मॅजिक ऑफ लॉस्ट टेंपल

 



"मॅजिक ऑफ लॉस्ट टेंपल" ही सुधा मूर्तीची कादंबरी खूपच छान आहे. मी हे पुस्तक तीन दिवसात वाचले. मी ते माझ्या मुलीसाठी विकत घेतले पण तिच्या आधी, मी कुतूहलाने ते वाचले आणि वाचन सुरू केल्यावर तीनच दिवसात पूर्ण केले. ते तुम्हाला नॉस्टॅल्जिक बनवते म्हणजे लहानपणीच्या आठवणी जाग्या करते. पुस्तकाचं वर्णन करायला शब्द नाहीत. शीर्षकानुसार वाटते की, हे पुस्तक फक्त एका हरवलेल्या (लुप्त झालेल्या) मंदिराविषयी आहे, ते तसे आहेच! पण प्रत्यक्षात ते केवळ एक मंदिर नसून एक भव्य पायऱ्या असलेली एक विहीर आहे आणि त्याच्या आजूबाजूला अनेक मंदिरे आहेत.

कृपया हे लक्षात घ्या की, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे पुस्तक केवळ मंदिराच्या शोधासाठी असेल अशी अपेक्षा करून हे पुस्तक वाचू नका. यात मंदिराचा शोध तर आहेच पण, मंदिर आणि त्याबद्दलच्या विविध दंतकथा आणि मग त्याचा शोध हे सगळे 60% पुस्तक संपल्यानंतरच कथेमध्ये येतात हे आधीच सांगून ठेवतो. पण त्यामुळे काही फरक पडत नाही. कारण, ही कथा आपल्याला भारतीय संस्कृती, परंपरा आणि विशेषतः दक्षिण भारतातील खेड्यातील लोकांचे जीवनमान आणि महत्व सांगते. 7 ते 17 वयोगटातील मुलांना सहज समजेल अशा पद्धतीने सर्व काही समजावून सांगितले आहे. या कादंबरीची नायिका एक किशोरवयीन मुलगी अनुष्का (उर्फ नूनी) आहे जी दोन महिने उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या आजी-आजोबांच्या सोमणहल्ली नावाच्या गावी जाते. तिथे तिला बंगलोरच्या चाकोरीबद्ध जीवनापेक्षा अतिशय वेगळे अनुभव येतात व नवीन माहिती मिळते, नवीन मित्र-मैत्रिणी मिळतात.

सुधा मूर्ती यांचे हे माझे इंग्रजीतील पहिले पुस्तक आहे. पूर्वी मी त्यांची बरीच पुस्तके वाचली होती पण सर्व मराठीत अनुवादित झालेली होती. त्यांचे इंग्रजीतील हे पहिले पुस्तक वाचल्यानंतर, प्रत्येकाने त्यांची पुस्तके इंग्रजीतच वाचण्याची मी शिफारस करेन कारण तरच तुम्ही लेखकाच्या कथाकथनाच्या ओरिजिनल सोप्या पण जादुई पद्धतीला अनुभवू शकाल आणि नक्की कौतुक कराल. मी भविष्यात त्यांची आणखी पुस्तके इंग्रजीतच वाचेन हे नक्की! त्यांची पुस्तके आपल्याला खूप काही शिकवतात. आपण वाचनात अगदी मग्न होतो. लेखिकेच्या लिखाणातला एकही शब्द अतिरिक्त किंवा निरुपयोगी नाही. प्रत्येक शब्द सुंदरपणे रचलेला आहे आणि जणू काही जादूने लिहिला आहे इतका परिणामकारक आहे. लहान-मोठ्या शहरातील प्रत्येक मुलाला हे पुस्तक दिले पाहिजे आणि ते नक्कीच वाचून प्रभावित आणि मंत्रमुग्ध होतील. अशी पुस्तके अधिक संख्येने आणि अधिकाधिक लेखकांनी लिहिली पाहिजेत, असे या निमित्ताने प्रकर्षाने वाटते. भाषा कोणतीही असो! एका मूळच्या मराठी भारतीय लेखिकेचे परक्या इंग्रजी भाषेवर इतके जादुई प्रभुत्व पाहून भारावून जायला होतं.

यात लेखिकेने समजायला कठीण असे अनावश्यक साहित्यिक शब्द वापरले नाहीत. जिथे आवश्यक तिथेच असे शब्द येतात जसे वस्तु, पदार्थ वगैरेची नावे जी तुम्हाला अपरिचित वाटू शकतात ज्याचा अर्थ तुम्ही मोबाईलमध्ये डिक्शनरीत सहज शोधू शकता. तुम्ही इंग्रजी भाषेचा प्रेमात पडाल असे हे पुस्तक आहे आणि आधीच इंग्रजी भाषेवर प्रेम करत असाल तर ते प्रेम आणखी वाढेल हे नक्की!

सुधा मूर्ती सारखे साध्या पण प्रभावी इंग्रजीत लिहिणारे आणखी अनेक लेखक आहेत जे मला आवडतात जसे इंग्लंडमधला डॅनियल हर्स्ट जो कथेतील विविध पात्रांच्या दृष्टीकोणातून थ्रिलर कथा लिहितो, अमेरिकेतील सिडनी शेल्डन (याला ओळखत नसेल असा भारतीय वाचक शोधून सापडणार नाही!), भारतातील चेतन भगत, सुदीप नगरकर आणि प्रीती शेनॉय वगैरे.
- निमिष सोनार, पुणे

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली