फुशारकी आणि बढाई यांच्याशी लढाई करायला वापरा तुमची हुशारकी



अग्निसाक्षी चित्रपटात नाना पाटेकरचा एक डायलॉग आहे की, "आपके बडे होने से, मैं तो छोटा नहीं हो जाता!" किती अर्थपूर्ण वाक्य आहे! पण फुशारकी आणि बढाया मारणारे लोक स्वतःला महान सिद्ध करण्यासाठी फक्त स्वतःची अवास्तव बढाई मारूनच थांबत नाहीत तर इतर लोक कसे कामचुकार आहेत, कोणीच काम करत नाही आणि माझ्याशिवाय सगळे कसे अडून जाते हे सांगतात आणि हे सिद्ध करण्यासाठी बिनधास्त खोट्या गोष्टींचा आधार घेतात.


आपल्याला रोजच्या जीवनात फुशारकी, बढाई, बडेजाव आणि शेखी मिरवणारे अनेक लोक भेटतात. व्यक्तिगत आयुष्यात असो किंवा मग समाजात आणि कार्यालयात असो! हे लोक सगळीकडे वावरत असतात. एखाद्या टीम मध्ये काम करत असतील, तरीही हे सगळ्या कामाचे श्रेय स्वतःकडे घेतात.


बढाई आणि बडेजाव हा कशाचाही असू शकतो. पैशांचा, केलेल्या कामांचा, लोकप्रियतेचा, आपल्या एखाद्या गुणाचा वगैरे. फुशारकी मारणारे अत्यंत त्रासदायक असू शकतात. त्यांना तुमच्याकडून काय हवे असते? त्यांना सर्वात प्रथम हवे असतात त्यांच्या बढाया ऐकणारे श्रोते किंवा प्रेक्षक! जेणेकरून ते लोक यांचा खोटा बडेजाव आणि अवाजवी कौतुक ऐकून घेतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला अहंकार कसा सुखावेल असे ते बघत असतात आणि आपण इतरांपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत, आपल्याशिवाय सगळी कामे कशी अडून राहतात, आपल्याशिवाय एकही पान हालत नाही अशी पुष्टी त्यांना वारंवार हवी असते. बरेचदा असे बढाया मरून यांना लवकर कुठल्यातरी उच्च पदावर जायचे असते, प्रमोशन हवे असते. पण लक्षात घ्या की, कितीही घोर कलियुग येऊ द्या पण सत्याला आणि प्रामाणिकपणाला पर्याय नाही.


यांच्या बढाया मुद्दाम किंवा अजाणतेपणी ऐकणाऱ्या प्रेक्षकांत आणि श्रोत्यांमध्ये काही लोकांना वस्तुस्थितीची कल्पना नसते त्यामुळे फुशारकी मारणारे लोक जे सांगतील त्याच्यावर लोकांचा प्रथमदर्शनी लगेच विश्वास बसतो. परंतु प्रेक्षकांत वस्तुस्थिती माहीत असणारे काही लोक उपस्थित असतील तर त्यांना या बढायांचा प्रचंड त्रास होतो. 


तुम्ही जर अशा बढाई मारणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर एक करा. तुम्हाला वस्तुस्थिती जरी माहीती असली आणि फुशारकी मारणारा स्वतःच्या बढाया मरण्यात दंग असला तरी तुम्ही तुमची हुशारकी वापरा. त्या व्यक्तीला विरोध करू नका. त्याच्या बढाई सोबत लढाई करू नका. बोलू द्या तो काय बोलतो ते. ऐकत रहा. हो हो म्हणा. उलट, तुम्ही स्वतः केलेले एखादे काम पण त्यांनीच केले असे असे क्रेडिट त्यांना द्या. ते जे सांगत आहेत त्याला आणखी सपोर्ट करा. असे केल्याने बढाई मारणाऱ्यात थोडी जरी संवेदनशीलता बाकी असेल तर तो व्यक्ती ओशाळेल आणि पुन्हा असे करणार नाही. 


पण सर्वच जण काही असे नसतात. तेव्हा अशा फुशारकी मारणाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आणून त्याची जाणीव करूनच द्यायलाच हवी.


खरे तर ज्यांना वस्तुस्थिती माहित नाही अशा श्रोत्यांना नंतर कधीतरी आपोआप वस्तुस्थिती माहित होते आणि मग अशा बढाई म्हणणाऱ्या लोकांची विश्वासार्हता कमी होत जाते. लोक यांना टाळू लागतात. पण नेहमीच असे घडेल असे नाही. कधी कधी श्रोते आणि प्रेक्षक हे नेहमी अंधारातच राहतात. त्यांच्यासमोर सत्यस्थिती कधी उजेडात येत नाही किंवा ते उजेडात येऊ नये असे प्रयत्न बढाई मारणाऱ्यांकडून होत असतात आणि हे मात्र योग्य नाही.


वस्तुस्थिती माहीत असतानासुद्धा जर त्यांच्या बढायांना तुम्ही नेहमीच सपोर्ट करत राहिलात तर तेही चुकीचे ठरते. त्यात तुम्हालाही दोष लागतो आणि इतर श्रोते व प्रेक्षकांचा रोष नंतर तुमच्यावर ओढाऊ शकतो की तुम्हाला सत्यास्थिती माहीत असताना तुम्ही आम्हाला सांगितले नाही आणि मग उगाचच कारण नसतांना तुमची विश्वासार्हता मात्र कमी होत जाते. 


मग इतर श्रोत्यांसमोर त्यांचा अपमान होऊ नये म्हणून नंतर एकांतात बढाई मारणाऱ्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून द्या की तुम्ही वस्तुस्थितीचा विपर्यास केला आहे, कृपया असे पुन्हा करू नका. तसेच प्रेक्षक आणि श्रोते असलेल्या लोकांना नक्की वस्तुस्थितीची जाणीव करून द्या. 


आपण केलेले काम लोकांसमोर मांडण्याची जरूर गरज भासते. पण त्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेणे आवश्यक नसते. भले थोडा उशीर होईल परंतु तुमच्या कामाची दखल जरूर घेतली जाईल. पण म्हणून बढाई आणि फुशारकी समर्थनीय नक्कीच ठरत नाही.

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली