Nothing Lasts Forever परीक्षण
सिडनी शेल्डन हा अमेरिकन लेखक सर्वांना जगभर माहीत आहे. त्याच्या अनेक कादंबऱ्या आजही आवडीने वाचल्या जातात. त्यातून प्रेरणा घेऊन अनेक हॉलिवूड आणि बॉलीवूड चित्रपटांच्या कथा आणि प्रसंग आजही लिहिले जातात. Nothing Lasts Forever ही Sidney Sheldon ची एक अशी मेडिकल थ्रिलर कथा आहे जी दाखवते की – "आयुष्यात काहीच कायम नसतं – ना सुख, ना दु:ख, ना यश, ना अपयश. ना स्वत: आयुष्य". ही कादंबरी वाचायची राहिली होती, नुकतीच वाचली.
ही कादंबरी 1994 साली प्रथम प्रकाशित झाली होती. ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि नंतर 1995 मध्ये तिच्यावर आधारित अमेरिकेत एक टी.व्ही. मिनी-सीरिज सुद्धा बनवली गेली होती.
ही तीन महिला डॉक्टरांची संघर्षमय आणि धाडसी कहाणी आहे. केटी, पेज आणि हनी. या तीन डॉक्टर स्त्रिया, एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्यांशी लढतात. त्या जॉइन होईपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये फक्त नर्सच स्त्रीया असतात. डॉक्टर नाही. पुरुषप्रधान डॉक्टरांच्या जगात त्यांना अनेक अपमान, आव्हाने आणि दबावांना सामोरे जावे लागते.
पेज कालांतराने एका गंभीर आजारी रुग्णाला वेदनामुक्त मृत्यू देते. आणि तिच्यावर खूनाचा आरोप होतो. त्यानंतर तिच्यात कोर्टात खटला चालतो, तिथून डायरेक्ट कादंबरीची सुरुवात आहे. नंतर मग फ्लॅशबॅकमधून मूळ कथा चालू होते.
हनी आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी चुकीच्या मार्गावर जाते आणि अडकते. केटी दुसऱ्या एका डॉक्टरने लावलेल्या एका पैजेत अडकून गंभीर संकटात सापडते, जे तिच्या जिवावर बेतते.
मात्र मूळ मुद्दा (पेजने जॉन क्रोनिन नावाच्या एका रुग्णाला त्याच्या विनंतीवरून कुणाची परवानगी न घेता मृत्यू देणे) फक्त तीन प्रकरणांत आटोपला आहे आणि तेही खूप शेवटी शेवटी येते.
सुरुवातीला कोर्टात याबद्दल इतके हाय व्होल्टेज सीन्स आहेत की, जॉन क्रोनिन हा पेशंट आणि तो उपचारासाठी पेजकडे येतो, हा भाग पूर्ण पुस्तक व्यापून उरेल असे वाटते, पण तसे मुळीच होत नाही.
या वेळेस थ्रिलरपेक्षा सिडनी शेल्डनला हॉस्पिटलमधले डॉक्टरांचे रोजचे जीवन चित्रण करण्याचा जास्तच मोह झालेला आहे. त्यामुळे स्टार प्लस वरची संजीवनी सिरियल आठवत रहाते.
या कादंबरीत सिडनी शेल्डनने भारताबद्दल अनेक उल्लेख केले आहेत. त्याच्या इतरही कादंबरीत भारताबद्दल चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आढळतात.
या कादंबरीत पेजचे वडील आणि प्रियकर WHO चे डॉक्टर असल्याने जगभरात उपचारासाठी जातात असे दाखवले आहे. त्या अनुषंगाने भारताचा अनेक वेळा कादंबरीत उल्लेख आहे. त्यापैकी "घेराव" हा भाग मला पटला नाही कारण असे काही भारतात नसतेच. लेखकाला नेमके काय म्हणायचे ते त्यालाच समजले आहे का? तसेच लेखकाने मध्येच या कथेत ज्योतिष घुसवले आहे. पण मेडिकल अस्ट्रोलॉजी या अर्थाने नव्हे. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार बनणाऱ्या जन्मकुंडली पद्धतीची लेखकाने गंमत केल्यासारखी (फिरकी घेणे) वाटते, पण नंतर कथेत पुढे कन्या राशीच्या डॉक्टरची डिमांड करणारी एक पेशंट दाखवली आहे, जिचा उपचार हनी करते आणि ती पेशंट टॅरो कार्ड रीडर असते आणि ती हनीबद्दल जे भविष्य वर्तवते ते खरे निघते.
तसे पाहता सिडनी शेल्डनला ज्योतिष विषयाचा मोह आवरला गेला नाही. त्याने "बेस्ट लेड प्लॅन्स" या कादंबरीत वर्तमानपत्रातील रोजचे राशी भविष्य नायिका वाचते, अशी सुरुवात केली आहे. असो.
ही कादंबरी सस्पेन्स कमी आणि डॉक्टरांच्या हॉस्पिटल मधल्या रोजच्या जीवनाचे वर्णन जास्त, अशी आहे. संजीवनी सिरियल बघता आहात असे समजा. हां, एक आहे. मेडिकल क्षेत्राविषयी बरीचशी माहिती मिळते. अमेरिका असो की भारत, पेशंट आणि डॉक्टर, नर्सेस सगळीकडे सारखेच असतात, हे समजते!

Comments
Post a Comment