काळभेट


1957 साली “ट्रान्स नॉर्दर्न एअरवेज” या कंपनीचं एक विमान, फ्लाइट KB713, शिकागोहून व्हॅनकुव्हरला जात असताना कॉलॉरडो येथे अचानक गायब झालं. म्हणजे त्यानंतर त्या विमानाचा संदेश नियंत्रण कक्षाला मिळाला नाही.

कॉलॉरडो हे थोडं दक्षिणेकडे आहे, त्यामुळे बहुतेक वेळा शिकागो ते व्हॅनकुव्हर हा मार्ग कॉलॉरडोवरून जात नाही, पण काही फ्लाइट KB713 हे त्याच्या नियोजित मार्गातून भरकटले होते कारण त्याच्या पायलटस् ला समोर आकाशात काहीतरी अभद्र आकृत्या दिसल्या म्हणून त्यांनी मार्ग बदलला आणि ते कॉलॉरडोच्या हवाई क्षेत्रातून जाऊ लागले होते. पण तिथेही त्या आकृत्यांनी त्यांची पाठ सोडली नव्हती.

त्याचा शेवटचा संदेश होता: “Mayday! इंजिन निकामी झालंय. आम्ही कोसळतो आहोत” आणि त्यानंतर रेडिओवर शांतता पसरली.

नंतर, विमान, प्रवासी, पायलट कोणीच कधीही आणि कुठेही सापडलं नाही.

त्यानंतर 66 वर्षांनी, म्हणजे 2025 मध्ये, “स्काय-कनेक्ट एअरलाईन्स”चं एक विमान "फ्लाइट JD221", न्यूयॉर्कहून सिएटलला जात होतं.

त्यात नॅथन हॉल हा अनुभवी पायलट होता. त्याच्यासोबत होती एमी रोड्स, सुंदर, उत्साही आणि हुशार कोपायलट.

रात्रीची वेळ होती.

विमान कोलोरॅडोच्या आकाशात शिरलं होतं.

ढग खाली होते पण हवामान शांत होते.

अचानक रेडिओवरून हलका आवाज आला.

“This is Flight KB713… Mayday… Anyone hearing us?”

एमीने भुवया उंचावल्या.
“नॅथन, ही KB713 कोणती फ्लाइट आहे? माझ्या ऐकण्यात नाही”

नॅथन थोडा गोंधळला.
“हे शक्य नाही. या नावाची एकाच फ्लाइट होती आणि ती तर 1957 साली गायब झाली होती.”

पुन्हा रेडिओतून आवाज आला:
“जर कोणी माझा आवाज ऐकत असेल, तर माझी पत्नी एलिनॉरला सांगा की, मी तिच्यावर जिवापाड प्रेम करतो.”

येणारा आवाज थरथरत होता.

एमीने रडार स्क्रीनकडे पाहिलं.

तिथे एक सिग्नल दिसत होता:
“Flight KB713 – 20 miles ahead.”

आणि त्याच क्षणी ढगांच्या पलीकडे, त्यांच्या समोर एक जुने निळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचं विमान क्षणभर दिसले.

जुन्या काळातील विमान!

त्याच्या काचेच्या खिडक्यांतून कुणीतरी हात हलवताना दिसत होतं.

“तुम्ही तिकडे पाहिलंत का?” एमीने किंचाळत विचारलं.

नॅथनने तिकडे बघत होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, “हो बघतोय. पण हे अशक्य आहे.”

त्या क्षणापासून सगळं बिघडू लागलं.

विमानाचं ऑटोपायलट काम करणं बंद झालं.

सगळ्या स्क्रीन ब्लँक झाल्या.

नॅथन घाईघाईने रेडिओवर बोलला:
“KB713! आम्हाला ऐकताय का? आम्ही नियंत्रण गमावतोय!”

तिकडून आवाज आला:
“आम्ही पण असंच नियंत्रण गमावलं होतं. खूप पूर्वी. पण आम्ही कधी कोसळलो नाही बरं का! आम्ही अजूनही उडत आहोत. पण आम्हाला असा अनंतकाळ उडत राहण्याचा कंटाळा आला आहे. आधी आम्हाला खाली कोसळून मरण्याची भीती वाटत होती. विमानातील आम्हा सर्व व्यक्तींची तीव्र इच्छाशक्ती विमानाला खाली कोसळण्यापासून रोखत होती. पण आता? आमची स्थिती अशी झाली आहे की आमच्याकडे बघवलं जाणार नाही तुम्हाला. आता सर्वांना एकत्रितपणे वाटतंय की, नको आता हे अनंतकाळ उडत राहणं. आता मृत्यू हवा आहे. विमानातील सर्व प्रवाशांचे तेच म्हणणे आहे!"

ते शब्द ऐकताच JD221 विमान जोरात हादरलं, आणि ढगांच्या दरम्यान दोन्ही विमानं एकाच ठिकाणी एकत्र दिसली. एक वर्तमानकाळातील आणि एक भूतकाळातील. दोन्ही एकमेकांत हळूहळू मिसळली, जणू काही पांढऱ्या धुराने बनवलेल्या दोन विमानांच्या आकृत्या एकमेकांत घुसल्या.

आणि नंतर, सगळा अंधार!

दोन दिवसांनी शोधपथक रॉकी पर्वतांच्या खोल दरीत पोहोचलं. त्यांना स्काय-कनेक्ट फ्लाइट JD221 चे अवशेष सापडले.

आश्चर्य म्हणजे, त्याच ठिकाणी 1957 च्या फ्लाइट KB713 चे तुकडेही पडलेले होते, जे 1957 सालापासून आजपर्यंत कुणालाही सापडले नव्हते.

(ही कथा काल्पनिक आहे)

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली