पेपरच्या वेदना
रोज पहाटे तो उठतो,
शब्दांची शाल घेऊन बसतो,
छापायला लागतो दुःखाची कथा,
हिंसाचाराची, अन्यायाची व्यथा...
शहर जळतं, गाव रडतं,
कोणीतरी पुन्हा कोणाला फाडतं,
आणि तो मात्र निरुत्तर, शांत
त्याच्यावर ते वास्तव मांडलं जातं
कधी वाटतं, तो रडत असेल,
शाईच्या थेंबात अश्रू लपवत असेल,
किंवा रागाने आतून जळत असेल,
बोलू न शकणाऱ्या वेदना झेलत असेल...
कोण म्हणतं तो फक्त एक कागद आहे?
त्याच्यावर देखील जिवंतपणाचं सावट आहे!
त्याला माहीत आहे, शब्दांमध्येही भाव असतो,
ते वाचत तो करुण हसत असतो.
पण एक दिवस असा येईल
शब्दच बोलतील, गळून पडतील,
"बस्स झालं!" म्हणत पेपर आपोआप फाटेल,
दुःखाच्या ओझ्यानं तो स्वतःच जळेल...
तरी उद्या तो पुन्हा सकाळी येईल,
तसाच, शांत, पण आशेचा किनारा घेऊन येईल...
कारण त्याचं काम आहे आपल्याला सांगणं
आणि
आपलं काम आहे ते वाचून समजणं.

Comments
Post a Comment