इलेव्हन चिकी जिलबी माफ
नाव वाचून दचकलात? चार चित्रपटांचे काही शब्द वापरून एकत्र केलेले हे नाव आहे. गेली दोन तीन वर्षे झाली, चित्रपट परीक्षण लिहिले गेले नव्हते. मी ओटीटीवर गेल्या चार पाच महिन्यात काही चित्रपट बघितले. त्याबद्दल लिहायचे मनात होते पण जमले नाही. आज म्हटलं सिने रसिकांना त्यापैकी चार चित्रपटांबद्दल सांगावं! हे सर्व अलीकडचे चित्रपट आहेत आणि आपणही जमेल तसे बघावेत. चौघे ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर आहेत.
तर त्यापैकी पहिला आहे तमिळ आणि तेलगू भाषेत स्वतंत्रपणे एकाच वेळेस शूट झालेला "इलेव्हन" हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट, जो हिंदीतून उपलब्ध आहे. मी अभद्र शिव्या असलेले आणि रक्तरंजित हिंसाचार असलेले क्राइम चित्रपट आणि वेब सिरिज कधीही बघत नाही. मात्र इलेव्हन हा चित्रपट तसा नाही. एका नवोदित लोकेश नावाच्या डायरेक्टरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातील सर्वात चांगली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे दमदार कथा. ज्याला कोणाला ही अफलातून कथा कल्पना सुचली, त्याला खरंच हॅट्स ऑफ! बऱ्याच काळानंतर असा कोणता इंटेलिजंट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहिला. चित्रपटात शेवटी शेवटी अनेक ट्विस्ट येतात परंतु ते आपल्याला पटतात कारण ते ओढून ताणून टाकलेले नाहीत. या चित्रपटात खऱ्या जीवनातील 65 जुळ्या व्यक्तींनी काम केले आहे. युनिक वाटतं आहे ना? नक्कीच, आणि कथा सुद्धा तेवढीच युनिक आहे. चित्रपटातील फ्लॅशबॅक खूप लांबलचक आहे, पण तो तेवढा आवश्यक होता हे नंतर कळते. शेवटची लिफ्ट जवळची बंदूक फेकण्याची ट्विस्ट तर बापरे, लय भारी!
आता दुसरा एक हिंदी चित्रपट आहे "भूल चूक माफ", ज्याची मध्यवर्ती कल्पना जरी नवीन नसली (टाईम लूप मध्ये फसणे) तरी चित्रपटाचा हिरो ज्या कारणामुळे टाईम लूप मध्ये फसतो ते कारण मात्र युनिक आहे. "विकी वेलिंगकर" या जूनियर सोनाली कुलकर्णी अभिनित मराठी चित्रपटात ही कल्पना वापरली गेली आहे. भूल चूक माफ चित्रपटाच्या कथालेखकाच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते. चित्रपट पूर्ण सिरियस होऊ शकला असता परंतु त्या विषयाला विनोदात्मक पद्धतीने हाताळलेले आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट जास्त रंजक होतो. हा चित्रपट आपल्याला शेवटी खूपच चांगला सामाजिक संदेश देतो, संजय मिश्राच्या तोंडून! ("जैसे की मेरे पीछे वो!"डायलॉग फेम. ऑल द बेस्ट चित्रपट आठवत असेलच) स्त्री 1 आणि 2 चित्रपटातील राजकुमार राव हा हिरो "चॉकलेटी हँडसम हिरो" किंवा "सिक्स पॅक असलेला लार्जर दॅन लाईफ ऍक्शन हिरो" या दोन्ही प्रकारात मोडत नाही. तो पडद्यावर नेहेमी सामान्य मध्यमवर्गीय भूमिका साकारतो, जसे पूर्वी अमोल पालेकर वगैरे होते. तो चित्रपटात मध्यंतरानंतर रोज झोपेतून उठतो, तेव्हा लग्नापूर्वीचा हळदीचा दिवस पुन्हा पुन्हा येतो. 29 तारीख! लग्नाची 30 तारीख उजाडतच नाही. शेवटी त्याचे कारण समजते!
तिसऱ्या आणखी एका मराठी चित्रपटाबद्दल सांगतो, "जिलबी". सस्पेन्स थ्रिलर या जॉनर मधला. तुम्ही तुमच्या डोक्याला कितीही ताण दिला तरी मी ग्यारंटी देतो, तुम्ही यातला सस्पेन्स ओळखू शकणारच नाही. यात तर डझनभर ट्विस्ट आहेत. सर्वच कलाकारांची कामे चांगली झालीं आहेत. त्यातल्या त्यात प्रसाद ओकचा डबल रोल आणि पोलिस इन्स्पेक्टरच्या ग्रे शेड असलेल्या भूमिकेत स्वप्नील जोशी शोभतो. त्याला नेहेमी प्रेमी चॉकलेट बॉय भूमिका देण्यापेक्षा अशा रावडी टाईप भूमिका द्यायला हव्यात. शिवानी सुर्वे आणि स्वप्नील जोशी यांचा अगदी शेवटचा वाढीव क्लायमॅक्स प्रेक्षकांची चित्रपटाची संपूर्ण समज उलटी पालटी करून टाकतो. धूम टू मधला ऋतिक ऐश्वर्याचा पावसातला बास्केटबॉल जुगलबंदी सीन त्यानिमित्ताने आठवला. मराठी चित्रपटात असा कल्पक सीन हाताळण्याबद्दल अभिनंदन. सुरुवातीला नामावलीमध्ये पर्ण पेठे हे नाव वाचले होते व बराच चित्रपट पुढे सरकला पण ती कुठे दिसली नाही, म्हणून जेव्हा गुगलवर कास्ट शोधली तेव्हा कळलं की "ही" पर्ण पेठे आहे, इतका तिचा वेगळा गेटप या चित्रपटात आहे! या चित्रपटात अनेक उप कथानक आहेत, कुणाला ते आवडणार नाहीत पण त्यांचा स्क्रीनप्ले चांगला असल्याने ते चित्रपटात बेमालूम मिसळून जातात.
चौथा आहे, "चिकी चिकी बुबुम बूम" नानाचा एक विनोदी मराठी चित्रपट पाहिला जो बऱ्यापैकी मनोरंजन करतो आणि हसवतो. त्यात सर्व महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचे कलाकार आहेत. शाळेतले मित्र मैत्रिणी "काकाचा बंगला" मध्ये रियुनियन साठी जमतात पण तिथे सापडते "लाश" (तीसुद्धा वनिता खरात या जड व्यक्तीची) आणि मग सुरू होते त्या लाशची लपवालपवी. "एकदा येऊन तर बघा" हा चित्रपट पण अशाच थीमवर होता परंतु तो मला आवडला नाही. मी अर्ध्यात सोडून दिला होता. पण हा चित्रपट शेवटपर्यंत बघावासा वाटतो. प्राजक्ता माळीची टेन्शन आल्यावर बडबडत नाचण्याची लकब खूप भारी! प्रार्थना बेहेरेला कमी फुटेज मिळाले आहे. प्रसाद खांडेकरचा स्लॅपस्टिक कॉमेडी अभिनय चांगला झाला आहे. ती मराठीतली एक सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे, तिच्यात पोटेन्शियल आहे पण तिला निर्माते व्यवस्थित भूमिकेत कास्ट करत नाहीत, असे मला वाटते. "माझी तुझी रेशीमगाठ" या झी मराठीच्या सिरीयलमध्ये प्रार्थना बेहेरेला वाया घालवले आहे असं मला पर्सनली वाटतं. स्वप्नील प्रार्थना ही जोडी मला चांगली वाटते. "चांद थांबला" हे "बाई गं" मधले गाणे तर सर्वार्थाने खूपच सुंदर आणि चांगले जमून आले आहे. असो. "चिकी चिकी बुबुम बूम" मध्ये प्रसाद खांडेकर आणि प्रथमेश शिवलकर यांची कथा आहे तसेच सचिन गोस्वामी यांचा केमिओ (पाहुणे कलाकार) चांगला झाला आहे. विनोदासाठी म्हणून रामदास पाध्ये सदृश पात्र वापरून त्यांची खिल्ली उडवली गेली आहे. जसे एका संजय दत्तच्या एका विनोदी चित्रपटात चेतन आणि भगत नावाचे दोन पात्र असतात त्याद्वारे लेखक चेतन भगतची खिल्ली उडवली आहे.
Comments
Post a Comment