आठवणींची भेळ (काव्यगंध दिवाळी अंक 2025)
गावात पुन्हा एकदा पारंपारिक जत्रा भरली होती. रंगीबेरंगी पताका आकाशाला स्पर्श करत होत्या, भेळ-पाणीपुरीच्या गाड्यांवरून मसाल्याचा सुवास येत होता, आणि लहानग्यांचा हसण्याचा गोंगाट चारही बाजूंनी घोंघावत होता. संध्याकाळच्या गार वाऱ्यात विविध दुकानांतून संगीताचे ताल ऐकू येत होते, ज्यावर तरुण-तरुणी झुलत होते. कुणी मृत्यूला आव्हान देऊन मौत का कुआ खेळत होतं. जत्रेतील लायटिंग आणि आकाशातील पूर्ण चांदण्यांनी गाव उजळले होते. सर्वजण थोड्या वेळासाठी आपली दुःखे विसरून जत्रेत सामील झाले होते.
त्या रंगीबेरंगी गर्दीत, सुमेधा आपल्या नवऱ्याबरोबर हळूच चालत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचा हलका भाव होता, पण डोळ्यांत एक गूढ उदासी लपलेली होती. तिच्या हातातली साडी हलक्या हवेत लहरत होती, आणि सोन्याच्या बांगड्या किंचित खणखणत होत्या.
तेवढ्यात, एका भेळच्या गाडीजवळ तिची नजर अडखळली.
समोर उभा होता आदित्य. त्याचा हातात हात घेतलेली त्याची नाजूक पत्नी बाजूला उभी होती. त्याच्या चेहऱ्यावर सुमेधाला बघताच मनाच्या बाउलमध्ये एक आठवण तरळली, त्यात आणखी आठवणी पडल्या आणि आठवणींची भेळ जमली.
दोघांचे डोळे एकमेकांवर स्थिरावले. काही क्षण शांतता पसरली, जणू वेळ थांबली होती.
मग सुमेधाने हसत म्हणाले, “तुला आठवतं का? आपण लहानपणीन्या जत्रेत इथेच भेळ खायचो आणि एकदा तू माझ्या साडीवर चिंचेचे पाणी सांडून मला चिडवले होतेस!” तिच्या आवाजात बालसुलभ गोडवा आला, आणि डोळ्यांत एक भावनिक स्पंदन!
आदित्य हसला, त्याच्या हसण्यात तोच जुना खोडकरपणा होता. “होय, आणि तू रागावून दोन तास माझ्याशी बोललीच नव्हतीस. मी तुझी मनधरणी करून माफी मागितली होती, पण तू मला खूप सतावले होतेस!” त्याच्या बोलण्यातून बालपणाची चपळता बाहेर पडली.
त्यांच्या जोडीदारांनी एकमेकांशी ओळख करून घेतली.
सगळे जत्रेतील झुलत्या बाकावर बसले आणि भेळ खाऊ लागले. सुरुवातीला त्यांना थोडा संकोच वाटला, पण मग आठवणींचा ओघ सुरू झाला, जणू सगळे कालच घडलेले होते.
सुमेधाने सांगितले, “लग्न झाले, दोन मुलं आहेत. दोघे त्यांच्या शाळेमुळे येऊ शकले नाहीत. आजी आजोबांजवळ थांबले आहेत. नवरा चांगला आहे, पण कधी कधी तुझी आठवण येते.”
आदित्यने मान हलवली, त्याच्या डोळ्यांतही एक गहन भाव होता. “माझंही तसंच आहे. आयुष्य चाललंय, पण काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असे वाटत राहते. मला एक मुलगी आहे. सध्या कॉलेज मुळे येऊ शकली नाही. तू मला सोडून गेलीस, पण मी तुला कधी दोष दिला नाही. त्यावेळची परिस्थितीच तशी होती.”
त्याच्या शब्दांत एक समर्पण होतं.
सुमेधाच्या डोळ्यांत पाणी आले.
“घरच्यांचा विरोध, आणि आपली धडपड. तेव्हा दुसरा पर्यायच नव्हता,” ती हळूच म्हणाली, तिच्या आवाजात वेदना आणि स्वीकृती मिसळली होती.
त्यांचे जोडीदार समजूतदार होते. आदित्यची पत्नी हसत म्हणाली, “आपण सगळे एकाच पटावरचे मोहरे आहोत, फक्त वेळ आणि वाटा वेगळ्या आहेत.”
सुमेधाचा नवरा हसला आणि आदित्यच्या पत्नीकडे बघून म्हणाला, “बघा, हे दोघे आमच्यासाठी एक अनोखी कथा घेऊन आलेत!”
त्यांनी दोघांना बोलू दिले, त्यांच्या भावनांना वाव दिला. एव्हाना त्यांची भेळ खाऊन संपली होती व वेगवेगळ्या चवीच्या कडू, गोड, तिखट, आंबट आठवणींची भेळ मात्र तयार होत होती.
जत्रेच्या गोंगाटातसुद्धा त्या चौघांच्या आसपास काही वेळ एक वेगळी शांतता पसरली.
मग ते चौघे चालू लागले. एका मिठाईच्या दुकानाजवळून आलेल्या गुलाबजामाच्या आणि जिलेबीच्या सुवासाने वातावरण आणखी रमणीय झाले.
सुमेधाने आदित्यच्या पत्नीकडे वळून हसत म्हणाले, “तुमचं नातं खूप सुंदर दिसतं. त्याला सांभाळा, तो खूप प्रेमळ आहे. अगदी गुलाबजाम सारखा!”
तिच्या शब्दांत एक हळुवार कौतुक होते.
आदित्यने सुमेधाच्या नवऱ्याकडे पाहून सांगितले, “तुमचं नशीब चांगलं आहे. ती अजूनही तितकीच सुंदर आणि संवेदनशील आहे. कधीकधी ती काही गोष्टी मात्र गोल गोल फिरवून सांगते. अगदी त्या जिलेबीसारखी.”
त्याच्या शब्दांत एक सच्चेपणा होता.
जत्रेच्या दिव्यांखाली, चार जणांनी एकमेकांच्या आयुष्याचा आदर केला. गोड आठवणींना हसत मिठी मारली, कडू आठवणींना शांतपणे सोडले. शेवटी, एकमेकांना अलविदा म्हणत ते आपापल्या वाटेवर निघाले.
जणू काहीच घडले नाही, पण मनात एक हलके समाधान आणि शांती घेऊन!
त्या संध्याकाळी, जत्रा फक्त उत्सव नव्हती, ती एक आठवण होती, आणि एक अलवार, भावनिक निरोप होती.
Comments
Post a Comment