जगातील सर्व मराठी भाषा प्रेमी मंडळींसाठी आनंदाची बातमी काल आली आहे. मराठी भाषेने अभिजात भाषा दर्जा प्राप्त करण्यासाठीचे सगळे निकष पूर्ण केले असून केंद्र सरकारने घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला सुद्धा आता अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आपणा सर्वांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. 2012 सालापासून प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती. त्यांनी सातत्याने पुरव्यासहित सिद्ध केले आहे की, मराठी भाषा ही 2500 वर्षे जुनी असून ती महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी पासून प्रचलित होती. मराठीत प्राचीन साहित्य उपलब्ध असून इतर भाषेतून काहीही उसने घेतले नसून मराठीला अस्सल साहित्यिक परंपरा आहे. तसेच मराठी भाषा ही स्वयंभू असून इतर कोणत्याही भाषेपासून तिची उत्पत्ती झालेली नाही. आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी!
• अभिजात म्हणजे क्लासिकल हा शब्द भाषांसंदर्भात पहिल्यांदा युरोपमध्ये 19 व्या शतकातील लॅटिन आणि ग्रीक या भाषांसाठी वापरण्यात आला, कारण या भाषा युरोपातील अनेक आधुनिक भाषांच्या जन्मदात्री आहेत. तसेच अभिजात या शब्दाचा अर्थ कालवाचकसुद्धा आहे. त्यामुळे प्राचीन कालपासून अस्तित्वात असलेली भाषा असा सुद्धा याचा अर्थ होतो.
• अत्यंत गोडवा असलेली मराठी भाषा आता देशातील 11 अभिजात भाषांपैकी एक झाली आहे. आतापर्यंत संस्कृत, तमिळ, कन्नड, तेलुगू , मल्याळम, ओडिया यांना हा दर्जा मिळालेला आहे आणि 3 ऑक्टोबर 2024 घटस्थापनेच्या दिवशी मराठीसोबत पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस आता मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
• आज सुमारे 13 कोटी लोक मराठी बोलतात. मराठी ही जगातील 7000 भाषांपैकी पहिल्या 20 भाषांमध्ये सामील आहे ही एक अभिमानाची बाब आहे. मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे आणि जगातील 72 देशात ती बोलली जाते. मराठीच्या माहिती असलेल्या (ज्ञात) एकूण 52 बोलीभाषा आहेत आणि त्याही सर्व तेवढ्याच समृद्ध आहेत.
• मराठी भाषेचे वय किमान 2500 वर्षे आहे. 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्याची सुरुवात करण्याचे श्रेय महानुभाव व वारकरी पंथाकडे जाते. चौथ्या शतकापासून उपलब्ध असलेल्या शिलालेखात "मऱ्हाटी" असा उल्लेख आहे. संत ज्ञानेश्वर आणि त्यापूर्वीही चक्रधर स्वामी यांची साहित्य मराठी भाषिकांना माहिती आहे. गुजराती चक्रधरांनी महाराष्ट्र ही कर्मभूमी मानली आणि मराठीला धर्मभाषेची प्रतिष्ठा दिली. शिवनेरीच्या नाणेघाटातील शिलालेख हा सुद्धा प्राकृतमध्ये आहे. पेशवाईत रचलेले पोवाडे व लावण्या या अस्सल मराठमोळ्या परंपरेची नाते सांगणाऱ्या आहेत.
• रंगनाथ पठारे समितीने एक हजारांच्या वर ग्रंथ, शिलालेख आणि ताम्रपट या सर्वांचा संदर्भ देत मराठीचा अभिजातपणा पुराव्यानिशी सिद्ध केला. मुळ विदर्भातील वाशिमच्या असलेल्या "गुणाढ्य" नावाच्या व्यक्तीने उत्तरेत जाऊन "बृहत्कथा" हा ग्रंथ प्राकृत भाषेत लिहिला. दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ग्रंथात अनेक प्रकरणे मराठी भाषेतील आहेत. तसेच श्रीलंकेत 2000 वर्षांपूर्वी "दीपवंश" आणि "महावंश" हे दोन ग्रंथ लिहिले गेले, त्यात अनेक मराठी भाषकांचा उल्लेख आहे. "गाथा सप्तशती" चा उल्लेख करताना हा प्राकृत साहित्यातील आद्य आणि अग्रगण्य ग्रंथ आहे असे अनेक संशोधक मानतात. जुन्नरच्या नाणेघाटात प्राचीन शिलालेख सापडला आहे तो ब्राह्मी लिपीत आणि प्राकृतमध्ये आहे. 2220 वर्षांपूर्वीच्या या शिलालेखात मराठी बोलणाऱ्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
• संस्कृतपासून प्राकृत भाषा आली आणि त्यातून पुढे मराठी जन्माला आली हा एक गैरसमज असून त्याला पुराव्यासहित छेद दिला गेला आहे. प्राकृत, मराठी, महारठी, मरहट्टी, महाराष्ट्री आणि मराठी असे मराठी भाषेचे वेगवेगळे नामोल्लेख करण्यात आले तरी ती एकच भाषा होती आणि ती मराठी होती हे या अहवालाने स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment