बुद्धिबळातील साप पुस्तक परीक्षण - ओंकार बागल


आपण सर्व लहानपणी खूप खेळ खेळलेलो असतो. खेळांतून खूप आनंद मिळतो, मजा येते. थकवा दूर होतो, मन प्रसन्न वाटते, प्रफुल्लित होऊन जातो आपण एकदम. खेळ मैदानी असो वा बैठे, प्रत्येक खेळाचा साज निराळा, डौल अनोखा. बैठ्या खेळांत सापशिडीचा खेळ तर प्रत्येकजण खेळलेला आहे. अगदी सोपा परंतू विचित्र धाटणीचा हा खेळ. सोंगट्यांच्या आकड्यांवर वाटेल तसा फिरणारा हा खेळ. शिड्या चढून भरभर वर चाललोय असं वाटतंय ना वाटतंय, तोवर गिळलंचं सापाने.. पुन्हा धसकन् खाली आपटल्यासारखं!

बुद्धिबळाचं म्हणाल तर प्रचंड बुद्धिमत्तेचा हा खेळ. इथे प्रत्येक चाल मोजून, मापून, जपून चालावी लागते. अक्षरशः बुद्धीचे बळ पणाला लावणारा खेळ म्हणजे बुद्धिबळ. एक चाल, एक डाव फसला, तर समोरचा चितपट करायलाच बसला आहे. असा या खेळाचा एक वेगळाच रुबाब. प्रत्येक खेळ आपल्याला काही ना काही शिकवत असतो. कोणताही खेळ खेळताना, तो केवळ त्या क्षणांपुरता मर्यादित मुळीच नसतो. कळत नकळत तो आपल्यात जिवंतपणा भरत असतो, आपल्यावर संस्कार करत असतो. खेळांसरशी आपला दृष्टीकोन प्रगल्भ होत जातो आणि खरा स्वभाव आपसूक बाहेर येत जातो.
हे खेळ आपल्या आयुष्यात खूप मोलाची कामगिरी बजावतात बरं का. खेळता खेळता आयुष्यातील भले- मोठे धडे देऊन जातात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरं कसं जायचं, हे शिकवतात. निर्णयक्षमता, धाडस, साहस, नेतृत्व, संयम, परोपकार, खिलाडूवृत्ती, जिद्द, चिकाटी, सचोटी, आत्मविश्वास अशा कितीतरी कलागुणांना इथूनच वाव मिळतो. यातूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळते. त्यामुळे जगताना पावलोपावली हे खेळ आपल्याला आकार देत असतात, मूर्त स्वरूप देत असतात किंबहुना घडवत असतात.
या सर्व लहान- मोठ्या ठोकताळ्यांना विचारांत घेऊन लेखक निमिष सोनार यांनी 'बुद्धिबळातील साप' ही कादंबरी लिहिली आहे. खरं तर ही संकल्पनाच मुळात अतिशय अनोखी आहे. कारण बुद्धिबळाच्या खेळात साप कसा येईल बरं? किंवा दोन खेळ एकमेकांत गुंतले कसे जाऊ शकतात नेमके? आणि महत्वाचं म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात या साऱ्याचा काय संबंध? हीच तर खरी ताकद असते लेखकाच्या कल्पनाशक्तीची. या कहाणीच्या नुसत्या अफलातून संकल्पनेनेच भारावून जायला होतं, हेही तितकंच खरं.
कादंबरीचा विषय जितका धीर- गंभीर तितकाच महत्त्वपूर्ण वाटतो. कारण आपलं आयुष्यदेखील बुद्धिबळाच्या किंवा सापशिडीच्या पटांसारखंच असतं. अगदी प्रगतीच्या दिशेने जाता जाता कधी आपण कोसळून पडू, हे सांगता न येण्यासारखं. त्यामुळे प्रत्येक पावलासरशी जपून वाटचाल करणं अधिक गरजेचं. ही कादंबरी मला बऱ्याच अंशी, खेळता खेळता अर्थपूर्ण शिकवणी सांगून जाणाऱ्या गोष्टीसारखी वाटते. लेखक निमिष सोनार यांनी बहुदा हाच सारासार विचार डोक्यात ठेवून, वाचकांसमोर ही कादंबरी सादर केली आहे.
तर या आयुष्यरुपी बुद्धिबळाच्या पटावर सापांचा शिरकाव कसा होऊ शकतो, हा एक कळीचा मुद्दा. आणि हे साप आपल्या आयुष्याला कशाप्रकारे दंश करू शकतात? त्यांचा आपल्यावर काय विपरीत परिणाम होऊ शकतो? आपण त्यांना कशाप्रकारे रोखू शकतो? आपला बचाव कसा करू शकतो? ह्या सर्व गोष्टी या कादंबरीतून वाचायला मिळतात. मानवी मनात प्रामुख्याने सहा विकारांचा समावेश होतो. ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. यांना एकत्रितपणे 'षडरिपू' असं संबोधलं जातं. 'षड्' म्हणजे सहा आणि 'रिपू' म्हणजे शत्रू.
हे सहा विकार आपल्या बाह्य आणि आत्मिक उन्नती मार्गातील प्रमुख अडथळे मानले जातात. लेखक निमिष सोनार यांनी, त्यांच्या 'बुद्धिबळातील साप' या कादंबरीच्या माध्यमातून वाचकांना 'षडरिपू' या सहा विकारांच्या प्रभावाची आणि परिणामांची वारंवार जाणीव करून दिली आहे. या विकारांचा वाईट परिणाम केंद्रस्थानी ठेवून, मानवी मनाला एक योग्य दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. सत्कर्म आणि कुकर्म यांतील न दिसणारी हलकीशी रेषा, समजावून सांगण्याचा अट्टहास दखल घेण्याजोगा आहे. कादंबरीतील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मानवी प्रवृत्ती. लेखकांनी चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही मानवी प्रवृत्ती याद्वारे नमूद केल्या आहेत.
इतकेच नव्हे तर, कित्येक प्रकारच्या प्रवृत्तीच्या लोकांचे वर्णन या कादंबरीतून वाचायला मिळते. मूळ कथेत रेखाटलेल्या व्यक्तिरेखा अनेक विविधांगी मनोवृत्तीचे दर्शन घडवून आणतात. तसं पाहायला गेलं तर, छोटेखानी कादंबरीत अनेक व्यक्तिरेखा चित्रित करणं मोठं जिकिरीचं काम असतं. परंतू लेखकांनी या कादंबरीच्या अनुषंगाने ते लीलया पेललं आहे. 'जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृती' याप्रमाणे व्यक्तीसरशी बदलणाऱ्या प्रवृत्ती समजून घेतात येतात. शिवाय माणसांच्या अनेक स्वभावांचे आणि दृष्टिकोनांचे वर्णन वाचायला आणखी मजा येते.
एकीकडे दोन भावंडांनी आईच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेली आणि भरभराटीस आणलेली कंपनी. दुसरीकडे एकाच कॉलेजात शिकलेल्या आणि कॉलेज संपल्यानंतर वेगवेगळे मार्ग पकडलेले मित्र-मैत्रिणी. नियतीने घाट घालून त्यांना एकाच कंपनीत आणले आहे. मात्र त्यानंतर पुढे अशा काही घटना घडतात आणि मग सुरू होते कंपनीतील राजकारण आणि सत्तेचा खेळ! असे अनेकसे कर्मचारी व त्यांच्यातील ईर्षा, महत्वाकांक्षा. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, घटना, प्रसंग, विपरीत परिणाम ही या कादंबरीची मूळ कथा.
कॉर्पोरेट पॉलिटिक्स अथवा कंपनीतील राजकारण या विषयावर आधारित ही कादंबरी इतर अनेक पैलूंवरही प्रकाश टाकते. जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर दोन गरीब भावंडांनी साधलेली अत्युच्च प्रगती. फारसे शिक्षण नसूनही केवळ अनुभवाच्या आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर, एखादा व्यक्ती कशाप्रकारे यशस्वी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण वाचायला मिळते. ज्याप्रकारे 'स्वराज्य' स्थापनेपासून ते स्वराज्य राखण्यापर्यंत माँसाहेब जिजाऊंचा वाटा होता, त्याप्रमाणे या कहाणीत असणाऱ्या दोन्ही भावांच्या आईची व्यक्तिरेखा प्रेरणादायी आहे.
ही कादंबरी बऱ्याच ठिकाणी कॉर्पोरेट एथिक्सवरदेखील (व्यावसायिक नीतिमत्ता) भाष्य करते. व्यवसायिक कामकाजात पाळली जाणारी नैतिक मूल्ये आणि तत्त्वे यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. याशिवाय पारदर्शकता, न्याय, आदर, जबाबदारी, विश्वासार्हता, ग्राहक निष्ठा, कर्मचारी समाधान, कॉर्पोरेट कायदेशीरपणा, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अशा अनेक गोष्टी निदर्शनास आणून देते. यासोबतच आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये उपयुक्त नीतीमूल्ये वाचकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न करते. काम आणि खाजगी आयुष्य यांत ताळमेळ राखणं कशाप्रकारे गरजेचं असतं, हेही कादंबरीतून वाचायला मिळते.
नागमोडी वळणांसारखं आपलं आयुष्य कधी कसं कोणतं वळण घेईल, याचा काही भरवसा नसतो. भूतकाळातील कोणती गोष्ट, कशाप्रकारे आपल्यासमोर उभी होऊ ठाकेल, याचा काहीही अंदाज नसतो. आयुष्य कोणत्याही टप्प्यावर विचित्र वळसा घालू शकतं, याची पुरेपूर जाणीव ही कादंबरी वाचताना होते. लिखाणातील साधे-सरळपणा आणि रंजक कथाविश्व कादंबरीला आणखी सुंदर बनवतात. क्षणाक्षणात कथेत येणारी अनपेक्षित वळणे वाचकांना खिळवून ठेवतात. अनेक प्रसंगांसरशी मन वेधून घेणारी, चित्तथरारक आणि रोमहर्षक अशी ही कादंबरी प्रत्येक वाचकाला मोहिनी केल्यासारखी भारावून टाकेल, एवढं मात्र नक्की.
-©ओंकार दिलीप बागल
9321409890 /
bookbandhureviews@gmail.com
Insta ID - bookbandhu_reviews

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली