वजूद चुराले, धूम मचाले
शिर्षक वाचून तुम्ही गोंधळले असाल. पण तुम्हाला लेख वाचल्यावर त्याचा उलगडा होईल. वजूद हा नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षितचा चित्रपट माझा बघायचा राहून गेला होता तो मी काल यू ट्यूब वर बघितला. 1998 सालात हा रिलीज झाला होता.
CMDB वर चांगली रेटिंग आहे, परंतु रिलीज झाला त्यावेळेस हा चित्रपट फारसा चालला नव्हता असे इंटरनेटवर वाचले. याची तीन कारणे मला जाणवली.
पहिले कारण - दोन वेगवेगळे क्लायमॅक्स. पहिल्याच रेल्वे रुळावरच्या क्लायमॅक्सला चित्रपट संपवायला हवा होता. पुढे आणखी पंधरा वीस मिनिटे वाढवल्याने कदाचित प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला.
कारण दोन - पूर्ण चित्रपटाची लांबी तीन तासापेक्षाही जास्त आहे कारण एन चंद्रा या डायरेक्टरने यात अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला आहे. वजूद म्हणजे जगामध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींवर हा चित्रपट आहे. पण त्याचबरोबर कार्यालयातील लैंगिक शोषण, लहानपणी वडिलांची मुलाला मिळणारी हीन तुच्छ वागणूक, मारहाण आणि त्यामुळे व्यक्तीच्या मनावर होणारा परिणाम, प्रेम त्रिकोण, रंगमंच कलाकारांची आजची वाईट स्थिती, अशा अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे. त्यामुळे खूप खिचडी झाली आहे असे वाटते.
तिसरे कारण - या चित्रपटातील एकही गाणे लक्षात राहण्यासारखे नाही. माधुरी दिक्षित सारखी नृत्यांगना असूनही आणि तिचा स्टेज परफॉर्मन्स असलेले गाणे शेवटी असूनही त्यातील शब्द, चाल आणि संगीत लक्षात राहत नाही.
पण हा चित्रपट, त्याची कथा आणि डायलॉग मला तरी खूप आवडले. थोडा ड्रामाटिक आणि लाऊड वाटतो, पण ठीक आहे.
नाना पाटेकरने नेहमीप्रमाणे चांगला खलनायक साकारला आहे. परंतु सर्वार्थाने त्याला खलनायक म्हणता येणार नाही कारण त्याच्या भूमिकेचे ग्रे शेड्स आहेत. माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर यांच्या अभिनयापुढे प्रेमाचा तिसरा कोन मुकुंद देव हा अभिनेता फिका पडतो. नाटकातील काम करणारा कलाकार जर वाईट मार्गाला लागला तर वेश बदलून चोऱ्या, दरोडे आणि आणखी काय काय गुन्हे करू शकतो याचे उत्तम उदाहरण हा चित्रपट आहे.
धूम, धूम टू आणि धूम थ्री या तिन्ही चित्रपटांचे कन्सेप्ट वजूद याच चित्रपटावरून घेतले आहेत याची मला खात्रीच पटली. म्हणजे या चित्रपटाचा "वजूद" चोरून धूम वाल्यांनी आपली कथा जुळवली. वजूद चुराले, धूम मचाले. सिने रसिकांनी तुलना करून बघा. उलट, धूम टू मधील ऐश्वर्या सोबत हृतिकचा छतावरून उतरण्याचा प्रसंग कृत्रिम वाटतो पण यात रम्या कृष्णनच्या मदतीने दोरखंडाने नाना पाटेकर बिल्डिंगच्या भिंतीवरून उतरत जातो तो प्रसंग साधेपणाने चित्रित केलेला आणि त्यामुळे जास्त रिअलिस्टिक वाटतो. अगदी टॉम क्रुझच्या मिशन इम्पॉसिबल किंवा पठाणच्या बिल्डिंगवर भिंतीवर दोर धरुन आडवे चालण्याच्या दृश्यांपेक्षा वजूद मधला नाना पाटेकर रिअल वाटतो.
पण तसे पाहिले तर वजूद या चित्रपटानेसुद्धा आधी आलेल्या डर, अंजाम, दरार आणि अग्निसाक्षी या चित्रपटापासून प्रेरणा घेतल्यासारखी वाटते. दरार आणि अग्निसाक्षी तर अगदी एकमेकांसारखे होते. अग्निसाक्षी मधल्या नाना पेक्षा दरार मधला अरबाज खान जास्त लाऊड आणि ड्रामेबाज वाटतो.
अग्निसाक्षी मधला एक हास्यास्पद प्रसंग या निमित्ताने आठवला की कोर्टात मनिषा कोईराला ही आपली पत्नी आहे हे सिद्ध करण्यासाठी नाना पाटेकर तिच्या मांडीवर कुठेतरी तिळ आहे हा पुरावा सांगतो, पण आजच्या काळात जिथे मुली बिनधास्त मिनी स्कर्ट किंवा खोल गळ्याचे टॉप वगैरे घालून कॉलेजात आणि ऑफिसला जातात, तेव्हा कुणाच्या कुठल्या प्रायव्हेट भागावर तिळ आहेत हे सर्वांनाच दिसत राहते आणि माहिती असते. त्यामुळे असले पुरावे आज कोर्टात ग्राह्य धरले जातील का असा प्रश्न पडतो. असो. थोडे विषयांतर झाले.
तर थोडक्यात वजूद हा चित्रपट अनेक बाबतीत चांगला वाटला. फक्त दोन क्लायमॅक्स, लक्षात न राहणारी गाणी आणि अनेक विषय हाताळल्याने तो जास्त चालला नसावा. रसिक वाचकांना काय वाटते ते जरूर कळवावे.
Comments
Post a Comment