आले जेम्स गनच्या मना, पुन्हा सुपरमॅन जन्मला!
11 जुलै 2025 रोजी रिलीज झालेला सुपरमॅन हा एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे. हा चित्रपट डीसी युनिव्हर्स (DCU) चा पहिला चित्रपट आहे आणि सुपरमॅन चित्रपट मालिकेचा दुसरा रिबूट आहे. जेम्स गन यांनी दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. कलाकारांची लिस्ट तुम्ही इंटरनेटवरून नंतर सविस्तर बघा. मी आयनॉक्समध्ये मुलगा आणि मुलीसह बघितला.
मार्व्हल युनिव्हर्स मधल्या काही चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा जेम्स गन याच्या मनात आले की, एवेंजर्स चित्रपटांशी टक्कर द्यायची तर आतापर्यंतच्या तुलनेने फसलेल्या डिसी कॉमिक्सच्या चित्रपट मालिकांना पुन्हा पहिल्यापासून वेगळ्या प्रकारे पुन्हा नव्याने सुरुवात करा आणि त्याने सुपरमॅनचा पहिला स्वतंत्र चित्रपट नव्या कथेसहित बनवला. त्यात जस्टिस गँग पण आहे, पण त्यातील कॅरेक्टर्स म्हणजे ग्रीन लँटर्न, मिस्टर टेरिफिक आणि हॉकगर्ल हे काही काळानंतर चित्रपटात येतात पण त्यांच्या स्पेशल पॉवर्स नेमक्या काय आणि किती आहेत, हे या चित्रपटात एक्सप्लेन केलेले नाही. कदाचित त्या प्रत्येक कॅरेक्टरची स्वतंत्र चित्रपट येतील तेव्हा डिटेल समजेल.
चित्रपट किचकट आहे. स्टोरी खूप साधी सरळ नाही. हा चित्रपट पाहण्याआधी एक तर तुम्हाला सुपरमॅन बद्दल थोडी तरी माहिती असायला हवी. तसेच तुम्हाला विविध वैज्ञानिक संकल्पना माहिती असायला हव्यात. जसे की, ब्लॅक होल, एलियन, मल्टिपल युनिव्हर्स, क्लोनिंग, पॉकेट युनिव्हर्स, पोर्टल वगैरे. तरीही मी कथा सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटाची सुरुवात अंटार्टिका खंडाच्या बर्फाळ पार्श्वभूमीवरील पडद्यावरील लिखित मजकुराने होते:
"300 वर्षांपूर्वी पृथ्वीवर मेटाह्यूमन (अलौकिक शक्ती असलेले मानव) आढळले, ज्यामुळे "गॉड्स अँड मॉन्स्टर्स" चा युग सुरू झाला. 30 वर्षांपूर्वी, जोनाथन आणि मार्था केंट (प्रुइट टेलर व्हिन्स आणि नेवा हॉवेल) यांना क्रिप्टॉन ग्रहावरून आलेले एक मूल, काल-एल, सापडते आणि ते त्याला आपला मुलगा म्हणून स्वीकारतात, त्याचे नाव ठेवतात क्लार्क केंट. 3 वर्षांपूर्वी, क्लार्क केंट सुपरमॅन (डेव्हिड कॉरेन्सवेट) बनला आणि मेट्रोपोलिस शहरातील लोकांचा सुपरहिरो म्हणून उदय झाला. परंतु, तीन आठवड्यांपूर्वी, सुपरमॅनने बोराव्हिया देशाला जार्हानपूरवर हल्ला करण्यापासून रोखले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद निर्माण झाला. या कृतीमुळे त्याच्या हस्तक्षेपावर प्रश्न उपस्थित होतात आणि अमेरिकन सरकार त्याच्यावर संशय घेते. या घटनेनंतर, एक रहस्यमय खलनायक, "हॅमर ऑफ बोराव्हिया" (अल्ट्रामॅन) सुपरमॅनला लढाईत पराभूत करतो!"
इथे मजकूर संपतो आणि चित्रपट सुरू होतो!
अल्ट्रामॅन सोबत लढाई हरल्यानंतर सुपरमॅन आर्क्टिकमधील आपल्या "फॉर्ट्रेस ऑफ सोलिट्यूड" इथे जोरात बर्फात जखमी अवस्थेत आपटला जातो. जिथे त्याचा सुपर-कुत्रा क्रिप्टो त्याला वाचवतो. क्रिप्टो सुपरमॅनला सूर्यप्रकाशात ठेवतो, ज्यामुळे त्याची शक्ती परत मिळते. फॉर्ट्रेसमधील रोबोट्स त्याला बरे करण्यात मदत करतात.
डीसी कॉमिक्सच्या युनिव्हर्समध्ये अमेरिका तर असते, परंतु त्यात मेट्रोपोलीस नावाचे काल्पनिक शहर आहे, तसेच वरील दोन्ही देश सुद्धा काल्पनिक आहेत.
ल्यूथरकॉर्पचा अब्जाधीश ल्यूथर हा सुपरमॅनला मानवजातीला कमीपणा आणणारा माणूस मानतो आणि त्याला नष्ट करण्याचा कट रचतो. तो अल्ट्रामॅनला नियंत्रित करतो, जो सुपरमॅनशी लढण्यासाठी खास रणनीती वापरतो. ल्यूथरच्या योजनेत अल्ट्रामॅन, द इंजिनीअर आणि इतर हाय-टेक सैनिकांचा समावेश आहे. ल्यूथर बोराव्हियाच्या हल्ल्याला गुप्तपणे समर्थन देतो, कारण त्याला जार्हानपूरचा काही भाग हस्तगत करायचा आहे. तो सोशल मीडियावर सुपरमॅनविरुद्ध खोट्या बातम्या आणि सिद्धांत पसरवण्यासाठी बॉट्सचा वापर करतो.
सुपरमॅन एलियन असतो हे आपणास माहीत असेलच आणि ते कोणत्याच आघाताने मरत नसतो. फक्त क्रिप्टोनाइटनेच तो मारतो. आणि त्याची शक्ती सूर्यप्रकाशाने परत येते. "कोई मिल गया" मधला जादू आठवला ना? आणि सुपरमॅनचा क्रिप्टो नावाचा सुपर कुत्रा फारच अगाऊ असतो. सुपरमॅनने शिट्टी वाजवली की तो कुठेही असेल तरी अचानक उडत असा अंगावर धावून येतो (अर्थात व्हिलन लोकांच्या), की त्याला थांब सांगितल्याशिवाय तो थांबत नाही.
क्लार्क केंट (सुपरमॅनचे जगासाठीचे वेगळे रूप) डेली प्लॅनेट या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करतो, जिथे तो लोईस लेन आणि जिमी ऑल्सेन यांच्यासोबत काम करतो. लोईस आणि क्लार्क यांचे प्रेमसंबंध आहेत, परंतु सुपरमॅनच्या बोराव्हिया हस्तक्षेपामुळे त्यांच्यात तणाव निर्माण होतो. लोईसला वाटते की सुपरमॅनने परदेशी हस्तक्षेप टाळावा, तर क्लार्क म्हणतो की त्याने निरपराध लोकांचे प्राण वाचवले. लोईस सुपरमॅनची मुलाखत घेते, परंतु त्यांच्या मतभेदांमुळे त्यांचे नाते तात्पुरते तुटते!
ल्यूथर, अल्ट्रामॅन आणि द इंजिनीअर हे "फॉर्ट्रेस ऑफ सोलिट्यूडवर" हल्ला करतात. सुपरमॅनचे राहण्याचे गुप्त ठिकाण फक्त सुपरमॅन स्वतः आल्यासच उघडते म्हणजे त्याच्या डीएनएद्वारे! मग हे तिघे तिथे कसे काय जातात बरे? आता ते थोडेसे रहस्य आहे, पण समझदार को इशारा काही है... Keep Guessing! तर हे तिघे तिथे क्रिप्टोला (सुपरमॅनचा सुपर कुत्रा) पकडतात आणि सुपरमॅनच्या क्रिप्टॉनियन पालकांचा (क्रिप्टॉन ग्रहावरचे खरे जैविक पालक ज्यांनी क्रिप्टॉन ग्रह नष्ट होतांना त्याला पृथ्वीवर पाठवून दिले असते) अर्धवट संदेश पूर्ण रिकव्हर करून चोरतात. (का कोण जाणे, हा प्रसंग पाहताना शाहरुख आणि मौनी रॉयचा ब्रम्हास्त्र मधला छतावरचा प्रसंग आठवत राहतो) त्यातून तिघांना कळते की, सुपरमॅनला त्याच्या जैविक आई-वडिलांनी त्याला पृथ्वी "जिंकण्यासाठी" पाठवले होते, मानवांची मदत करण्यासाठी नाही (इथे थोडीशी सुपरमॅनच्या मूळ संकल्पनेपासून ट्विस्ट घेतलेली दिसते). ल्यूथर हा संदेश जगभर प्रसारित करतो, ज्यामुळे लोकांचा सुपरमॅनवरचा विश्वास डळमळतो आणि त्याला धोकादायक एलियन मानले जाते.
ल्यूथर मेट्रोपोलिसमध्ये एका छोट्या मॉन्स्टरला सोडतो, जो प्रचंड भव्य कैजूमध्ये बदलतो. सुपरमॅन त्याला शांतपणे थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु "जस्टिस गँग" कैजूला हिंसकपणे नष्ट करतात, ज्यामुळे सुपरमॅन नाराज होतो. आता हा आपला कैजू भाऊ म्हणजे डायनासोरची दुसरी आवृत्तीच असतो जणू! म्हणजे मिनी जुरासिक पार्क पाहिल्याचे समाधान!
अल्ट्रामॅन आणि सुपरमॅनची हवेतली मारामारी बघताना सारखी क्रिश मधली रितिक रोशन आणि विवेक ओबेरॉयच्या हवेतल्या मारामारीची आठवण येते. आणखी अनेक प्रसंगात क्रिश मधल्या दृश्यांची आठवण येते.
सुपरमॅनला सरकार आणि ल्यूथर पकडतात आणि एका कृत्रिम पॉकेट डायमेंशनमध्ये कैद करतात, जिथे क्रिप्टो आणि मेटामॉर्फोचा मुलगा देखील बंदी आहे. ल्यूथर सुपरमॅनला नष्ट करण्यासाठी क्रिप्टोनाइट तयार करतो. पुढे ल्यूथरचा बोराव्हियाशी संबंध काय आहे ते कळते. लोईस आणि मिस्टर टेरिफिक हे सुपरमॅन, क्रिप्टो आणि मेटामॉर्फोच्या मुलाला सोडवतात, परंतु यामुळे एक ब्लॅक होल निर्माण होते जे मेट्रोपोलिसला धोका निर्माण करते. ल्यूथरला सुपरमॅनला पराभूत करण्याची इतकी जबर इच्छा आहे की तो ब्लॅक होल बंद करायला नकार देतो, ज्यामुळे शहर दोन भागात विभागले जाते. पुढे काय होते त्यासाठी हा चित्रपट बघायला हवा. या चित्रपटातील क्लायमॅक्स आणि अनेक सीन्स यातील स्पेशल इफेक्ट हे दर्जेदार आहेतच, परंतु प्रत्येक प्रसंगाचा स्क्रीनप्ले वेगळ्याच पद्धतीने लिहिला गेला असल्यामुळे मी जशी कथा एक्सप्लेन करून सांगतो आहे त्यावरून तुम्ही जी दृश्यांची कल्पना केली असेल त्यापेक्षा पडद्यावर बघताना तुम्हाला वेगळेच अनुभव येईल.
पॉकेट डायमेंशन बघताना थोडी थोडी कल्की चित्रपटांमधील दृश्यांची आठवण होते.
पोस्ट क्रेडिट सीन्समध्ये सुंदर आणि सौष्ठवपूर्ण शरीराच्या सुपरगर्लचे दर्शन घडते, जी सुपरमॅनची कझिन (चुलत बहिण) असते. आता प्रश्न असा पडतो की क्रिप्टॉन ग्रह नष्ट होताना आई वडील फक्त एकुलता एक वाचलेल्या मुलाला पृथ्वीवर पाठवतात तर मग एक अजून एक कझिन कुठून येते? असो!
सुपरमॅन एक एलियन असूनही मानवतेच्या मूल्यांना स्वीकारतो. चित्रपटात त्याच्या क्रिप्टॉनियन वारशाचा आणि त्याच्या मानवी संगोपनाचा समतोल दाखवला आहे. सुपरमॅनची दया आणि नीतिमत्ता त्याची सर्वात मोठी शक्ती आहे, जी तो युद्ध आणि ल्यूथरच्या योजनांविरुद्ध वापरतो. चित्रपट समाजमाध्यमांवरील खोट्या बातम्या आणि सामाजिक तणाव यांसारख्या आधुनिक समस्यांवर भाष्य करतो. सुपरमॅनला त्याच्या क्रिप्टॉनियन पालकांच्या संदेशामुळे स्वतःच्या हेतूवर प्रश्न पडतात, परंतु तो पृथ्वीवरील आपल्या कुटुंबाच्या मूल्यांनुसार जगण्याचा निर्णय घेतो.
चित्रपटाने जगभरात 220 दशलक्ष डॉलर्स कमाई केली, ज्यात युनायटेड किंगडम, मेक्सिको आणि चीनसह अनेक देशांमध्ये चांगली कामगिरी केली. तथापि, काही बाजारपेठांमध्ये (उदा. चीन) सुपरमॅनच्या अमेरिकन देशभक्तीच्या प्रतिमेमुळे त्याला कमी यश मिळाले. चित्रपटाने डीसी युनिव्हर्सच्या एक संपूर्ण नवीन युगाची सुरुवात केली आहे आणि पुढील चित्रपट, जसे की सुपरगर्ल (2026) साठी मार्ग मोकळा केला आहे. सुपरमॅन (2025) हा चित्रपट डीसी कॉमिक्स युनिव्हर्सच्या भविष्यासाठी आशादायक सुरुवात करून संपतो.

Comments
Post a Comment