ऐतिहासिक पौराणिक मालिका आणि चित्रपट यांचे सुगीचे दिवस (सप्तर्षि दिवाळी अंक 2025)

 

मी लहान होतो तेव्हा दूरदर्शनवर रामानंद सागर यांचे रामायण, तसेच चाणक्य आणि बी आर चोप्रांचे महाभारत लागायचे. तेव्हाही त्या वयातल्या आकलनाप्रमाणे मला त्याबद्दल खूप उत्सुकता आणि कुतूहल असायचे. दर शनिवारी त्या वेळेस लोकमत पेपरसोबत येणाऱ्या चित्रगंधा पुरवणीत महाभारताचे शूटिंग रिपोर्ट यायचे, तेही आवडीने मी वाचायचो. त्यावेळेस नुकतेच चित्रलेखा साप्ताहिक सुरू झाले होते, त्यातही मालिकांबद्दल माहिती यायची. नंतर चित्रलेखाचे जी नावाचे सिनेमा क्षेत्राला वाहिलेले मासिक आले परंतु ते कालांतराने बंद पडले. आता तर चित्रलेखा पण बंद झाले. 

नंतर दूरदर्शनला स्पर्धा सुरू होऊन खासगी वाहिन्या एका पाठोपाठ एक सुरू झाल्या. बी आर चोप्रांच्या महाभारत नंतर पुन्हा महाभारत बनवण्याचा प्रयत्न लवकर कुणी केला नाही. रामानंद सागर यांनी उत्तर रामायण आणि श्रीकृष्ण नावाची सिरीयल मात्र बनवली होती. मग मला आठवते की, स्टार प्लसवर एकता कपूरने महाभारत सुरू केले होते, परंतु तिला ते जमले नाही आणि लोकांचा रोष पत्करून बंद करावे लागले. मग प्रेक्षकांना असे वाटायला लागले की, बी आर चोप्रा व्यतिरिक्त कोणी दुसरा व्यक्ती महाभारत बनवू शकत नाही आणि मग उजाडले 2013 हे साल!  सिद्धार्थ कुमार तिवारी या व्यक्तीने हिम्मत करून स्टार प्लस वर महाभारत सुरू केले आणि त्याला ते इतके चांगले जमले की, सिद्धार्थ कुमार तिवारीकडे पौराणिक मालिकांची एकाधिकारशाही झालेली आहे की काय असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अर्थात सुरुवातीला त्यानेही सावध पवित्रा घेतला. महाभारतासाठी ज्या कलाकाराला त्याने भीष्म म्हणून घेतले होते त्याला बी आर चोप्राच्या महाभारतातील मुकेश खन्नासारखा आवाज काढायला भाग पाडले होते. कारण पहिल्यांदा बनवलेल्या महाभारताचा प्रभाव लोकांच्या मनावर दीर्घकाळ होता. पण नंतर हळूहळू त्याच्या स्वतःच्या स्टाईलला यश यायला लागल्यानंतर सुर्यपूत्र कर्ण मधला भीष्म अतिशय वेगळा होता.

दर आठवड्याला एक भाग याप्रमाणे ठराविक भागात दूरदर्शनसाठी महाभारत बनवणे वेगळे आणि रोज डेली सोप या प्रकारात महाभारत बनवणे वेगळे! सिद्धार्थ कुमार तिवारीने ते आव्हान स्वीकारले आणि त्यात तो यशस्वी पण झाला! त्यानंतर त्याने पोरस ही सोनी टीव्हीवरील (राजा पुरुषोत्तम, चाणक्य आणि सम्राट अलेक्झांडर यांच्यावर आधारित) ऐतिहासिक मालिका (आणि त्याचा सिक्वेल चंद्रगुप्त मौर्य) तसेच राधाकृष्ण, राम सिया के लवकुश, सूर्यपुत्र कर्ण अशा अनेक यशस्वी डेली सोप धारावाहिक दिल्या. पोरस मालीकेत तर पोरस पेक्षाही अलेक्झांडरचा भाग चांगला जमून आला होता. बरेचदा सिद्धार्थ काही प्रसंगांना बेमालूमपणे ट्विस्ट द्यायचा परंतु त्या इतक्या खऱ्या, योग्य आणि लॉजिकल वाटायच्या की, आपल्याला वाटायचे हे असेच नक्की घडले असावे. कारण ऐतिहासिक पौराणिक मालिकांमध्ये काही गोष्टी अस्पष्ट असतात, काही प्रसंगांचा उल्लेख पूर्ण नसतो, काही कालखंडाचे संदर्भ कुठेच उपलब्ध नसतात. मग हे कौशल्य त्या दिग्दर्शकाचे किंवा लेखकाचे असते की तो गॅप काल्पनिकरित्या परंतु खरा वाटेल अशा पद्धतीने आणि मूळ कथेच्या प्रवाहाला धक्का न लागता कसा भरून काढायचा. त्याची कर्मफलदाता शनि ही सिरियल मात्र तितकीशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही. त्यापेक्षा शेमारू टीव्ही वरील कर्माधिकारी शनिदेव ही तुलनेने चांगली आहे.  

पूर्वी पौराणिक मालिका ठराविक प्रेक्षकवर्ग बघायचा बहुतेक करून फक्त महिला आणि ज्येष्ठ. पण आज ज्या पद्धतीने सिद्धार्थ त्या कथा आपल्यासमोर मांडतो त्यामुळे आजची पिढीसुद्धा त्या आवडीने बघते आणि मला वाटते त्याचे एकच कारण आहे की त्याने सर्व गोष्टी लॉजिकली एक्सप्लेन (तर्कशुद्ध स्पष्टीकरण) करून सांगितल्यामुळे त्या मनाला पटतात. हे असेच का आणि ते तसेच का अशी विचाणारी आजची पिढी या सिद्धार्थच्या मालिकांमधून आपले उत्तर शोधण्यात यशस्वी होते. नुकतेच सोनी टीव्ही वरचे त्याचे "श्रीमद रामायण" सुद्धा लोकप्रिय झाले त्याचे कार्य हेच! तसेच खास हनुमानावर पण एक सिरियल सिद्धार्थ आता सोनीवर घेऊन आला आहे. 

मला आठवतं की, एनडीटीव्ही इमॅजिन या चॅनेलवर चंद्रगुप्त मौर्यवर आधारित मालिका लागायची. तीही बर्‍यापैकी यशस्वी झाली होती. चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य हे दोन्ही आजपर्यंत सर्वानाच भुरळ घालत झालेले आहेत. 

फक्त सिद्धार्थ कुमार तिवारीच नाही तर इतर ही अनेक प्रोडक्शन हाऊसेसनी यशस्वी पौराणिक आणि ऐतिहासिक धारावाईक दिल्यात. 

जसे महाबली हनुमान सोनी टीव्ही, पृथ्वी वल्लभ सोनी टीव्ही, श्रीमद्भागवत कलर्स, जोधा अकबर झी टिव्ही, सोनी टीव्ही पेशवा बाजीराव, अशी अनेक उदाहरणे देता येतील. कलर्स टीव्हीवर सम्राट अशोकच्या जीवनावर अत्यंत उत्कृष्ट मालिका येऊन गेली परंतु सम्राट अशोक वयाने मोठा झाल्यानंतर जो कलाकार यात घेतला होता (ज्याने अतिशय यशस्वी सिरीयल देवों के देव महादेव मध्ये भगवान शंकरांची उत्कृष्ट भूमिका साकारली होती - मोहित रैना) त्याला ते काम जमले नाही व तो सिद्धार्थ निगम (कुमारवयीन अशोक) पेक्षा अचानक खूप थोराड वाटला आणि प्रेक्षकांनी त्याला सम्राट अशोक म्हणून सपशेल नाकारले. त्यामुळे दिग्दर्शकाला घाईघाईने सिरीयल आटोपती घेऊन संपवावी लागली. परंतु सम्राट अशोक मोठा होईपर्यंतचा काळ अतिशय उत्कृष्टपणे त्यात दाखवला गेलेला होता. सिद्धार्थ निगम या अभिनेत्याची तर कमालच होती. आपला मराठमोळा समीर धर्माधिकारी याची पण बहुतेक अशा सर्व  सिरीयलमध्ये महत्त्वाची भूमिका असते. तो राजा म्हणून शोभून दिसतो. जसे शंतनू राजा- महाभारत आणि बिंदुसार राजा- सम्राट अशोक मालिका!

पूर्वीपेक्षा आताच्या मालिका दृश्य स्वरूपात अधिक प्रेक्षणीय होतात कारण आता स्पेशल इफेक्ट, व्हीएफएक्स तंत्रज्ञानाची जोड देता येते. त्यामुळे पौराणिक कथांमधील अद्भुत आणि चमत्कारिक गोष्टी पूर्वीच्या काळापेक्षा तुलनेने अधिक चांगल्या आणि परिणामकारक पद्धतीने दाखवता येतात.

आता ऐतिहासिक आणि पौराणिक पालिका म्हटलं म्हणजे भरपूर कलाकार, त्या काळातील वेशभूषा केशभूषा यांच्यावर खर्च तसेच सोने दाग दागिने, त्या काळातील गाव आणि शहर उभे करणे, स्पेशल इफेक्ट, घोडे वगैरे यांचा वापर त्यामुळे खर्च अफाट येतो आणि त्या काळाबद्दल भरपूर अभ्यास करून, वाचन करावे लागते, वेगवेगळ्या व्यक्तींना भेटावे लागते, काही वेळेस काही संदर्भ, प्रसंग, व्यक्तिचित्रण चुकल्यास लोकांचा रोष ओढवून घेण्याचा धोका असतो. एवढे सगळे आव्हान पेलून सिद्धार्थ कुमार तिवारी आणि इतर प्रॉडक्शन हाऊसेस या मालिका बनवत आहेत, त्यांचे खरच अभिनंदन करायला हवे.

काही लोक ऐतिहासिक पौराणिक मालिकांवर टीका करतात परंतु त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, कमीत कमी त्यानिमित्ताने इतिहास जाणून घेण्याची लोकांची वृत्ती जागृत होते. मग लोक मालिकेच्या अनुषंगाने त्या संदर्भातील इतर पुस्तके वाचू लागतात त्यामुळे एक प्रकारे ज्ञानात भरच पडते. 

सासू-सून, विवाहबाह्य संबंध, घरगुती कट-कारस्थान दाखवणाऱ्या सिरीयलपेक्षा हे केव्हाही चांगलेच, नाही का!

मराठी टेलिव्हिजनवर शक्यतो ऐतिहासिक पौराणिक मालिका जास्त बनत नव्हत्या. परंतु आताशा बनायला लागल्या आहेत. मला ईटीव्ही मराठी (जे आता कलर्स मराठी झाले आहे) वरची बाजीराव मस्तानी ही मालिका मला आवडली होती. पूर्वी दूरदर्शन सह्याद्रीवर स्वामी मालिका लागायची परंतु त्यावेळेस ती काही कारणास्तव मी बघू शकलो नव्हतो. कालांतराने महेश कोठारे यांनी गणपतीवर मालिका बनवली ती यशस्वी झाली. तसेच जय मल्हार मालिका पण यशस्वी झाली. कलर्स मराठीवरची स्वामिनी ही अतिशय सगळ्याच बाजूंनी उत्कृष्टपणे जमून आलेली मालिका आहे. स्टार प्रवाह वरील काही वर्षांपूर्वीची छत्रपती शिवाजी महाराज, तसेच झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी आणि सोनी मराठी वरील स्वराज्यजननी जिजामाता याही मालिका चांगल्या आहेत. 

या सर्व ऐतिहासिक पौराणिक सिरियल्सना काही प्रसिद्ध लेखकांनी आणि इतिहास तज्ज्ञांनी सल्लागार म्हणून मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय अशा सिरीयल बनवणे केवळ अशक्य! जसे देवदत्त पट्टनायक, आनंद निळकांतन वगैरे.  

सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांचे वरील सिरियल येऊन गेल्यात. रामायण एकदा झी टीव्हीने बनवले होते परंतु ते माझ्या बघण्यात आले नाही आणि त्याची जास्त चर्चाही ऐकिवात नाही. स्टार प्लसवर सिया के राम ही सिरियल आली होती त्यात रामायणात सगळ्यांना माहीत नसलेले वेगळे प्रसंग मुद्दामून टाकण्यात आले होते. परंतु मला वाटते त्यामुळे लोकांना ती सिरीयल फारशी आवडली नसावी. याबद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते.

चित्रपटांबद्दल बोलायचं असेल तर शक्यतो ऐतिहासिक पार्श्वभूमीवर चित्रपट फारसे बनत नव्हते परंतु मालिकांना यश मिळायला लागल्यानंतर चित्रपट क्षेत्रात पण ऐतिहासिक पौराणिक आणि चरित्र चित्रपट बनवण्याची लाट आली.

पूर्वी लहानपणी मी ऐतिहासिक चित्रपट पाहिल्याचे मला आठवत नाही (पण बरेच चित्रपट बनत होते हे मी ऐकून आहे) परंतु आताशा शाहरुखचा अशोका, प्रभासचा बाहुबली, रजनीकांतचा कोचादाईयान, आशुतोषचा पानिपत आणि जोधा-अकबर, संजय लीला भन्साळी यांचे बाजीराव मस्तानी, पद्मावत, अजय देवगणचा तान्हाजी, छावा याप्रकारे ऐतिहासिक चित्रपटांची लाटच आली. 

तसेच चरित्र चित्रपटांची (म्हणजे बायोपिक) ही लाट आली. काही वेळेस तर एकाच दिवशी एकाच व्यक्तिरेखेवर दोन चित्रपट प्रदर्शित झाले. उदाहरण घ्यायचे झाले तर शहीद भगतसिंग. बॉबी देवल आणि अजय देवगण यांचा चित्रपट एकाच वेळेस रिलीज झाला. मेरी कोम, मांझी, फर्जंद, फत्तेशीकस्त, प्रकाश बाबा आमटे, लोकमान्य, वीर सावरकर, बापू विरु वाटेगावकर, पानसिंग तोमर, बँडिट क्वीन, बोस द फॉरगोटन हिरो, सरबजीत, राजा रवी वर्मा वर आधारित रंग रसिया, सुपर 30, ठाकरे, पॅडमॅन, माणिकर्णिका, सिंधुताई सपकाळ, आनंदी गोपाळ, अजहर, सूरमा, एकसिडेंटल प्राईम मिनिस्टर, मंगल पांडे, गुरू (धीरूभाई अंबानी), सरदार, नीरजा, भाग मिल्खा भाग, तेंडुलकर, इतकेच नाही तर सिनेमा क्षेत्रातील व्यक्तिरेखांवर पण चित्रपट निघायला लागले, उदाहरणार्थ संजू, काशीनाथ घाणेकर, हरिश्चंद्राची फॅक्टरी, सिल्क स्मिता वर आधारित डर्टी पिक्चर, बालगंधर्व, नटरंग वगैरे.

निरर्थक त्याच त्याच विषयांवर आधारित प्रेमकथा किंवा अति हिंसाचार दाखवणारे गुन्हेगारी चित्रपट बनवण्यापेक्षा तर ऐतिहासिक, पौराणिक आणि चरित्रपट केव्हाही चांगलेच असे माझे मत आहे!!

शकुंतला देवी आणि उडान हे चरित्रपट सुद्धा चांगले आणि प्रेरणादायी आहेत. उडान हा डेक्कन एयर या विमान कंपनीची कहाणी आहे. झी टीव्हीवर अहम शर्मा, मकरंद देशपांडे आणि सूरज थापर यांची विक्रम वेताळ ही सिरियलसुद्धा छान आहे.


Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली