पाऊस पाणी आणि वीज महामंडळ
पूर्वी लहानपणी खेड्यात राहायचो तेव्हा मुसळधार पाऊस आला की लाईट जायची. अधून मधून पुणे मुंबई सारख्या शहरांत कामानिमित्त गेल्यावर वाटायचे की या शहरांसारखी चमक धमक दुसरीकडे नाही. ही शहरे रात्री सुद्धा चमकत असतात. आता मोठे झाल्यावर नोकरी निमित्ताने पुण्यात राहायला आल्यावर लक्षात येत आहे की नुसता पावसाचा पहिला थेंब पडला तरी लगेच लाईट जाते. खेड्यात तरी मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर पाच दहा मिनिटानंतर लाईट जायची. त्यामुळे वीज महामंडळाने गेल्या 30-40 वर्षात खूप प्रगती केली असे वाटते.
विशेष करून उन्हाळ्यात विजेची मागणी जास्त असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेतली जाईल असे नाही. दिवसेंदिवस विजेचे भाव मात्र वाढत चालले आहेत. विजेचे बिल अव्वा च्या सव्वा वाढले आहे.
मला वाटते जितका काळ वीज खंडित राहील तेवढ्या काळासाठी विशिष्ट रक्कम ग्राहकांचे बिलातून वजा करण्यात यावी असा काहीतरी करार केला पाहिजे. कारण त्या दरम्यान लोकांचे जे काही नुकसान होते ते सुद्धा महत्त्वाचे आहे. आणि अजून एक! कोविड काळ संपला तरीही अजूनही वीज काही ठिकाणी अंदाजे मीटर रिडींग धरतात. मीटर रीडिंग घ्यायला कोणीही कर्मचारी येत नाही.
मध्यमवर्गीय लोक प्रामाणिकपणे विज बिल भरतात. काही ठिकाणी मात्र सर्रास वीज चोरी होते, अशांना कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याचा भुर्दंड मात्र प्रामाणिकपणे विज बिल भरणाऱ्यांना बसतो.
.png)
Comments
Post a Comment