अळी मिळी गुपचिळी

 


मध्यरात्रीच्या दाट अंधाराच्या छायेत अनेक अमानवी सावल्या खेळत होत्या. एकमेकांच्या कानात वेगवेगळे गूढ गुपित सांगत होत्या. असे गुपित जे फक्त त्यांच्या जगातील लोकांनाच माहीत होते. 


कोणत्यातरी एका सावलीने उत्साहाच्या भरात एक गुपित दुसऱ्या सावलीच्या कानात नेहमीपेक्षा जास्त जोराने बोलले. अर्थात तिथे कोणी माणूस असता तर त्याला ते ऐकू आले नसते. कारण ते साधेसुधे तुम्ही आम्ही बोलतो तसे शब्द नव्हते.


आणि त्यामुळेच त्यांची प्रवास करण्याची क्षमता अद्भुत होती. ते मोठ्याने बोलले गेलेले गुपित शब्द क्रमाक्रमाने एकामागोमाग एक असे प्रवास करत करत हवेतून, झाडांवरून, रस्त्यांवरून गावातील घरापर्यंत पोहोचले. 


टेलीकम्युनिकेशन आणि इंटरनेट मधला जसा आयपी ऍड्रेस असतो जो इंटरनेटच्या जागतिक भव्य महाजालातून नेमका विशिष्ट कॉम्प्युटर शोधून काढतो त्याप्रमाणे एक विशिष्ट घर ते शब्द शोधू लागले. एखादी अळी हवेतून उडत असताना कशी दिसेल त्याप्रमाणे ते शब्द एकापाठोपाठ एक जाऊ लागले. 


शेवटी एका बंगल्यापर्यंत ते शब्द पोहोचले. बंद असलेल्या एका खिडकीतून ती शब्दांची अळी आत शिरली. तिथून बेडरूममध्ये झोपलेल्या एका माणसाच्या डोक्यातून ते शब्द आत शिरले आणि मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये जाऊन बसले. 


थोड्यावेळाने तो माणूस घाम येऊन खाडकन जागी झाला, बेडवर उठून बसला आणि म्हणाला, "बापरे. किती भयानक स्वप्न दिसले मला! खरंच तसे घडले तर?"

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली