आठवणींचे अवकाश
15 डिसेंबर 2022 ला प्रकाशित झालेले श्री. हेमंत बेटावदकर यांचे "आठवणींचे अवकाश" हे प्रवीण दवणे यांनी प्रस्तावना लाभलेले आणि विविध विषयांवरील 80 ललित लेखांचा समावेश असलेले पुस्तक गेल्या काही दिवसांत मी वेळ मिळेल तसे वाचून संपवले. एक सामान्य वाचक म्हणून या पुस्तकाबद्दल मला हे वाटले ते मी येथे लिहीत आहे. पुस्तकात दोन दोन पानांचे छोटे लेख आहेत पण तरीही त्या त्या विषयाबद्दल जे लेखकाला जाणवले ते कमी शब्दांतून वाचकांच्या मनात जसेच्या तसे उतरते. या आधीची लेखकाची दोन्ही पुस्तके, "काळ सुखाचा" आणि "माझं काय चुकलं?" मी वाचली आहेत व त्यांचे परीक्षण ही केलेले आहे.
"आठवणींचे अवकाश" हे सुद्धा "काळ सुखाचा" या पुस्तकाच्या धर्तीवर लिहिलेले आहे. मात्र तुलनेने या पुस्तकात सध्याच्या काळाच्या प्रसंगाचा उल्लेख जात आहे आणि लेखांची संख्या जास्त आहे. बहुतांश लेख हे लेखकाच्या बालपणीच्या आठवणी आहेत. तसेच खाद्य पदर्थांवरील लेख तुलनेने जास्त आहेत. अर्थात प्रत्येक लेखाला खान्देशचा (जळगांव) संदर्भ आहे. त्यामुळे खान्देशचे वाचक या पुस्तकाशी इतरांपेक्षा जास्त कनेक्ट होऊ शकतील. प्रत्येक लेख वेगवेगळ्या काळातील आहे. तसेच लेखाच्या शेवटी तारीख नसली तरीही त्याने फारसा फरक पडत नाही. आपल्याला लेखातील काळाचा सहजच अंदाज येतो.
लेखकाने यात अगदी विविध विषय हाताळले आहेत. म्हणजे, हॉटेलातील तसेच घरी बनवण्यात येणारे आणि दारावर विकायला येणारे विशिष्ट चविष्ट खाद्यपदार्थ आणि ते सर्व्ह करण्याच्या किंवा वाढण्याच्या (आणि खाण्याच्या सुध्दा) पद्धती, रांगोळी, पतंग, प्रसिद्ध बगीचे, तलाव, मंदिरे, सण, फुले, झाडे, पक्षी, महाप्रसाद, कोरोना, रानभाज्या, चहा, भाजी बाजार, भंगार बाजार, सिनेमा, अश्वत्थामा, पाळीव कुत्री ग्रेसी, पोस्टकार्ड, कंदील, पाऊस, सायकल, गायक, बँकेत काम करतानाचे किस्से, रिटायर्ड झाल्यानंतरचे अनुभव अशा एक ना अनेक रोजच्या जीवनातील साध्या विषयांना त्यांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. क्वचित एखाद्या सामाजिक घटनेचा पण त्यांनी आढावा घेतला आहे. प्रत्येक लेखातून त्यांची एक अनामिक हुरहूर जाणवते.
आपण तो विषय किंवा खाद्यपदार्थ आधी अनुभवला असो किंवा नसो, आपण लेख वाचतांना अक्षरशः त्यात गुंतून जातो आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला हमखास मिळतो.
खाद्यपदार्थांवरील लेखाबद्दल सांगायचे झाल्यास हे पुस्तक खवय्यांसाठी जळगावला गेल्यास खाद्य भ्रमंती साठी अगदी मार्गदर्शक ठरेल. कोणत्या ठिकाणी कुठल्या रस्त्यावर, गल्लीत किंवा चौकात कोणत्या हॉटेलमध्ये किंवा गाडीवर, कोणता खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे हे लेखकाने आवर्जून सांगितलेले आहे.
अर्थातच हे पुस्तक चुकवू नये असेच आहे. अर्थात सध्या ज्यांचे वय साधारण 40 च्या वर आहे असे वाचक यातील लेखांशी जास्त कनेक्ट होऊ शकतील. उदाहरण द्यायचे झाले तर आज ज्यांचे वय अंदाजे 12/13 वर्षे आहे त्यांनी तर पोस्टकार्ड काय असते हे पाहिलेले सुद्धा नाही. कदाचित पोस्टमन सुध्दा! त्यांच्या बालभारती च्या पुस्तकात असलेले पोस्ट बॉक्सचे लाल रंगाचे चित्र बघून माझी मुलगी मला विचारते, हे काय आहे? आणि ते कशासाठी असते? पुस्तकात त्याबद्दल माहिती दिलेली असते परंतु ती फक्त थियरी झाली. त्याचा उपयोग त्यांनी कधी केलेलाच नसतो. तीच गत पोस्टल स्टॅम्पबद्दल झाली आहे. तसेच मातीची चूल, रॉकेलचा कंदील, स्टोव्ह अशा गोष्टी पण कालबाह्य झाल्या आहेत. पूर्वी वीज, मोबाईल, टीव्ही, फोन, हे सगळे नव्हते तेव्हा लोक कसे काय राहत होते याची कल्पनासुद्धा आजची पिढी करू शकत नाही.

Click here to buy: https://amzn.eu/d/2mFAvz8
ReplyDelete