आसरा



हा लेख "आसरा" या उत्तम चारोसकर यांच्या पहिल्याच फिक्शन (काल्पनिक) कादंबरीबद्दल आहे. लेखक उत्तम यांनी मनोगतात म्हटल्याप्रमाणे जास्त वाचन केलेला माणूसच चांगले आणि जास्त लिहू शकतो हे मला तंतोतंत पटते आणि ते शंभर टक्के खरे आहे. तसेच लिहिण्यासाठी आतून एक उर्मी असावी लागते जी माणसाला लिहिल्याशिवाय स्वस्थ बसू देत नाही. उत्तम यांच्यात अशी उर्मी आणि तळमळ पुरेपूर आहे हे त्यांचे पुस्तक वाचताना जाणवते. अक्षय कुमारच्या तलाश चित्रपटाची कथा त्यांनी लिहिली होती परंतु त्यांना त्याचे क्रेडिट मिळाले नाही हे ऐकून वाईट वाटले.

"आसरा" या कथेबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास, आपल्या भारत देशाला, भूमीला आपण असे भारत माता म्हणतो तसेच खेड्यातील लोक आपल्या शेतीला आईसारखे जपतात. अशाच एका शेताला आई मानणाऱ्या खेड्यातील कुटुंबाची ही एक कथा आहे. शंकरराव आणि त्यांचे कुटुंब. पत्नी शांता, मुलगी गौतमी आणि मुलगा विनायक. विनायक शालेय जीवनात असतांनाच त्याच्या आईचा मृत्यू होतो. विनायकच्या शिक्षणासाठी शंकररावांनी गावातील सावकाराकडून कर्ज घेतलेले असते. त्या गावात एक रॉबिन हुड असतो, म्हणजे शिरपा नावाचा दरोडेखोर! जो सावकारांना लुटून त्यांची संपत्ती गरीब लोकांत वाटतो.

शहरात राहणारे एक शिक्षक कुटुंब (देसाई) जे मूळचे खेड्यातले असून सध्या शहरात आहेत त्यांनी शंकररावांच्या मुलाची हुशारी ओळखून त्याला आसरा दिलेला असतो. त्याला ते शिक्षणात सर्वतोपरी मदत करीत असतात. खेड्यात शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांच्याकडे तो शहरात राहत असतो. शिक्षकांचा स्वतःचा मुलगा विजय मात्र अभ्यासात हुशार नसतो. त्यांना अजून दोन मुली असतात. त्यापैकी लहान नेहा सोबत एकाच कॉलेजमध्ये विनायक पुढील शिक्षण घेतो आणि दुसरी मोठी मुलगी वसूचे लग्न होते.

नंतर विनायकला शहरात चांगली नोकरी मिळते. शंकरराव विनायकच्या लहान बहिणीचे गौतमीचे लग्न करायचे ठरवतात. कालांतराने काही घटना घडतात आणि कथेत एका नवीनच मंजू नावाच्या स्त्री पात्राचा प्रवेश होतो. पुढील कथा अर्थातच मी सांगत नाही. ती तुम्ही पुस्तकात वाचालच!

संपूर्ण कथेमध्ये फारशा वाईट घटना घडत नाहीत. वाईट घटना लेखकाने जाणीवपूर्वक टाळल्या आहेत असे जाणवते. कथेचा नायक खूपच आदर्शवादी आहे. सत्तर ऐशीच्या दशकातील बॉलीवूड सिनेमातील नायक जसे होते तसाच हा कथेचा नायक - विनायक! या कथेचा प्रकार म्हणजे हम आपके है कोन, मैने प्यार किया, हम साथ साथ है, हमारा दिलं आपके पास है, हम आपके दिल में रहते हैं या प्रकारच्या कथांसारखा फिल गुड (Feel Good) स्वरूपाचा आहे. 

लहानपणी शेती राखण करताना विनायककडून एक चूक होते त्यामुळे वडिलांच्या धाकाने तो काही काळ नाहीसा होतो तो प्रसंग लेखकाने चांगला चितारला आहे. 

उत्तम यांची लेखन शैली बहुतांश वर्णनात्मक पद्धतीची आहे. कादंबरी अतिशय सोप्या भाषेत आणि ओघवत्या शैलीत लिहिली आहे. सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडत आहेत असे वाचताना जाणवते. लेखकाने अधून मधून सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान पण सांगितले आहे. आपण उपकाराची परतफेड केलीच पाहिजे असा संदेश कादंबरी देते.

खेड्यात थोडा पाऊस पडला की मातीचा छान सुगंध येतो तसा या पुस्तकातील लिखाणाला एक प्रकारचा ग्रामीण वातावरणाचा सुगंध आहे.

खालील तीन गोष्टींचा आणखी चांगला आणि जास्त उपयोग कथेत करून घ्यायला पाहिजे होता, असे मला एक लेखक म्हणून मला वाटते:

* देसाई सरांच्या शाळेतील राजकारण

* शिरपा दरोडेखोर आणि विजय हे दोन पात्र

लेखकाने ही कथा थोडी आणखी वाढवून, स्वतः पटकथा लिहून मराठी चित्रपट निर्मात्याला पाठवावी. यावर नक्की एखादा मराठी चित्रपट बनू शकेल.

एकूणच उत्तम चारोस्कर यांचा कादंबरी लेखनाचा हा पहिला प्रयत्न चांगलाच यशस्वी झालेला आहे आणि पुढील लेखनासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली