परतफेड
बंटी आणि बबली या सिनेमाच्या स्टाईलने अनेक दुकानदारांना लुबाडणाऱ्या काही जोड्या सक्रिय झाल्या होत्या. जोडीतील स्त्री इतरांना बोलण्यात गुंतवून पुरुष हातचलाखीने दुकानातील कॅश चोरायचा किंवा याच्या उलटसुद्धा व्हायचे. सीसीटीव्ही वरून लक्षात यायचे तोपर्यंत उशीर झालेला असायचा. या टोळीतील जोड्या वेश बदलण्यात वाकबगार होत्या. लूकआउट नोटीस जारी करूनसुद्धा फारसा फरक पडत नव्हता, कारण यांची वेश बदलण्याची किमया अद्भुत होती. प्रत्येक वेळेस या जोड्यांची वेशभूषा, केशभूषा आणि पेहराव वेगवेगळा असायचा. "धूम 2" मधल्या ऋतिक रोशनला या जोड्यांनी आपल्या आदर्श मानले होते. तसेच कमल हसनचा चाची 420, अशी ही बनवाबनवी, गोविंदाचा आंटी नंबर वन, आयुष्यमान खुराणाचा ड्रीम गर्ल, रूप की रानी चोरों का राजा अशा चित्रपटांनी ही टोळी प्रभावीत झालेली होती.
चोरी करून उरलेल्या रिकाम्या वेळात अशाच प्रकारचे चित्रपट ही मंडळी बघत बसायची, हसायची आणि जेवण करून झोपी जायची. त्यांची राहण्याची ठिकाणे सुद्धा ते बदलवत राहायचे.
बरेचदा जोडीतील पुरुष हे स्त्रीचा वेश धारण करून आपली चोरी करायचे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आवाज बदलणे, इतरांच्या आवाजाची नक्कल करणे या पद्धतींचा सुद्धा ते वापर करायचे. प्रत्येक वेळेस यांची चोरीची पद्धत वेगवेगळी असायची. कोणत्याही दोन चोरीमध्ये सारखेपणा नव्हता. त्यामुळे पोलिसांना यांना शोधणे अवघड जात होते. अर्थात पोलीसही यांच्या मागावर हात धुवून लागलेच होते. पत्रकारांनी बातम्या छापताना या जोडींना "जोडी 420" असे नाव दिले होते.
टीव्हीवर आणि वर्तमानपत्रांमध्ये ह्या बातम्या नेहमी प्रसारित व्हायच्या. त्यामुळे तसे दुकानदार सावध होतेच. आधी या जोड्या सकाळी फिरायला येणाऱ्या स्त्री नागरिकांचे मंगळसूत्र चोरून पसार व्हायच्या. चोर जोडी मधील स्त्री, फिरायला येणाऱ्या वृद्ध किंवा तरुण स्त्रीला बोलण्यात गुंतवायची आणि त्यांना बेसावध करायची. मग तिचा दूर मोटरसायकल थांबवून उभा असलेला पुरुष जोडीदार पटकन वेगात गाडी चालवून महिलेचे मंगळसूत्र ओढायचा आणि तो स्त्री पटकन त्या माणसाच्या मागे बसून दोघे पसार व्हायचे. या सर्व जोड्या अतिशय चपळ होत्या. त्यानंतर हळूहळू यांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरून दुकानदारांना लुटायचा धंदा सुरू केला.
पुण्यातील "सवाई बंधू डायमंड अँड ज्वेलर्स" चा मालक मंदार याला कामानिमित्त नेहमी त्याच्या मर्सिडीज कारने अनेक शहरात प्रवास करावा लागायचा. अनेकदा सोबत कॅश, सोन्याची बिस्किटे किंवा किमती हिरे त्याच्यासोबत असायचे. बहुतेक वेळेस प्रवास करताना तो सोबत आपल्या सख्ख्या भावाला न्यायचा परंतु अनेकदा असे प्रसंग यायचे की जेव्हा त्याला एकट्याने प्रवास करावा लागे. त्यामुळे रीतसर लायसन्स घेऊन तो नेहमी एक बंदूक सोबत बाळगायचा. पुण्यात सहा ठिकाणी या ज्वेलर्सच्या शाखा होत्या.
मंदार हा इतरांना खूप मदत करणारा व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता. देवाने आपल्याला खूप संपत्ती दिली आहे. त्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी शक्य होईल तेवढा करावा असे त्याचे विचार होते. अनेक अनाथालय, मराठी शाळा यांना नियमित देणगी तर विविध हॉस्पिटल्सना तो गरिबांच्या उपचारासाठी मोफत रक्कम दरवर्षी द्यायचा आणि त्याचा विनिमय योग्य कारणांसाठी होत आहे की नाही, हे तो आवर्जून स्वतः जातीने खात्री करून घ्यायचा. शनिवारवाड्याजवळ एका तीन मजली भव्य बंगल्यात मंदार, त्याचा भाऊ आणि कुटुंब राहत होते. वडिलांनी आपला पूर्ण बिजनेस आपल्या दोन्ही मुलांवर सोपवला होता.
जुलै महिन्याचे दिवस होते. थोडा भिर भिर पाऊस येत होता. सकाळी पुण्यातील पर्वती जवळ असलेल्या आपल्या भव्य शोरुमकडे जाण्यासाठी लक्ष्मीनगर रोडवरून मंदार आपली कार चालवत होता. रोज सकाळी आपल्या कोणत्याही कामाला निघताना मंदार आधी "श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे" दर्शन घेऊन मगच निघायचा. आजही त्याने तसेच केले होते. समोर त्याला गर्दी दिसली. त्यांनी गाडी थांबवली आणि गर्दीच्या मधोमध बघितले असता कुणीतरी वेगवान कारने सायकलवर जाणाऱ्या माणसाला ठोकरल्यामुळे तो बिचारा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, परंतु जिवंत होता. ती कार वेगाने पुढे निघून गेली होती. काही जणांनी त्या गाडीचा नंबर लिहून ठेवून पोलिसांना कळविले होते. बघ्यांची गर्दी फोटो काढत होती, इकडे तिकडे बघत होती, चर्चा करत होती परंतु कोणीही त्या माणसाला मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते. पोलीस येथील तेव्हा येथील परंतु त्यांची वाट बघताना या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय उपयोग? असा विचार करून, मंदारने पटकन निर्णय घेतला. त्या माणसाला आपल्या गाडीत टाकले, गर्दीतल्या एका समंजस माणसाला सोबत कारमध्ये बसवले आणि "सुमंतराव गाडगीळ" हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पोलीस आल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवावे असे त्यांनी तिथल्या गर्दीला सांगितले.
त्या माणसाचे ऑपरेशन करावे लागले. ऑपरेशनचा पन्नास हजार रुपये खर्च मंदारने केला. त्यानंतर त्या माणसाचा बारावीत शिकणारा मुलगा आणि पाचवीत असणारी मुलगी हॉस्पिटलमध्ये आले. त्या माणसाचे नाव होते दगडू. पर्वतीच्या पायथ्याशी एका मातीच्या घरात तो राहायचा. मोलमजुरी करून आपले पोट भरायचा. त्या माणसाची पत्नी काही महिन्यांपूर्वीच आजाराने वारली होती. दोन्ही मुले आईला पारखी झाली होती. आईचे या दोघा मुलांवर जीवापाड प्रेम होते. दगडूने मंदारचे खूप आभार मानले. त्या दोन्ही मुलांनासुद्धा रडू आवरत नव्हते. मंदार जणू काही त्यांच्यासाठी देव म्हणून अवतरला होता. काही वेळाने आलेल्या पोलिसांनी मंदारचे आभार मानले. डॉक्टरांनीसुद्धा मंदारचे खूप खूप आभार मानले. थोडा वेळ हॉस्पिटलच्या बाहेर मंदार पोलिसांसोबत शहरात वाढलेल्या चोरीच्या घटनांबद्दल बोलत राहिला. पोलिसांनीसुद्धा त्याला या चोरांना पकडण्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नाबद्दल थोडक्यात माहिती दिली. शोरूममध्ये मंदार उशिरा पोहोचला खरा, परंतु त्याच्या मनावर आज एक वेगळेच समाधान होते. आजही आपण कुणाच्यातरी उपयोगी पडलो ही भावना त्या मागे होती.
काही दिवसानंतर मंदारला मुंबईत जायचे होते. "पुणे ज्वेलर्स असोसिएशनचा" अध्यक्ष असल्याने त्याला मुंबईत होणाऱ्या अखिल महाराष्ट्रातील ज्वेलर्स असोसिएशनच्या मिटींगला हजर राहण्यासाठी पुण्याचा प्रतिनिधि म्हणून बोलावले होते. त्याच्या आधी एक दिवस मुंबईतील मोठा उद्योगपती "कमलेश वीरचंदानी" याने आपल्या मुलाच्या आगामी भव्य लग्नसोहळ्या निमित्ताने दहा डायमंड नेकलेस आणि वीस डायमंड रिंग यांची ऑर्डर दिली होती. शोरूम मधील कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती होती, परंतु ही ऑर्डर कधी आणि कशी डिलिव्हर करायची याबद्दल अजून ठरले नव्हते.
इतर कोणाच्याही भरवश्याने ही ऑर्डर डिलिव्हर करणे धोक्याचे होते आणि वीरचंदानी याने सक्त ताकीद दिली होती की स्वतः मंदारनेच ऑर्डर त्यांच्यासाठी घेऊन यावी. फक्त घरच्या निवडक मंडळींना सांगून ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मंदार स्वतः कारने संध्याकाळी सहा वाजता आपल्या बंगल्यातून निघाला. त्याच्या भावाकडे पुढील काही दिवस पुण्यातील सर्व शोरूमची जबाबदारी होती. सकाळी त्याची पुणे ज्वेलर्स असोसिएशन सोबत बैठक झाली त्यामुळे त्याला निघण्यासाठी संध्याकाळ झाली.
मंदारसोबत त्याची लाडकी बंदूक होतीच. वीरचंदानी फक्त आजच रात्री मुंबईत होता. फक्त त्याची ऑर्डर डिलिव्हर करणे हे एकमेव कारण नसून आजच वीरचंदानी याला भेटणे जास्त महत्त्वाचे होते, कारण दुबईवरून भारतात आलेल्या तीन बड्या उद्योगपतींची वीरचंदानीच्या ओळखीने मंदारला आठ डायमंड रिस्ट वॉचेस (हिऱ्यांचे मनगटी घड्याळ) ची ऑर्डर मिळणार होती. त्या निमित्ताने जुहू येथील "गोल्डन प्लाझा" या हॉटेलमध्ये वीरचंदानी याने डिनर पार्टी आयोजित केलेली होती. मंदारचा बिझनेस चांगलाच वाढणार होता. काही वर्षांपूर्वीच ज्वेलरी बिझनेसमध्ये विविधता आणण्यासाठी "टाईमलेस प्लानेट" नावाच्या स्वित्झर्लंडमधील घड्याळ कंपनीशी मंदारने टाय अप केलेले होते.
अर्धा रस्ता पार केल्यावर लागणाऱ्या हॉटेलमध्ये नाश्ता करून मंदार पुढच्या प्रवासाला निघाला. रस्त्यात पाऊस सुरू झाला. आकाशात ढग जमा झाले असल्याने वेळेच्या आधीच खूप अंधार झाला. पुढे ट्राफिक जाम दिसायला लागले. चौकशी केली असता कळले की दरड कोसळली आहे. जवळपास एक तास मंदार तिथे थांबून होता. याबद्दल घरी पुण्यात आणि मुंबईत वीरचंदानी असे दोन्हीकडे मंदारने फोनवरून परिस्थितीची कल्पना दिली.
क्रेन बोलावून आणि विविध उपकरणांद्वारे दरड बाजूला करून ट्राफिक मोकळा होण्यास रात्रीचे साडेदहा वाजले. आता पुन्हा नेहमीप्रमाणे ट्रॅफिक सुरळीत झाली. मंदार पुन्हा आपल्या मार्गे निघाला. मंदारच्या समोर तीन कार होत्या. त्या वेगाने पुढे निघून गेल्या. घाटामध्ये आता जास्त वर्दळ नव्हती. गाडीच्या समोरच्या काचेवर वायपर्स एकसारखे पावसाचे पाणी पुसण्याचे काम करत होते. पाऊस आता खूप मुसळधार नसला तरी संततधार पडतच होती.
पावसापासून बचावाचे सगळे साहित्य मंदारकडे गाडीत उपलब्ध होते. घाटातील रस्त्यावर बराच काळ आणि बरेच अंतर मंदार एकटा होता. इतर वाहने उशीर झाल्यामुळे चिडून घाईने निघून गेली. एखाद दुसरे तुरळक वाहन आजूबाजूला पुढे मागे दिसत होते. उजव्या बाजूला दरी होती आणि डाव्या बाजूला मोठा डोंगर होता. साडेअकरा पर्यंत नक्की मुंबईला पोचू शकणार होता. त्यामुळे मुंबईत वीरचंदानी आणि दुबईतील पार्टी वाट बघत हॉटेलमध्ये थांबणार होते. मंदारने त्यांना जेवून घ्यायला सांगितले होते. मंदार कधीही वेगाने गाडी चालवत नसे. उशीर झाला तर हरकत नाही परंतु एक्सीडेंट करून स्वतःच्या किंवा इतरांच्या नाशाला कारणीभूत व्हायचे नाही!
उजव्या बाजूच्या दरीमधून एका स्त्रीचा आधी कपाळ, मग चेहरा आणि हात, थोडा थोडा वर आला आणि हळूहळू संपूर्ण स्त्री घाटावरील रस्त्यावर चढली. ती एक सुंदर, पंचविशीत असलेली स्त्री होती. तिने हिरव्या जरीची गुलाबी साडी घातली होती, ज्यावर हिरवी पिवळी फुले छापली होती. ती वेगाने मंदारच्या कारसमोर येऊन उभी राहीली आणि "वाचवा वाचवा" असे दोन्ही हात वर उंचावून ओरडायला लागली. पावसाचे थेंब ओघळत असलेल्या समोरच्या काचेतून मंदारला ती स्त्री अस्पष्ट दिसली. त्याला गाडी थांबवावीच लागली कारण ती स्त्री मंदारच्या गाडीच्या एकदम समोर येऊन उभी ठाकली होती. मंदारच्या मागची वाहने बघून न बघितल्यासारखी करून पुढे निघून गेली.
ती स्त्री कारचा उजव्या बाजूचा काच हाताने जोरजोरात ठोकू लागली. या स्त्रीला मदतीची आवश्यकता आहे असे मंदारला वाटले, त्याने सीट बेल्ट काढला, बाजूच्या सीटवर पडलेला रेनकोट अंगावर चढवला, टॉर्च घेतली आणि कार रस्त्याच्या बाजूला एका सुरक्षित ठिकाणी झाडाखाली उभी करून, व्यवस्थित लॉक करुन, तो उजव्या बाजूने दरवाजा उघडून खाली उतरला. त्या स्त्रीच्या अंगावर, हातावर आणि चेहऱ्यावर किरकोळ जखमा होत्या. तिचे लांब केस विस्कटलेले होते. डोके ओले झालेले होते. संपूर्ण साडी ओली होऊन अंगाला चिटकलेली होती.
मंदार खाली उतरताच ती स्त्री मोठमोठ्याने अधाशासारखी ओरडून सांगू लागली.
"मला मदत करा. आमचा एक्सीडेंट झाला आहे. माझे मिस्टर खाली दरीमध्ये एका झाडाला अडकले आहेत. याआधी मी दोन-चार गाड्यांना हात दिला पण कोणीही थांबले नाही. तुम्ही थांबलात देवासारखे! चला या दरीमध्ये माझ्यासोबत, खाली उतरा आणि माझ्या मिस्टरांना झाडावरून वर ओढण्यास मदत करा. ते खूप जखमी झालेत!"
मंदारने थोडा विचार केला. समजा या स्त्रीचे ऐकून मी खाली गेलो. परंतु ही गाडी? गाडीला नीट लॉक केलेले आहेच. कुणी शस्त्र वापरून कारचे काच तोडून गाडीमध्ये प्रवेश मिळवला तर? गाडीत किमती वस्तू आहेत!!
"हे बघा, थांबा जरा. तुम्ही कोण? नाव काय तुमचे? तुमची गाडी कुठे आहे?", मंदारणे विचारले.
"मी... मी श्रीदेवी. उजवीकडे असलेल्या एका दगडावर धडकल्याने आमची गाडी खोल दरीत पडली. मी सीट बेल्ट लावला नव्हता, त्यामुळे डाव्या बाजूचा दरवाजा उघडला जाऊन डाव्या बाजूने खाली पडून मी वरच्या बाजूला एका खडकावर अडकले. पण माझे पती सीट बेल्ट काढेपर्यंत आणि उजव्या बाजूचा दरवाजा उघडेपर्यंत गाडी उलट पालट होऊन बरीचशी खाली गेली होती. त्यामुळे ते दरीत बरेच खाली एका झाडाला अडकले. मी हळूहळू दरीतून उतरून त्यांना आवाज दिला. त्यांनीही मला आवाज दिला. पण तिथे खाली उतरणे धोक्याचे आहे. चढ खूप उभट आहे. काहीतरी करा आणि माझ्या पतीला तिथून वर काढा. झाड फारसे मजबूत नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे! आमची. गाडी खाली दरीत कोसळून तिने पेट घेतला. आमचे दोघांचे मोबाईल फोन गाडीतच राहिले. ते गाडीसोबत खाली दरीत गेले."
मंदारला अचानक आठवले, "सध्या घडत असलेल्या घटनांनुसार ही स्त्री कोणी 'जोडी 420' पैकी एक तर नाही ना? मला खाली घेऊन जाऊन रस्त्यावरच कुठेतरी लपलेल्या हिच्या साथीदाराचा माझ्या कारमधील मौल्यवान गोष्टी चोरण्याचा डाव तर नाही ना?"
त्याने इकडे तिकडे नीटपणे बघितले. तसे कोणी दिसत तर नव्हते.
पण त्याचे दुसरे मन त्याला सांगू लागले, "नाही! संकटात अडकलेल्यांना मदत केलीच पाहिजे. मी ह्या मूल्यवान वस्तू कारमध्ये घेऊन जात आहे, हे फक्त घरातील निवडक लोकांनाच माहिती आहे. त्यामुळे इथे मला अडवून घातपाताची शक्यता तशी कमीच आहे. मला या स्त्रीला मदत केलीच पाहिजे! समजा खाली दरीमध्ये काही दगा फटका झालाच तर बेल्टला अडकवलेली बंदूक आहेच!"
विचारात गर्क झालेल्या मंदारला ती स्त्री पुन्हा म्हणाली, "कसला विचार करताय? चला माझ्यासोबत खाली!"
"अं हो हो! चला, चला...", विचारातून बाहेर येत मंदार म्हणाला.
दोघेजण सावधपणे आजू बाजूच्या खडक, दगड यावर हात अडकवत खाली सरकत जाऊ लागले. टॉर्चच्या उजेडाव्यतिरिक्त बाकी सगळीकडे अंधारच होता. तो स्त्री म्हणजे श्रीदेवी, मंदारच्या थोडे पुढे म्हणजे खाली चालत होती.
"या, असे इकडे माझ्या मागे!", असे म्हणत ती मंदारला बरीच खाली घेऊन आली. आजूबाजूला काटेरी झाडे झुडपे होती, थोडेफार अंगाला खरचटत होते. पण एकदा मदत करायची ठरवली, तर काही इलाज नव्हता.
अजून कितीही खाली बघितले तरी कुठेही झाड आणि त्यावर अडकलेला कुणी मनुष्य दिसत नव्हता. मंदारने एकदा वरच्या बाजूला वळून बघितले. रस्त्यावर झाडाखाली त्याची कार उभी दिसत होती. ते बघून त्याला हायसे वाटले. तो श्रीदेवीच्या मागोमाग जाऊ लागला. चहूबाजूंनी काळेकुट्ट डोंगर! चिडीचूप अंधार! आणि त्यात भिरभिर पाऊस. आता ती स्त्री बरचशी खाली गेली होती. ती आता मागे वळूनसुद्धा बघत नव्हती. फक्त पुढे पुढे जात होती. एका विशिष्ट ठराविक लयीनेच तिची हालचाल होत होती.
पावसामुळे वाट खूप निसरडी झाली होती. सांभाळूनच पाय ठेवावे लागत होते. त्याच वेळेस उजव्या बाजूच्या एका झाडावर एक सरडा डोळे रोखून मंदारकडे बघत होता. त्याच्याकडे बघून मंदारला भीती वाटली.
त्या स्त्रीची अचानक बदललेली हालचाल आणि लय पाहून एका क्षणी मंदारच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. नसत्या फंदात पडण्यापेक्षा आपण पुन्हा वर निघून जावे का, असा मंदारच्या मनात विचार येताक्षणीच त्या स्त्रीने खालून हाक मारली, "अहो, या लवकर!"
हा आवाज त्याला वेगळाच वाटला. एखाद्या रिकाम्या प्लास्टिक पाईपमधून आपले ओठ दाबून जर आपण बोलले तर कसा आवाज येईल, तसाच हा आवाज होता.
मंदार तिच्याकडे गेला. दोघेही आता समांतर चालत उतरत होते.
"यापुढे माझ्याकडून उतरणे शक्य होणार नाही. मला घसरण्याची भीती वाटते. तुम्ही थोडसं पुढे खाली जा आणि ते झाड दिसेल! तुम्हाला काही वस्तू लागतील तर मला सांगा मी येथून फेकते. मी लवचिक फांद्यांना एकत्र गाठ बांधून त्याला दोरीसारखे बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्याकडे फेकते!", श्रीदेवी म्हणाली आणि ती एका खडकावर उभी राहिली.
"ठीक आहे!", असं म्हणून मंदारने थोडी खाली झुकून बघितले आणि टॉर्चचा प्रकाश मारला. एक झाड दिसत होते. त्या झाडावर एक पांढरी आकृती लटकलेली दिसत होती. पाऊस सुरू असल्यामुळे नीट स्पष्ट दिसत नव्हते.
मंदार खाली उतरून त्या झाडाजवळ गेला. आपल्या हातातील टॉर्चचा प्रकाश त्या झाडावर त्याने मारला. दोन्ही पाय फांदीला अडकून दोन्ही हात आणि मान खाली अशा पद्धतीने तो माणूस अडकलेला होता. तो माणूस निश्चल होता. कसली हालचाल करत नव्हता. म्हणजेच तो बेशुद्ध झालेला असावा.
तेवढ्यात मंदारच्या मनात विचार आला, "शक्यच नाही! वरून पडून बेशुद्ध झालेला माणूस अशा पद्धतीने पाय फांदीला अडकवून झाडाला वेताळसारखा लटकून राहणे शक्यच नाही! हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय. इथून मला निघायला हवे!", असे म्हणून त्याने वर पाहिले, तर श्रीदेवी त्याला सफेद साडीत उभी असलेली दिसली. तिचा चेहरा विद्रूप झालेला होता. हाताची घडी घालून ती कुत्सितपणे हसत होती.
तेवढ्यात झाडाच्या फांदी वरून मोठ्याने हसण्याचा आवाज आला. त्या फांदीत पाय अडकवलेल्या माणसाने झोपाळ्यासारखी वर उसळी घेतली. आता त्याचे डोके वर आणि फांद्यांत अडकलेले पाय खाली अशी स्थिती होती. त्याचा चेहरा थोडाफार अनिल कपूर सारखा दिसत होता. मिशी तर हुबेहूब अनिल कपूर सारखी होती. त्या फांदीवरच्या माणसाने हवेत झेप घेतली आणि मंदारच्या दिशेने येऊ लागला. पटकन पळून बाजूला होणे शक्य नव्हते, नाहीतर पाय घसरून मंदार दरीत खाली पडला असता. त्या माणसाची आकृती धूसर, धुरकट आणि अस्पष्ट होती. घाबरून मंदारच्या हातून टॉर्च खाली पडला. टॉर्च घरंगळत जाऊन खोल दरीत खाली अंधारात गडप झाला.
त्याने जवळची बंदूक काढली आणि त्या आकृतीवर गोळ्या झाडल्या. पण त्या आकृतीवर बंदुकीच्या गोळ्यांचा काहीच परिणाम होत नव्हता. गोळ्या शरीरातून आरपार जात होत्या. मग त्याने वर उभे असलेल्या श्रीदेवीकडे गोळ्या घडल्या परंतु तिच्यावरही गोळ्यांचा काहीच परिणाम झाला नाही. बंदुकीच्या गोळ्या संपल्या. उरलेल्या गोळ्या गाडीत होत्या.
हा प्रकार बघून मंदार खूप घाबरला आणि पावसामुळे निसरड्या झालेल्या जागेवरून त्याचा पाय घसरला आणि तो दरीमध्ये खोल पडू लागला.
ती झाडावरची माणसाची अस्पष्ट आकृती दरीकडे मंदारचा हवेत पाठलाग करू लागली. त्या आकृतीला मंदारच्या शरीरात शिरायचे होते. हे बघून श्रीदेवी मोठमोठ्याने हसत होती.
दरम्यान, ग्रामीण भागात घालतात तशा पद्धतीने नऊवारी साडी घातलेली एक स्त्री कुठूनतरी तिथे अधांतरी तरंगत आली. तो अभद्र माणूस मंदारच्या शरीरात शिरण्याच्या बेतात असताना त्या नऊवारी साडीतील स्त्रीने त्या आकृतीला हवेतच एका हाताने पकडले. दुसऱ्या हाताने तिने मंदारला पकडले आणि मोठ्या खडकावर एका सुरक्षित जागेत नेऊन अलगद ठेवले.
मग हवेतच त्या दोन आकृतींचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले. पाऊस सुरूच होता. दोन्ही बाजू तुल्यबळ होत्या. त्या नऊवारी साडीतील स्त्रीची आकृती आता आगीच्या लाटांसारखी झाली आणि माणसाची आकृती काळ्याशार कोळशासारखी टणक झाली. त्या नऊवारी साडीतील स्त्री आकृतीने स्वतःला त्या अभद्र माणसाभोवती लपेटून घेतले आणि वेगाने त्याला दरीत ओढत घेऊन गेली. त्या माणसाची आकृती जळत असलेल्या कोळशासारखी दिसत होती. जणू काही कोळशांनी बनलेल्या मनुष्याला आगीने बनलेल्या स्त्रीने लपेटले आहे. खोल दरीतील अंधारात त्या माणसाच्या शरीराचे जळते कोळसे गडप झाले.
मंदार उठून उभा राहिला. झाला प्रकार नेमका काय होता हे त्याच्या आकलनापलीकडचे होते. दरी चढून तो पुन्हा वर आला. श्रीदेवी कुठेतरी नाहीशी झाली होती. तो गाडीत बसला आणि गाडी चालवायला सुरुवात केली. गाडीतील सर्व मौल्यवान वस्तू जशाच्या तशा होत्या. झाला प्रकार कोणालाही सांगायचे नाही असे त्यांनी ठरवले.
उशीर झाला असला तरी मुंबईतील कार्यक्रम नेहमीप्रमाणे पार पडला. त्याला ठरल्याप्रमाणे ऑर्डर मिळाली. तसेच, वीरचंदानी ज्या वस्तू पण त्याला डिलिव्हर झाल्या. ठरलेली अखिल महाराष्ट्र ज्वेलर्स असोसिएशनची मिटींग यशस्वीरीत्या पार पडली.
पुण्याला परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री टीव्हीवर एक बातमी सुरू होती, जी मंदार बघत होता, "पोलिसांच्या पाठलागापासून बचावण्यासाठी 420 जोड्यांपैकी एका जोडीचा काही दिवसांपूर्वी मुंबई पुणे रस्त्यावरील घाटातून कार दरीत कोसळून मृत्यु झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणखी एका जोडीच्या मागावर पोलीस आहेत. त्यांना पकडल्यानंतर संपूर्ण टोळीबद्दल माहिती मिळेल आणि आणखी अनेक गोष्टी स्पष्ट होतीलच!"
मंदार विचार करू लागला, "म्हणजे दरीमध्ये भेटलेली ती जोडी त्या एक्सीडेंट झालेल्या जोडप्याचे भूत होते तर! त्या माणसाला माझ्या शरीराचा वापर करून पुन्हा चोरी करायला या जगात परत यायचे होते की काय? मी आणि त्याची जोडीदार स्त्री असे मिळून आणखी चोऱ्या करण्याचा त्याचा डाव असावा! मी पोलिसांना याबद्दल सांगितलेच पाहिजे! पण मला वाचवणारे ते नऊवारी साडीतील स्त्रीचे भूत नेमके कोण होते?"
दरम्यान, टीव्हीच्या उजव्या बाजूला असलेल्या खिडकीतील पडद्याआडून समाधानाने एका नऊवारी साडी घातलेल्या स्त्रीची आकृती मंदारकडे बघत होती. मंदारला मृत्यूच्या दाढेतून वाचवल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. तिथून ती निघाली आणि दगडूच्या घरी गेली. गाढ झोपलेल्या आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर तिने प्रेमाने हात फिरवला आणि विचार केला, "माझ्या मुलांना अनाथ न होऊ देणाऱ्या मंदारची मी परतफेड करू शकले याचे मला समाधान आहे!"

Comments
Post a Comment