संजय फडतरे लिखित वेचक वेधक पुस्तकाचे परीक्षण
श्री. संजय फडतरे यांचे वेचक वेधक हे पुस्तक वाचले. या पुस्तकात त्यांच्या जीवनातील अनुभव, आठवणी आणि पर्यटन विषयक लेख आहेत, तसेच काही बोधकथा सुद्धा आहेत.
वानर आणि श्वान यांच्यावर आधारित लेखांत (वियोग, विरह, अवधान) प्राण्यातील माणुसकी दिसते आणि दुसरीकडे वैष्णोदेवी येथे लेखकाला आलेल्या अनुभवानुसार मोठी व्यक्ती लहान मुलांशी कशी माणुसकी सोडून वागते हे वाचून वाईट वाटते!
ठेच, स्टोव्ह, कंदील, घड्याळ, शिट्टी, एसटी, रेडिओ, आपली आवड हा कार्यक्रम, यावर आधारित लेख वाचून माझ्या लहानपणाच्या आठवणी जिवंत झाल्या.
माझे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले असल्याने, लेखकाच्या कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाच्या आठवणी वाचून नवीन माहिती मिळाली. लेखकाने कॉलेज जीवनातील सांगितलेली कॉमन ऑफ ची घटना, थोड्याफार फरकाने आमच्याही कॉलेजमध्ये घडली होती, फक्त त्याचे कारण वेगळे होते.
मी सुद्धा चार वर्षे हॉस्टेलवर राहिलो होतो त्यामुळे लेखामुळे माझ्या हॉस्टेलच्या आठवणी ताज्या झाल्या. पण कृषी महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये खाण्यापिण्याची विद्यार्थ्यांची चंगळ होती हे वाचून खरच हेवा वाटला. आम्हाला मेसमध्ये रविवारी सकाळी फिस्ट (गोड पदार्थ) मिळायची आणि संध्याकाळी बाहेर खावे लागे. मी शाकाहारी असल्याने माझ्यासाठी गोड धोड हिच फिस्ट! कटाची आमटी मी कधी खाल्ली नाही पण त्याबद्दल वाचून खावीशी वाटते आहे.
लेखकाने उल्लेख केलेला अरुण दातेंच्या मुलाखतीतील त्यांनी सांगितलेला प्रसंग अंतर्मुख करून जातो. तसेच मन, श्रद्धा आणि सुंदर हात या बोधकथा छान आहेत.
पर्यटन विभागात लेखकाने पाहिलेला कोकण आपल्याला समजतो. तसेच लडाख, अंदमान, अबुधाबी, दुबई, थायलंड, मलेशिया, सिंगापूर इत्यादी ठिकाणांबद्दल आपल्याला माहिती मिळते.
एकूणच नावाप्रमाणे हे पुस्तक लेखकाच्या आयुष्यातील वेचक आणि वेधक अशा अनुभवांचा वेध घेते.

Comments
Post a Comment