ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे?
आयुष्यात तरुणपणाच्या नंतरची दशा आल्यावरही हिरोंच्या भूमिका करणे आणि एकापाठोपाठ एक चित्रपट करून सतत लोकांसमोर येत रहाणे यामुळे लाल बादशाह, बडे मियां छोटे मियां, अजूबा, कोहराम, मृत्यदाता, इंद्रजीत या सारखे चित्रपट फ्लॉप व्हायला लागले तेव्हा अमिताभने ब्रेक घेतला. नंतर कौन बनेगा करोडपती हा टिव्ही शो आणि मग मोहब्बते चित्रपटामधून वयाला साजेशी भूमिका स्वीकारून पुन्हा दमदार आणि यशस्वी पदार्पण केले. नंतर त्याचे अनेक चित्रपट हिट झाले. पण सध्या पुन्हा तो एकापाठोपाठ एक खूप चित्रपट स्वीकारून तीच चूक करतो आहे असे वाटते.
अभिनेत्रीबाबत बोलायचे तर माधुरी दीक्षित, श्रीदेवीबाबत तेच घडले. एकसारखे चित्रपट स्वीकारले आणि शेवटी फ्लॉप व्हायला लागले. पण गॅपनंतर माधुरी तिचा कमबॅक अजूनही यशस्वी करू शकली नाही. श्रीदेवी त्या प्रयत्नात होती पण तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हीच चूक आता अक्षय कुमार करतो आहे. शाहरुख पण तेच करत होता पण शहाणा होऊन त्याने मध्यंतरी ब्रेक घेतला. एकसारखे चित्रपट केले की अभिनयात तोच तोच पणा येतो आणि अभिनयाचा दर्जा खालावतो. सलमानचे पण तेच झाले आहे. त्या मानाने अजय देवगणने स्वतःच्या चित्रपटांचा वेग योग्य ठेवला आहे असे वाटते. मराठीबद्दल बोलायचे ते ही चूक सुबोध भावे करत आहे. एकच वेळेस खूप चित्रपट आणि मालिका तो करतो आहे. अर्थात जास्त चित्रपट स्वीकारण्यामागे आर्थिक गरज हा भाग पण असतो हे नाकारता येत नाही.
अर्थात अभिनेत्यांनी करियरचा ब्रेक इतकाही जास्त घेऊ नये की लोक वाट पाहून कंटाळतील आणि त्या अभिनेत्याला विसरून जातील. जसे मकरंद अनासपुरे, अंकुश चौधरी, गशमिर महाजनी, भारत जाधव, काजोल यासारख्या अभिनेत्यांनी जास्त चित्रपट करावे असे मला वाटते पण ते फारच मोजके चित्रपट करतात. हे सुध्दा करियर साठी मारक आहे.
काही बाबतीत आपल्या इमेजला शोभणार नाही असे आणि विसंगत चित्रपट स्वीकारणे हे सुध्दा मारक ठरते. हृतिक रोशन बाबत हेच झाले. कहो ना प्यार है हिट झाल्यावर फिझा, मिशन काश्मीर, मुझसे दोस्ती करोगे, यादे, काईट्स, मोहेजोदडो, आप मुझे अच्छे लगने लगे असे चित्रपट त्याने केले आणि ते फ्लॉप झाले. चॉकलेटी हिरोची इमेज त्याला शोभत नाही हे त्याला समजेपर्यंत खूपच उशीर झाला. मग क्रिश, कोई मिल गया, धूम 2, वॉर असे ऍक्शन चित्रपट करून त्याची गाडी रुळावर आली.

Comments
Post a Comment