सुपरमॅन हनुमान!
2025 सालचा हॉलिवूडचा सुपरमॅन बघून आलेल्या कुमारवयीन नातवाला आजोबांनी सांगितलं, "आमच्या काळात पण सुपरमॅनचा पिक्चर आला होता!"
नातवाने विचारले, "हो का आजोबा? कोण कोण होतं त्यात?"
आजोबा अभिमानाने म्हणाले, "धमेंद्र!"
"मग, काय समजलास? आमचा धर्मेंद्रच खरा सुपरमॅन आहे!"
"पण आजोबा, कॉपीराइट?"
"ते काय असतं? ते सोड! हे बघ आमचा सुपरमॅन!"
असे म्हणून त्यांनी नातवाला यूट्यूबवर धर्मेंद्रच्या सुपरमॅन चित्रपटातील काही दृश्ये दाखवायला लागले, ते बघून आजच्या हॉलिवूडमधील दर्जेदार VFX ला सरावलेल्या नातवाला इतके हसायला आले, की त्याचे हसणे थांबतच नव्हते!
आजोबांना कळेना काय करावे?
शेवटी त्यांनी नातवाला सनी देओलचा डान्स असलेले काही गाणे दाखवले तेव्हा, त्याचे हसणे अचानक थांबले आणि तो पुढील काही तास रडत होता!
तो शांत झाल्यानंतर आजोबा त्याला म्हणाले, "अरे, खरा सुपरमॅन म्हणजे आपला हनुमान आहे आणि तो खरे तर खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. खरे तर हॉलिवूडवर आपण भारतीयांनी कॉपीराइट उल्लंघन केल्याचा दावा करायला हवा. हनुमानाच्या गदेसारखा हातोडा मार्व्हल कॉमिक्सच्या तुझ्या थॉरच्या हातात दाखविल्याबद्दल आणि तुझा तो हॉलिवूडचा हल्क का बल्क कोण आहे तो?"
"हल्क म्हणतात आजोबा त्याला!"
"हां. तोच तो! आपला आकार मोठा करतो तो. ही आपल्या हनुमानाची नक्कल नाही तर दुसरे काय रे?"
नातू विचार करत म्हणाला, "हम्म, तुमच्या म्हणण्यात पॉईंट आहे, आजोबा! पण क्रिशसुद्धा थोडा थोडा हॉलिवूडच्या एक्स मेन चित्रपट मालिकेची थोडीशी नक्कल होता. त्यात मनुष्य आणि प्राणी यांचे म्युटंट दाखवले होते!"
"हो ना? आता एक सांग! आजीने तुला लहानपणी भक्त प्रल्हादची गोष्ट सांगितलेली आठवते का?"
"हो आजोबा!", असे म्हणत नातू डोक्याला ताण देत विचार करू लागला.
"आजोबा? तुमचा इशारा खांब फोडून निघणाऱ्या भगवान नरसिंह यांच्याकडे तर नाही ना? ज्यांनी भक्त प्रल्हादला वाचवले?"
"बरोबर ओळखलस! हुशार बाळ! मनुष्य आणि सिंह यांचे मिश्रण असलेला तो ही एक म्युटंटच आहे ना?"
"मानलं आजोबा तुम्हाला!"
"हो ना? अरे अशी अनेक उदाहरणे देता येतील! मग माझ्यासोबत सोनी टीव्हीवरचे श्रीमद् रामायण बघशील ना, आजपासून?"
"होय आजोबा!"
"दॅट्स लाइक अ गुड बॉय!"

Comments
Post a Comment