अनुभूती आणि इतर बंगाली कथा

"अनुभूती आणि इतर बंगाली कथा (सुमित्रा भट्टाचार्य यांच्या)" हा अनाहत प्रकाशनाचा कथासंग्रह स्वाती दाढे यांनी अनुवादित केलेला आहे. त्यांची स्वाक्षरी असलेले ही पुस्तक मागच्या वर्षी 2022 सप्टेंबर मध्ये मी विकत घेतले. पण काही ना काही कारणास्तव ते वाचायचे राहून गेले होते. स्वाती यांचेशी माझा व्हाट्सअपवर परिचय झाला होता आणि अधून मधून मराठी साहित्याबद्दल व्हाट्सअपवर अधून मधून संवाद होत असतो. 

डॉ. अपर्णा झा यांच्याकडे बंगाली भाषा शिकून त्यांनी इतर अनेक बंगाली साहित्य मराठीत आणले आहे. या पुस्तकात सुचित्रा भट्टाचार्य या बंगाली लेखिकेच्या कथा त्यांनी मराठीत अनुवादित केल्या आहेत. त्यातील काही कथा विविध दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या आहेत. 

मी कधीही बंगाली भाषा वाचली, ऐकली आणि लिहिली नसल्यामुळे अनुवादाबद्दल मी इथे काहीच भाष्य करू शकत नाही. परंतु स्वाती दाढे यांच्या बंगाली भाषेवरच्या प्रभुत्वाची पावती पुस्तकात दिलेली आहेच डॉक्टर अपर्णा यांनी! 

मात्र काही ठराविक वाक्यरचना वेगळ्या आहेत प्रत्येक कथेतील! म्हणजे क्रम उलट सुलट आहे क्रियापद आणि कर्म यांचा. अर्थात हे जाणूनबुजून केलेले असावे. विशिष्ट परिणाम साधण्यासाठी! असो.

पुस्तकाची शिर्षक कथा "अनुभूती" चांगली जमून आली आहे. मानवी भावनांचे सुरेख चित्रण त्यात आहे. मात्र कथा रंगात येत असताना अचानक संपली असे वाटते. दुसरी कथा "ओहोटी" ही कथा आपल्याला जीवनातील विदारक शक्यतेची जाणीव करून देते.

"तुतुल" कथेमध्ये मोठ्यांपेक्षा जास्त समजूतदार असलेल्या एका लहान मुलीची कथा आपल्याला वाचायला मिळते तर "ओढ" कथेमध्ये मामा भाचा यांची छोटीशी कथा आपल्याला शेवटी एक वेगळे तत्वज्ञान सांगते. 

"न उलगडलेेला त्रिकोण" ही लेखकाच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित कथा मला खूपच आवडली. एक कारण म्हणजे मी स्वतः लेखक आहे आणि दुसरे म्हणजे लेखकाने कितीही त्याच्या काल्पनिक कथेतील पात्रांचा वास्तव विचार करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तरीही वास्तवात कथेतील परिस्थिती आली असता तसेच घडेल असे नाही. त्यामुळे लेखक हा नेहमी शिकत असतो आणि माणसं पूर्णपणे समजणं हे लेखकाला शक्य नाही हेच खरे! पण या कल्पनेला छेद देणारी पुढची कथा "आरश्यातील मुख" जेव्हा मी वाचली तेव्हा वाटले की, नाही! लेखक एखाद्या काल्पनिक घटनेला पण अगदी वास्तविक न्याय देऊ शकतो. कारण ह्या कथेतील सर्व पात्रे जशी वागतात ती अगदीच वास्तववादी वाटतात. 

"कोणे एके दिवशी" ही कथा फॅन्टसी प्रकारातली वाटते. दूरचा दृष्टीदोष असणाऱ्या अनिरुधाचा चष्मा तुटतो आणि मग काय होते ते या कथेत वाचायला मिळते. "तिसरे हृदय" या कथेत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने सतत व्यस्त आणि धावत राहणाऱ्या माणसासाठी घोड्याचे उदाहरण देऊन चांगले तत्वज्ञान सांगितले आहे. "दरबारी कानडा" हे नाव कथेला का दिले आहे मला कळले नाही परंतु त्यात नुकतच लग्न झालेल्या मुलीचे आणि तिच्या वडिलांचे नाते यात छान दाखवले आहे. "बोन्साय" कथेच्या शेवटचा अंदाज सहज लावता येतो आणि शेवटची "भार" ही कथा पण आपल्याला सुखद आणि दुःखद दोन्ही धक्के देते.

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली