साप्ताहिके आणि मासिके यांचे युग संपले?
आज दुपारी "चित्रलेखा" कार्यालयातून मला फोन आला की तुमच्या उरलेल्या वर्गणीचे पैसे आम्ही परत करत आहोत कारण आम्ही चित्रलेखा साप्ताहिक बंद करतो आहे.
आजकाल छापील ऐवजी ईबुक वाचनात रस असल्याने क्षणभर असे वाटले की, फक्त छापील चित्रलेखा बंद झाले. पण नाही! डिजिटल चित्रलेखा पण बंद झाले आहे. म्हणजे काय की थोडक्यात चित्रलेखा मासिकाचे प्रकाशन पूर्ण बंद झाले आहे.
चित्रलेखा स्वतःची अशी एक वेगळी ओळख टिकवून होते. रंजक पद्धतीने आणि वेगळ्या धाटणीचे लेखन करून वाचकांना किचकट माहिती सोपी करून सांगणे हे चित्रलेखाचे वैशिष्ट्य होते, असे माझे मत आहे.
चित्रलेखा बंद झाल्याचा फोन आल्यानंतर मला राहवले गेले नाही आणि उत्स्फूर्तपणे हा लेख मी लिहिला!
काही वर्षांपूर्वी "लोकप्रभा" साप्ताहिक बंद झाल्याचे ऐकले. "झी दिशा" हे साप्ताहिक पण बंद पडले. मराठी साप्ताहिके, मासिके धडाधड बंद होत आहेत. हे ऐकून मन अस्वस्थ झालं. मनात अनेक मुद्दे उपस्थित झाले, अनेक प्रश्न पडले.
सखोल विश्लेषण असलेले लेख लोकांनी वाचणे बंद केले की काय?
1992 ला चित्रलेखाचा पहिला अंक मी लहान असताना वाचला होता, तेव्हापासून मी चित्रलेखाचा नियमित वाचक आहे. तसे मी लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, इंडिया टुडे, आऊटलूक वगैरे साप्ताहिके सुद्धा अधून मधून वाचतो.
तसा मी नियमित दिवाळी अंक सुध्दा वाचतो. पण तो स्वतंत्र विषय आहे. दिवाळी अंक वार्षिक असतात आणि त्याचे विषय वेगळे असतात.
लहानपणी एकदा "प्रगत विज्ञान" नावाचे मासिक मी लावले होते, खूप दर्जेदार होते पण आर्थिक पाठबळाअभावी ते बंद पडले असे कळले, तेव्हाही असेच अस्वस्थ वाटले!
असे म्हणतात, की सिनेमाची लांबी गेल्या अनेक वर्षात तीन तासांवरून दीड दोन तासांवर आली. याचा अर्थ काय की आज लोकांना वेळ नाही. चित्रपटापेक्षाही दोन चार मिनिटांचे व्हिडिओ बघणे आजच्या पिढीला आवडते. सगळं काही क्विक आणि इन्स्टंट! इन्स्टंट मॅगी, फास्ट फूड!
सखोल माहिती देणारे दर्जेदार मासिके आणि वर्तमानपत्र वाचण्याऐवजी लोकांना व्हाट्सअपवरचे अपूर्ण किंवा अर्धवट माहिती असलेले लेख वाचण्यात आणि फॉरवर्ड करण्यात इंटरेस्ट असतो.
सखोल वाचन आणि विचार करायला कुणाकडेही वेळ नाही. विविध न्यूज चॅनेलवरील आरडा ओरड करणाऱ्या न्यूज अँकरने बनवलेल्या तात्कालिक मतावर आज लोकांचे मत तयार होते. प्रत्येक न्यूज अँकर सुध्दा काही त्या विषयातील तज्ञ असतोच असे नाही. कुणी खोलात जाऊन त्यामागची कारणमीमांसा, पार्श्वभूमी तपासून बघण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळेच की काय एखाद्या ठिकाणी काही घटना घडली की लगेच जगभर विविध ठिकाणी त्याचे नकारात्मक पडसाद उमटायला सुरुवात होते.
मी तर म्हणतो पुढे वर्तमानपत्र देखील टिकतात की नाही हा प्रश्न आहे. असे होऊ नये म्हणजे झालं. बऱ्याच जणांकडे आज वर्तमानपत्र येत नाही. सगळे जण मोबाईल वर बातम्या वाचतात. तसेच वृत्तपत्राचा कागद महाग झाला आहे त्यामुळे आणि मागणी कमी त्यामुळे वर्तमानपत्र महाग झाले आहेत.
दहा मिनिटात झटपट बातम्या ऐकणे, प्रत्येक बातमी पाच ओळीत देणारे ॲप वाचत वाचत पटापट वर स्कॉल करणे असे सुपरफास्ट आयुष्य झाले आहे.
एक विचार मनात असाही येतो की, वृत्तपत्रांनी रविवारच्या पुरवण्यामध्ये भरगच्च मजकूर असलेले विविध विषयांवरचे लेख दिल्यामुळे तर साप्ताहिकांचे अस्तित्वच नष्ट झाले नसावे? कारण इतके डिटेल लेख पुरवण्यांमध्ये दिल्यानंतर साप्ताहिकात आणखी वेगळं काय वाचायला देणार? स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे हे झाले. विचार करा, एक उदाहरण देतो: "सकाळ" च्या रविवारच्या पेपरच्याच किमतीत "सप्तरंग" पुरवणी देण्याऐवजी त्याचे वेगळे पुस्तक रुपात साप्ताहिक करायला काय हरकत आहे?
बहुतेक साप्ताहिके ही वृत्तपत्रांच्याच मालकीची असतात.
जसे "लोकप्रभा" हे इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे आणि "साप्ताहिक सकाळ" हे सकाळ ग्रुपचे. इंग्रजीतल्या काही साप्ताहिकांची सध्या काय स्थिती आहे याची कल्पना नाही. उदाहरणार्थ आऊटलुक इंडिया टुडे वगैरे.
साप्ताहिकांसारखीच मासिकांची पण गत झाली आहे. मला वाटते मासिक हा प्रकार पण आता दुर्मिळ होत चालला आहे. लहान मुलांसाठी साप्ताहिक, मासिक ही कल्पना पण आता जवळपास बंद झाल्यात जमा आहे.
फिल्मफेअर सारखे मासिक पण आता बंद झाले. असो.
लेख इथेच संपवतो. नाहीतर लेख लांबतो आहे हे बघून तुम्ही पुढे वाचणारच नाहीत. इन्स्टंट आणि फास्ट फूड चा जमाना आहे ना!
- निमिष सोनार, पुणे
- (17 जानेवारी 2023)
#NimishLive

या विषयी मला माझा एक अनुभव इथं शेअर करावासा वाटतो..
ReplyDeleteहल्ली प्रत्येक जण वॉटसप, फेसबुक अशी समाज माध्यमं वापरतो..
परवा माझ्या कडे एका प्रतिथयश मासिकाचे प्रतिनिधी आले..त्या मासिकाचे सभासद वाढवण्याची जबाबदारी(की सक्ती?) त्यांच्या कडे होती.. ते मला विनंती करत होते की मी त्या नियतकालिकाची सभासद व्हावं... मला ते नियतकालिक परिचित होते....तरीही त्यांनी दिले म्हणून ते मासिक मी चाळले नुकतेच ते प्रकाशित झाले होते..
लेखकांची यादी वाचली आणि त्यांना म्हटलं...
यात साधारण वीसेक लेख आणि दहाबारा कविता आहेत.. पैकी आठदहा लेखक/कवी माझ्या फेसबुकवर मित्रयादीत आहेत ते सगळे आणि बाकीचे काही माझ्याशी वॉटसपवर संपर्कात असतात..आणि ज्या दिवशी तुमचा अंक प्रकाशित झाला त्याचदिवशी हे सगळे लेख/कविता मी फेसबुकवर आणि वॉटसपवर वाचलेले आहेत.. आणि पर्यायाने ते माझ्या संग्रही आहेत.. मला हवं तेव्हा ते वाचताही येणार आहेत.. असं असताना मी तुमच्या मासिकाची वर्गणी का भरु?
त्यांनी ही वस्तुस्थिती स्वीकारली..
मी असा विचार केला.. वाचक कमी होत चालले आहेत.. खप होत नाही ही गोष्ट अगदी खरी..पण मग ती फक्त वाचकांची/प्रकाशकांचीच जबाबदारी आहे का?
हे लेखक/कवी आपलं साहित्य ज्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात येतं त्या नियतकालिकाची विक्री वाढावी म्हणून काही प्रयत्न का करत नाहीत?
निदान आपले प्रकाशित लेख/कविता जर त्यांनी असं समाजमाध्यमावर अग्रेषित न करता केवळ नियतकालिकाचे आणि लेखाचे शीर्षक , विषय जर वाचकांना सांगितला तर काही वाचक तरी (लेखकांवरील प्रेमाखातर) ते नियतकालिक विकत घेतील...
सविता कारंजकर, सातारा ९९२२८१४१८३
सुंदर विश्लेषण
ReplyDelete