झपुर्झा म्युझियम

पुण्यातील शिवाजीनगर येथून 22 किमी आणि खडकवासला धरणापासून 8 किमी अंतरावर कुडजे गावात "झपुर्झा" हे कला व संस्कृती संग्रहालय वसलेले आहे. आपण इतिहास, कला व संस्कृती यांचे चाहते असाल तर हे म्युझियम बघायलाच हवे. पुण्यातील केळकर म्युझियममध्ये जर तुम्ही तासनतास घालवू शकत असाल तर इथेही तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता. मी 24 सप्टेंबर 2022 या तारखेला ह्या म्युझियमला भेट दिली. येथे एकूण 10 कलादालने म्हणजे आर्ट गॅलरीज आहेत. तसेच एक एम्फीथिएटर आहे. तिथून आपल्याला खडकवासला धरणाच्या पाण्याचे सुंदर दृश्य दिसते.


येथील प्रत्येक गॅलरी ही वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली आहे. प्रवेशद्वारावरच आपल्याला आत असलेल्या दर्जेदार संग्रहाची जणू काही झलक मिळते. प्रवेश केल्यानंतर गॅलरीतील लाईट्स बंद करून दोन ठराविक चित्रांचा एक अनोखा पाच मिनिटांचा 3D शो दाखवला जातो ज्यात चित्रातले तीन वेगवेगळे भाग तुकड्यांनी भिंतींवर दिसतात, ते विविध दिशेने फिरत जाऊन त्यानंतर एकत्र येऊन चित्रात मिसळतात आणि जणू काही ते चित्र तिथेच तयार झाले असा अनुभव आपल्याला मिळतो.

चित्रकला विभागामध्ये राजा रविवर्मा, बाबुराव पेंटर यांची चित्रे, जय भीमसेन जोशी यांची मॉडर्न आर्ट सदृश चित्रे, तसेच जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथील विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, जुन्या काळातील मासिकात छापून येणाऱ्या जाहिराती तसेच सिनेमाची पोस्टर्स, वगैरे असे विविध भाग आहेत.

जुन्या काळातील दिवे यांचे स्वतंत्र दालन, वस्त्रकथी म्हणजे टेक्सटाइल विभाग ज्यात विविध पैठणी आणि साड्यांचे प्रकार आहेत, सोन्या चांदीच्या दागिन्यांशी संबंधित वस्तू संग्रह वगैरे असे विविध विभाग आहेत.

या म्युझियमचे आणखी एक उल्लेख करण्याजोगे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गॅलरीमध्ये माहिती सांगण्यासाठी गाईड उपलब्ध आहेत. गॅलरीतील संग्रहाबद्दल आपल्याला ते सगळी माहिती देतात. आपण विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे येथे मिळतात. येथे सर्व ठिकाणी फोटो काढायला परवानगी आहे, हे विशेष! म्युझियमच्या आजूबाजूचा परिसर तर निसर्गरम्य आहेच पण म्युझियमच्या आतमध्ये सुद्धा छोटे कृत्रिम धबधबे निर्माण करून तसेच विविध रोपटे लावून निर्माण करून म्युझियमची शोभा आणखी वाढवली आहे.

येथे रेस्टॉरंट तसेच कलात्मक वस्तू विक्रीचे एक दुकानही आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या कल्पनेतून हे म्युझियम साकारले गेले आहे. या म्युझियमबद्दल अधिक माहिती zapurza.org या वेबसाईटवर आपल्याला मिळेल. या म्युझियमचा तिकीट दर 100 रुपये आहे. एकूणच कला प्रेमींसाठी ही एक पर्वणी आहे.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली