नेटफ्लिक्सवरचा "Materialists"



सहज नेटफ्लिक्सवर "Materialists" दिसला, नवा आहे म्हणून  लावला. हिंदीतून. पहिल्या काही मिनिटातच त्याने मनाची पकड घेतली. चित्रपटाचा विषय आणि डायलॉग चांगले आहेत. हिंदी डबिंग चांगले आहे. यात फिफ्टी शेड्स ट्रायलॉजी वाली डकोटा जॉन्सन आहे. पण, आधीच सांगतो. तिचे "तसले" रूप यात नाही. यात ती साधी सोज्वळ आहे. विशिष्ट प्रकारचा हेयर कट करून चार्मिंग दिसण्याचा प्रयत्न तिने केला आहे, पण अन्यथा माझ्या निकषानुसार ती सुंदर नाही. तिच्याऐवजी कुणीतरी दुसरी अभिनेत्री घ्यायला हवी होती. तिच्या त्वचेवर कसलेतरी छोटे छोटे डाग सदृश काहीतरी आहेत. अनेक पाश्चात्य ऍक्ट्रेसच्या त्वचेवर कमी अधिक प्रमाणात असेच डाग दिसतात. तिकडच्या थंड हवामानामुळे असे असते का? 


विविध वयाच्या आणि अपेक्षांची मोठी लिस्ट असलेल्या एकट्या राहणाऱ्या (लग्न न झालेल्या किंवा घटस्फोटीत) क्लायंट्सला अनुरूप जोडीदार शोधून देणाऱ्या कंपनीत नोकरी करते. अशा एका यशस्वी लग्नात नवरदेवाच्या भावाला (पेड्रो पास्कल) ती भेटते आणि त्याला डेट करायला लागते. त्याची पर्सनलिटी आवडली बुवा आपल्याला. मस्त ऍक्टर आहे तो. एक दोन भेटीत त्यांच्यात जो प्रदीर्घ संवाद होतो, तो छान लिहिला आहे. तो चित्रपटाचा हाय पॉईंट आहे. हा जो प्रेड्रो असतो, तो अती श्रीमंत असतो. 


एकूणच या चित्रपटात "आपण लग्न का करतो" किंवा "जोडीदार का शोधतो" या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न विविध व्यक्तींच्या दृष्टीने केला आहे. अगदी आदिमानवाच्या काळापासून या प्रश्नाचा विचार केला आहे. 


दरम्यान आपल्या हिरोईनला तिने पूर्वी ब्रेकअप केलेला स्ट्रॅगलिंग अँक्टर मित्र तिला भेटतो, ज्याला त्याच्या गरिबीमुळे तिने सोडून दिले असते. आता या गरीबाची भूमिका कुणाला दिली आहे, माहीत आहे? क्रिस इव्हान्स. गरीब माणूस म्हणून तो शोभत नाही. कॅप्टन अमेरिकाच्या भूमिकेतून एकदम गरीब माणूस? आपल्याकडे समजा हृतिक रोशनला झोपडीत राहणारा धोतर घातलेला गरीब शेतकरी अशी भूमिका दिली तर, आपल्याला बघायला झेपेल का ते? 


आता या तिघांमध्ये, अगदी हिरोईन पेक्षाही हा क्रिस इव्हान्स हँडसम दिसतो. पुढे चित्रपटात काय होते? प्रेम, लग्न, जोडीदार अशा अनेक गोष्टींचा फिलॉसॉफिकल अंगाने विचार करत करत हा चित्रपट शेवटी रंगीला या हिंदी चित्रपटाच्या वळणावर जाऊन पोचतो. मला आधी वाटले की हा अनुष्का शर्माच्या "बँड बाजा बारात" च्या दिशेने जातो की काय? पण इथे प्रेम त्रिकोणाचा अंत (हिरॉईन कुणाची निवड करते) हा रंगीला किंवा टायटॅनिकच्या हिरोईनचा आदर्श घेऊनच होतो. आता समजदार वाचकांना इशारा काफी है. 


यात अंगप्रदर्शन किंवा तसली दृश्य आहेत का? तर आहेत, पण या चित्रपटात एकही सुंदर किंवा भरल्या देहाची स्त्री नाही, त्यामुळे थोडीफार तशी दृश्ये असूनही त्याबद्दल अगदीच काहीच वाटत नाही.


यशराज फिल्म्स वगैरे यांची नजर या चित्रपटावर पडली तर बरं होईल. याचा रिमेक हिंदीमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने बनवता येऊ शकतो. मूळ चित्रपटापेक्षा चांगला. यातला स्क्रीनप्ले मला तितकासा आवडला नाही. पण खूप चांगल्या पद्धतीने लिहिलेले डायलॉग आणि एकूणच चित्रपटाचा विषय यासाठी हा चित्रपट बघायला हरकत नाही. 


Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली