य प्रवाह दिवाळी अंक 2025)

आजचा काळ म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया आणि चॅटिंगचा काळ. एकमेकांशी संवाद साधताना प्रत्यक्ष भेटीत जशा आपल्या चेहऱ्यावरच्या भावना बोलक्या होतात, तशी आता या भावनांची जबाबदारी इमोजींवर आली आहे. प्रत्यक्ष संवादात आपला चेहरा, डोळे आणि आवाज भावना पोहोचवतात, पण मोबाईलवरील चॅटिंगमध्ये ही जबाबदारी घेतली आहे इमोजींनी! इमोजी म्हणजे फक्त रंगीत चित्रं नाहीत, तर ते डिजिटल संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. “इमोजी” हा शब्द जपानी भाषेतून आला आहे. “E” चित्र आणि “Moji” = अक्षर. म्हणजेच “चित्र-अक्षर”. पहिले इमोजी १९९९ साली शिगेटाका कुरिता यांनी तयार केले. युनिकोड कॉनसॉरटियम  नावाची आंतरराष्ट्रीय संस्था नवीन इमोजी मंजूर करते. सध्या (2025 पर्यंत) ३,८०० पेक्षा जास्त इमोजी उपलब्ध आहेत. दरवर्षी १७ जुलै हा “जागतिक इमोजी दिन” म्हणून साजरा केला जातो.

कधी कधी एखादं वाक्य कोरडं वाटू शकतं, पण त्यात इमोजी टाकल्यावर मूड लगेच समोरच्या व्यक्तीला समजतो. टेक्स्टमध्ये टोन नसतो, त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता असते. इमोजी वापरल्याने नेमकी भावना स्पष्ट होते. फक्त शब्दांपेक्षा इमोजी संवाद रंगीत आणि जिवंत करतात. ते एखाद्या भाषणातील हावभावांसारखे असतात. काही भावना शब्दांनी व्यक्त करायला वाक्य लागतं, पण इमोजीने ते एका क्षणात होतं. मित्र, कुटुंब किंवा प्रिय व्यक्तींसोबत इमोजी वापरल्याने संवाद हलकाफुलका, आपुलकीचा आणि जवळीक निर्माण करणारा होतो. भाषेची अडचण असली तरी इमोजी ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे. इमोजी म्हणजे डिजिटल संवादातील भावनांचे शॉर्टकट. ते शब्दांना जिवंत करतात, भावना स्पष्ट करतात, गैरसमज टाळतात आणि नाती मजबूत करतात. 

चॅटिंग करतांना जास्त स्मायली कोण वापरतं? खूप इमोशनल किंवा भावनाप्रधान असणारे लोक? बरोबर ना? पण स्मायलीपेक्षा इमोजी हा शब्द बरोबर आहे, कारण रडणाऱ्या चेहऱ्याला स्मायली कसे म्हणणार बरं? अन्यथा आपल्याला वेगवेगळ्या श्रेणी निर्माण कराव्या लागतील जसे स्मायली, क्रायली, अँग्रीली, सॅडली! असो!

माझ्या निरीक्षणानुसार काहीजण इमोशनल असूनही चॅटिंगदरम्यान इमोजी वापरताना कंजुषपणा करतात म्हणजे इमोजीचा वापर जवळपास करतच नाहीत किंवा फार थोडा करतात. भावना लपवतात! असे लोक कोणते असतात?

समोरासमोर गप्पा मारताना आपल्याला ज्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय चाललं आहे हे बिलकुल कळत नाही, किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नाही (किंवा ते मुद्दाम दिसू देत नाहीत), हे तेच लोक असतात जे चॅटिंग करतांना इमोजीचा वापर करत नाहीत! म्हणजे, थोडक्यात जे मनमोकळे नाहीत, असे लोक!

ते फक्त वाक्य लिहितात. बरेचदा त्यांच्या वाक्यात उद्गारवाचक चिन्हसुद्धा नसतं! भले त्यांच्या मनात आणि शरीरात विविध भावना पिंगा घालतही असाव्यात, पण त्या व्यक्ती इतरांना जसे चेहऱ्यावरून ते जाणवू देत नाहीत तसेच, चॅटिंगमध्ये सुद्धा ते त्या भावना इमोजी वापरून व्यक्त करत नाहीत!

अर्थात, ऑफिसमधील सहकाऱ्यांसमवेत किंवा बॉस सोबत चॅट करतांना आणि कुणाही विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत चॅट करतांना मात्र आपण इमोजीचा वापर विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक केला पाहिजे हे खरे आहे. कारण, शेकडो इमोजी आहेत आणि त्या प्रत्येकाचा नीट अर्थ बरेचदा आपल्याला माहिती नसतो. स्थळ, काळ, व्यक्ती, देश, वय आणि संदर्भ यानुसार त्याच इमोजीचा अर्थ बदलतो किंवा वेगळा घेतला जाऊ शकतो. जसे की दोन व्यक्ती एकमेकांना टाळ्या देणारा इमोजी आपण नमस्कार या अर्थाने वापरतो. पण, नातेसंबंध, मैत्री, ऑफिस असो, की मग विरुद्धलिंगी व्यक्ती असो, चॅटिंग करणाऱ्याशी तुमचे किती बंध जुळले आहेत त्यानुसार इमोजीचा वापर ठरतो. असे असेल तर इमोजींचे मनमोकळेपणाने आदान प्रदान होते आणि या इमोजींच्या ट्रॅफिकमध्ये एखादा इमोजीचा वापर चुकलाही तरीही समोरच्याला फारसे त्याबद्दल काही वाटत नाही म्हणजे इमोजीचा अपघात होत नाही.

अनेकदा बरेचजण 🤗 हा इमोजी वेलकम म्हणून वापरतात पण त्याचा खरा अर्थ आलिंगन देणे  असा आहे.

काही लोक चॅटिंग करताना अक्षरशः इमोजींचा वर्षाव करतात. त्यांना “हो” एवढं म्हणणं पुरेसं वाटत नाही; ते “हो 😃👌✨” असं लिहून स्वतःचा मूड स्पष्ट करतात. अशा लोकांचा स्वभाव बहुधा मनमोकळा, जिवंत आणि इमोशनल असतो. ते आपल्या भावना लपवत नाहीत, उलट त्या आणखी जास्त प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचाव्यात असं त्यांना वाटतं.

 “चल उद्या भेटू या.” हे साधं वाक्य आणि “चल उद्या भेटू या 😍🤗🎉” ही उत्साह आणि आपुलकी झळकणारी आवृत्ती, यातील फरक लक्षात आला का?

काही लोकांचा संवाद मात्र अगदी सरळ आणि कोरडा वाटतो. त्यांची उत्तरं बहुतेक अशीच असतात – “हो.” “ठीक.” “येईल.” त्यात 🙂, 😅 किंवा ❤️  कुठेच दिसत नाही.

 हे लोक खऱ्या आयुष्यातही थोडे अबोल, अंतर्मुख किंवा भावनांना कंट्रोलमध्ये ठेवणारे असतात. कधी कधी ते फक्त डिजिटल अभिव्यक्तीत लाजरे किंवा अस्वस्थ असतात.

आपण कळवले की “आज माझं प्रेझेंटेशन खूप छान झालं!” त्यावर एक मित्र म्हणतो “ठीक आहे.” तर दूसरा म्हणतो, “वा! 👏🔥 खूपच भारी रे!”

कोणत्या उत्तरामुळे तुमचा आनंद दुप्पट होतो?

काही लोक प्रत्यक्ष आयुष्यात जरी हसत असले, रागावलेले असले किंवा दुःखी असले, तरी त्यांचा चेहरा भावनाहीन दिसतो. ते मुद्दाम भावनांना मुखवट्यामागे ठेवतात. त्यामुळे चॅटिंगमधील त्यांचा स्टाईलही तशीच! फक्त वाक्य. फक्त पूर्णविराम. कधी कधी उद्गारवाचक चिन्हसुद्धा नाही. म्हणजे, प्रत्यक्ष जगातले “मुखवटाधारी” लोक डिजिटल जगातही इमोजीशिवायच असतात.

ऑफिसच्या चॅटमध्ये किंवा बॉससोबत बोलताना लोक इमोजी वापरण्यापूर्वी दहा वेळा विचार करतात. कारण चुकीचा इमोजी वापरला तर तो हलकासा गैरसमजही निर्माण करू शकतो. कुणीतरी लिहिलं: “मी फाईल उद्या दुपारी देतो.”  एक उत्तर आलं, “ठीक आहे.” जे खूप औपचारिक आहे आणि दुसरं उत्तर आलं, “ठीक आहे 🙂” जे थोडं मित्रत्वाचं वाटतं. एक छोटासा 🙂 संवादात किती बदल घडवतो हे लक्षात येतं.

मैत्रीत, रिलेशनशिपमध्ये किंवा घट्ट नात्यांत इमोजींचा वापर अगदी मुक्तपणे होतो.

“गुड मॉर्निंग  ❤️☕🌞”

“तुझी कमतरता जाणवते! 😘💫💌”

“काय करतेस? 🤔😅😂”

इथे इमोजी फक्त चित्रं नसतात, तर ते भावनांचे तात्काळ दूत असतात. समोरच्याला आपली भावना शब्दांपेक्षा पटकन आणि स्पष्टपणे समजते. इमोजी हे फक्त रंगीत चिन्ह नाहीत. ते आपल्या भावनांचे डिजिटल मुखवटे आणि दूत आहेत. जे मनमोकळे आहेत ते इमोजींचा वर्षाव करतात. जे भावना लपवतात ते इमोजी टाळतात आणि नातं जसं घट्ट होतं तसं इमोजींचं प्रमाणही वाढतं.

इमोजीवर आधारीत एक अॅनिमेशन चित्रपट आला होता. हा चित्रपट मोबाईलमधल्या टेक्स्टॉपोलिस नावाच्या जगात घडतो. तेथे सगळे इमोजी जिवंत असतात आणि प्रत्येक इमोजीचं एकच ठरलेलं एक्सप्रेशन किंवा भाव असतो. जरी हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांना फारसा आवडला नाही, तरी त्याचा संदेश असा आहे की, आपल्या वेगळेपणातच आपली खरी ताकद आहे आणि प्रत्येकाला एकच चौकटीत बसवण्यापेक्षा त्याची वेगळी खासियत स्वीकारली पाहिजे.

कोर्टात (न्यायालयात) इमोजीचा वापर ग्राह्य धरला जातो का? कोर्टात व्हाट्सएप चॅट्स पुराव्यासाठी दाखवले जातात, तेव्हा त्या चॅटमधले इमोजीही पुरावा मानले जातात. उदाहरणार्थ,  धमकीच्या मेसेजसोबत 🔪, 💣 असे इमोजी असल्यास ते आशय स्पष्ट करतात. कधी कधी एका इमोजीचा अर्थ वेगवेगळा लागू शकतो. उदाहरणार्थ 😉 हा इमोजी  कुणाला फ्लर्ट वाटू शकतो, तर कुणाला फक्त मजा. म्हणून वकिलांना आणि न्यायाधीशांना त्या इमोजीचा संदर्भानुसार अर्थ समजावून घ्यावा लागतो.  अमेरिकेत अनेक खटल्यात इमोजींचा उल्लेख पुरावा म्हणून झाला आहे.

-----

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली