तुम्ही निष्ठावान कर्मचारी शोधताय का?
प्रत्येकच कंपनीला आणि संस्थेला निष्ठावान, प्रामाणिक, मेहनती आणि आनंदाने काम करणारे कर्मचारी हवे असतात. पण एक लक्षात घ्या की, निष्ठावान कर्मचारी कुठेही आयते शोधून सापडत नाहीत. त्यांना निष्ठावान बनवावे लागते आणि त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींची गरज असते:
1. ओपन डोअर पॉलिसी: काम करतांना कोणतीही अडचण असल्यास ती निवारण्यासाठी व्यवस्थापक, पर्यवेक्षक किंवा त्यांच्याही वारिष्ठांकडे केव्हाही जाण्याची आणि आपले म्हणणे मांडण्याची कोणत्याही स्तरावरच्या सेवक किंवा कामगारांना मुभा असणे.
2. करियर डेव्हलपमेंट प्लॅन्स: प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नीट विचार करून बनवलेला त्याच्या करीयरच्या विकासाचा आराखडा वरिष्ठ आणि मानव संसाधन व्यवस्थापन विभागाकडे असला पाहिजे.
3. ऑपर्चुनिटी फॉर ग्रोथ: एखाद्या कर्मचार्याच्या अंगी तो सध्या करत असलेल्या कामापेक्षा वरच्या लेव्हलचे काम करण्याची क्षमता असल्यास ते ओळखून त्याला पुढे जाण्याची संधी निर्माण करणे.
4. झिरो मायक्रो मॅनेजमेंट: मायक्रोमॅनेजिंग बॉस अनेकदा त्यांच्या कर्मचाऱ्यांवर घिरट्या घालतात, प्रत्येक कृती आणि निर्णयाचे बारकाईने निरीक्षण करतात. ते कर्मचाऱ्यांच्या डेस्कजवळ सतत उभे राहून त्यांची प्रगती वारंवार तपासतात, ज्यामुळे कामाचे वातावरण गुदमरून जाते आणि कर्मचाऱ्यांना वाटते की त्यांना काम करण्याची स्वायत्तता नाही. मायक्रोमॅनेजमेंट हा लोकांना मॅनेज करण्याचा सर्वात वाईट, सर्वात हानीकारक आणि मनोबल कमी करणारा मार्ग आहे. कर्मचारी दीर्घकाळ टिकावा असे वाटत असेल तर मायक्रो मॅनेजमेंट बंद करावे.
5. विश्वास आणि स्वातंत्र्य: सिनियर मॅनेजमेंटला कर्मचाऱ्यांवर विश्वास असायलाच हवा आणि त्यांना काम करतांना पुरेसे स्वातंत्र्य दिलेच गेले पाहिजे.
6. आदरयुक्त, सहानुभूतीशील आणि आश्वासक वातावरण: सीनियर ज्युनिअर असा भेदभाव न करता एकमेकांविषयी आदर करण्याची आणि एकमेकांना सपोर्ट करण्याची संस्कृती जोपासायला हवी.
7. वर्क लाईफ बॅलन्स: कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाला आणि स्वतःसाठी द्यायला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे अशी व्यवस्था असली पाहिजे.
8. फेअर पेमेंट: कर्मचारी जे काम करतो त्यानुसार त्याला पुरेसा आणि वाजवी मोबदला दिला गेला पाहिजे, जेणेकरून त्याच्या गरजा भागू शकतील आणि तो आनंदाने काम करेल.
9. फ्लेक्सीबल वर्क ऑप्शन: कर्मचाऱ्यांच्या योग्य वैयक्तिक अडचणी लक्षात घेऊन जर वेळेबाबतीत किंवा कामाच्या ठिकाणासंदर्भात (घरून काम) जर कंपनीने थोडे लवचिक धोरण ठेवले तर कर्मचारी सुद्धा मग गरज पडल्यास कंपनीसाठी अर्जंट आणि जास्तीचे काम करायला सहज तयार होतो.
10. रीवार्ड आणि इतरांसमोर कौतुक: कर्मचाऱ्यांनी अपेक्षेपेक्षा चांगले काम केल्यास त्याबद्दल त्याचे योग्य ते कौतुक करणे आणि शक्य झाल्यास त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात रीवार्ड (भेटवस्तू किंवा पॉइंट्स, व्हाउचर वगैरे) दिल्यास तो कर्मचारी आणखी चांगल्या क्षमतेने काम करतो.
11. कामाचे सतत आणि योग्य मूल्यमापन: कर्मचाऱ्यांच्या कामाचे ठराविक काळानंतर नंतर विशिष्ट निकषांच्या आधारे मूल्यमापन करणे फार महत्त्वाचे असते. त्याद्वारे योग्य आणि मेहनती कर्मचारी ओळखला जाऊन त्याला रीवार्ड किंवा प्रमोशन देण्याचा विचार होऊ शकतो. मूल्यमापना दरम्यान कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ढासळलेली आढळल्यास त्याला रचनात्मक अभिप्राय (कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी काय करायला हवे याबद्दल मार्गदर्शन) देणे फार महत्त्वाचे असते.
12. क्लिअर कम्युनिकेशन: कर्मचाऱ्याला देण्यात येणाऱ्या कामाबद्दल अतिशय स्पष्ट आणि क्लियर शब्दात सूचना देणे आवश्यक आहे. तसेच टीम मध्ये सुद्धा एकमेकांशी बोलताना क्लिअर कम्युनिकेशन ची संस्कृती रुजवणे आवश्यक आहे.
13. ट्रेनिंग: ज्या गोष्टीत कर्मचारी कमी पडत असेल ते ओळखून त्याबद्दल त्याला ट्रेनिंग दिले तर तो अधिक चांगल्या रीतीने काम करेल.
वरील सर्व गोष्टी कंपनीकडून योग्य रीतीने पाळल्या गेल्यास कोणत्याही प्रकारचा कर्मचारी असो, तो कंपनीशी कायम निष्ठावान राहील.

अतिशय उत्तम लेख
ReplyDelete