पुरीचा थाट
लाटण्याकडून ऐका कहाणी,
पुरी चपाती बहिणी बहिणी.
पुरी म्हणजे मेजवानी,
जिभेच्या सुखाची कहाणी!
कढईतील गरम तेलात,
सोनेरी रंगात तळपते.
गोल गिरकी घेते,
कधी तुपाने माखते.
गोल गोल पुरीबाई,
तळतांना फुगते.
बोटांनी टोचल्यावर,
खुदकन् फुटते.
गोल गोल फिरते,
ताटात जाऊन बसते.
पुरीच्या सेवनाने,
मन तृप्त होते!
पाणी पुरी, पालक पुरी.
तिखट पुरी, गोड पुरी.
नरम पुरी, गरम पुरी.
जाड पुरी, चपटी पुरी.
श्रीखंडाची लज्जत,
पुरीविना अपुरी.
नुसती खाल्ली जरी,
भूक शमते तरी.
कधी तिखट मसाला,
तर कधी जीऱ्याची साथ.
बटाट्याच्या भाजी सोबत,
जुळते माझी बात!
खाणाऱ्याची भूक वाढते,
पुरी पडता ताटात.
छोले माझे बंधु भले,
उत्तर भारतीय थाटात.
शिरतो पुरीत शिरा,
जिभेवर शिरते पुरी.
अनेक पदार्थांची लज्जत,
पुरिविना अधुरी.

Comments
Post a Comment