पोस्टकार्ड


*पोस्टकार्ड* 

पहिले महायुद्ध सुरू होते. धुक्यात लपलेल्या ट्रेंचेस, गोळ्यांचा मारा, आणि तोफांच्या आवाजाने क्षणाक्षणाला पृथ्वी हादरू लागली होती. पहिल्या महायुद्धाच्या धगधगत्या रणभूमीवर, फ्रेंच सैनिक पियरे आणि जर्मन सैनिक हान्स हे दोन शत्रू एकमेकांच्या विरुद्ध उभे होते. 

पियरे एका लहानशा खंदकात लपला होता. त्याच्या हातात रायफल होती, पण मनात भीती आणि द्विधा मनस्थिती होती. दोन दिवसांपासून त्याने आपल्या घरून आलेले पत्र उघडले नव्हते. त्याच्या लहानग्या मुलीचा वाढदिवस होता, आणि त्या पत्रात तिचं चित्र असणार होतं. पण युद्धाच्या भीषणतेत, तो पत्र उघडण्याची हिम्मत करत नव्हता!

त्याच वेळी, काही अंतरावर हान्स देखील लपून बसला होता. त्याच्या खिशात एक पोस्टकार्ड होतं – त्याच्या आईने पाठवलेलं, ज्यावर लिहिलं होतं:

"माझ्या मुला, लक्षात ठेव, शत्रूही कोणाचं तरी मूल असतो!"

रात्र झाली. एक भयाण शांतता पसरली. पियरेने शेवटी पत्र काढले आणि हळूच उघडले. त्यात त्याच्या लहान मुलीने काढलेलं चित्र होतं – एका मोठ्या झाडाखाली दोन पक्षी एकमेकांच्या जवळ बसलेले. तिच्या निरागस लेखणीत लिहिलं होतं:

"बाबा, लवकर घरी ये. आम्ही तुझी वाट बघतोय."

पियरेचे डोळे पाणावले. त्याचवेळी एक हलका आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने बघितले, समोरच्या खंदकातून एक पांढऱ्या रुमालाने झाकलेला हात वर आला. तो हान्स होता. हान्सने हळूच तो पांढरा रुमाल हलवला.

पियरेने रायफल खाली ठेवली. त्याने हळूच खंदकाच्या बाहेर डोकावले. हान्सही हळू हळू समोर आला. दोघांच्या हातात त्यांच्या प्रियजनांची पत्रं होती.

“तुझ्याकडे कोणाचं पत्र आहे?” हान्सने थरथरत विचारलं.

“माझ्या लहान मुलीचं,” पियरेने ओलसर डोळ्यांनी उत्तर दिलं.

“आणि तुझ्याकडे?”

“माझ्या आईचं,” हान्स म्हणाला, पोस्टकार्ड पियरेला दाखवत.

दोघं काही क्षण शांत होते. हळूहळू, ते एकमेकांच्या जवळ आले. त्यांनी पत्रं बदलली आणि शांतपणे वाचू लागले.

हान्सच्या आईने लिहिलं होतं: 

"हान्स, कोणत्याही परिस्थितीत आपली माणुसकी हरवू नकोस."

पियरेच्या मुलीचं चित्र पाहून हान्सच्या चेहऱ्यावर हलकी हसू उमटले.

“पियरे, आपल्याला हे युद्ध जिंकायचं नाहीये, आपल्याला घरी पोहोचायचंय,” हान्सने थेट सांगितलं.

“हो. माझ्या मुलीला माझी गरज आहे. आणि तुझ्या आईला तुझी,” पियरेने उत्तर दिलं.

त्या रात्री, त्या दोघांनी एक अघोषित तह केला. ते शत्रू नव्हते, ते फक्त घर सोडून आलेले दोन मुलं होते.

पुढील काही दिवस, त्या दोघांनी शक्य तेवढ्या सैनिकांना जिवंत सोडण्याचा प्रयत्न केला. ते एकमेकांना इशारे करून गोळ्यांपासून वाचवत राहिले.

पण युद्ध कधीच कोणाचं ऐकत नाही. एका धगधगत्या सकाळी, हान्स आणि पियरेच्या युनिट्सना समोरासमोर उभं राहावं लागलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. हान्सच्या डोळ्यांत दुःख तरळलं, पियरेच्या चेहऱ्यावर शोक होता.

तोफांचा आवाज झाला. धुर आणि धुळीच्या जळमटात ते हरवले.

काही वर्षांनी - 

हान्सच्या आईच्या हातात एक पाकिट पडलं. फ्रेंच भाषेत लिहिलेलं पत्र होतं.

"प्रिय आई, तुमचा हान्स खूप शूर होता. तो शेवटपर्यंत माणुसकी जपणारा शत्रू होता. मी त्याचा मित्र पियरे. तो माझा शत्रू नव्हता, तो माझा भावासारखा होता. तुमचा मुलगा नेहमी माझ्या हृदयात जिवंत राहील!"

(ही कथा काल्पनिक आहे)

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली