बॉईज 3: धमाल विनोदी सफर

 


मला अनपेक्षितपणे बॉईज 3 PVR सिनेमा गृहात बघण्याचा योग आला आणि बॉईज 3 निर्मात्यांनी ह्या चित्रपटाचे दर 23 तारखेपासून (भारतीय सिनेमा दिवस) फक्त 100 रुपये केले आहेत. हा सिनेमा आधीच सुपरहिट झालेला आहे. त्या मानाने माझे हे परीक्षण उशिरा आले. आधी थोडक्यात कथेबद्दल सांगतो आणि मग इतर गोष्टींबद्दल चर्चा करू या. हा चित्रपट थोडासा "एडल्ट सेक्स कॉमेडी" या प्रकारात मोडतो. यात डबल मिनिंग डायलॉग्ज आहेत पण आधीच्या दोन्ही चित्रपटांपेक्षा बरेच कमी आहेत पण दादा कोंडके यांच्या चित्रपटाइतके जास्त नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर उगाडी, पनीर, पुरी, मेंदू, मोठे मन, माकड, नारळ, कवटी, धूमकेतू, दगड गौडा वगैरे. याचा संदर्भ चित्रपट पाहिल्यावरच कळेल.


या चित्रपटावर बद्रीनाथ की दुल्हनिया, मेरे ब्रदर की दुल्हन, क्या कुल है हम, हायवे, चेन्नई एक्स्प्रेस यासारख्या चित्रपटांची छाप आहे, हे जाणवते. या चित्रपटाच्या बजेटवर चांगलाच खर्च केलेला दिसतो. कुठेही तांत्रिक बाबतीत कमतरता जाणवत नाही. मराठी भाषेचा माज बेळगांव मध्ये नाही तर कुठे दाखवायचा हा डायलॉग पण यात आहे. शेवटच्या अर्ध्या तासात बरेच डायलॉग कन्नड भाषेत आहेत पण खाली मराठीत भाषांतर लिहून येते. ही एक पूर्णपणे प्रवासात घडणारी कथा आहे आणि प्रेक्षकांना कर्नाटकचे विहंगम दर्शन घडते. बॉईजचे तिन्ही भाग हिट ठरले आहेत. आजकाल मराठीत पण सिक्वेल हिट ठरत आहेत. दगडी चाळ 1 & 2, टकाटक 1 & 2, शिवराज अष्टक (आठ भाग) शिवप्रताप सीरिज (तीन भाग), टाईमपास 1, 2 & 3 वगैरे.

आता थोडक्यात कथा बघू:
हा चित्रपट बघण्याआधी बॉईज वन आणि टू बघितला असला पाहिजे. डायरेक्ट थ्री बघितला तरी हरकत नाही परंतु काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत. कथेत नेहमीचे तीन मित्र आहेत. त्यातील कबीरला कर्नाटकात कागदपत्रांवर सही करण्यासाठी जायचे असते. त्याच्या मावशीच्या सांगण्यावरून इच्छा नसतांना तो कर्नाटकात इतर दोन्ही मित्रांना घेऊन कारने जातो. वाटेत नारू भेटतो. ते नारूची गाडी चोरतात आणि नंतर एका लग्नात फुकट जेवतात. त्यामुळे त्यांच्या त्या प्रवासात पुढे अनपेक्षितपणे कीर्ती (विदुला) भेटते आणि ह्या तिन्ही "बॉईज" सोबत प्रवासात एक "गर्ल" सामील होते. ती कोण असते याबद्दलचे रहस्य आणि आणखी एक रहस्य आपल्याला शेवटी कळते. चित्रपट संपल्यावर अचानक एका नवीनच पात्राची एन्ट्री होते आणि बॉईज 4 च्या रिलीजची तारीख आपल्याला कळते आणि चित्रपट पुन्हा संपतो.

यात एकाहून एक अतरंगी पात्रे आहेत. नारू आणि त्याचा ड्रायव्हर मस्त. यात विद्याधर जोशी, शर्वरी जमेनिस, समीर चौघुले हे पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत. एन्ट्रीच्या वेळेस ओंकार भोजने (नारू भोंडवे) हा मकरंद अनासपुरे स्टाईलने का बोलतो ते समजत नाही. यात गिरीश कुलकर्णी पण असून त्याचेही सगळे द्वीअर्थी संवाद (डबल मिनींग डायलॉग) आहेत.

PVR ची साऊंड सिस्टीम मस्त असल्याने असल्याने मजा येते कारण या चित्रपटाचे BGM (बॅकग्राऊंड म्युझिक) भारी पण लाऊड तरीही सहन करण्याजोगे आहे. फक्त ते थोडे दाक्षिणात्य आणि अधून मधून पंजाबी पद्धतीचे वाटते.

विदुला चौघुलेचा हा पहिलाच चित्रपट. तीची एन्ट्री भारी आहे. "टाईमपास 3" मध्ये हृता दुर्गुळेने (त्यात ती एका डॉनची मुलगी असते) तिच्या इमेजच्या विरुद्ध, रावडी आणि टपोरी भाषा बोलली आहे (ती भूमिका ती अक्षरशः जगली आहे). तसेच बॉईज 3 मध्ये विदुलाने पण तशाच टपोरी भाषेचा वापर केला आहे (पण ती डॉनची नाही तर एका राजकारण्याची मुलगी असते). विदुला चौघुले ही भाग्यश्री पटवर्धन (मैने प्यार किया) सारखी साळसूद चेहऱ्याची (माझ्या मते) दिसते. पण पहिल्याच चित्रपटात तिला अगदी तिच्या आधीच्या मराठी मालिकांच्या इमेजच्या पूर्णपणे विरुद्ध भूमिका दिली गेली आहे. तसेच तिचे पाय लांब असल्याचा चित्रपटात वारंवार उल्लेख (इतर पात्रांच्या तोंडी) आहे आणि ते खरेच आहे कारण त्यातच तिची सेक्स अपील जास्त जाणवते.



"लग्नाळू" गाण्यात तर तिने जबरदस्त डान्स करून प्रचंड धमाल केली आहे. कॅटरीनाला पण मागे टाकले आहे.


लॉजिक आणि मेंदू बाजूला ठेऊन फक्त मनोरंजन आणि विनोद एन्जॉय करण्यासाठी हा सिनेमा नक्की बघा. अर्थात अशा प्रकारच्या चित्रपटांसाठी चित्रपटगृहात प्रवेश करतांना जसा थ्रीडी चष्म्याचा ट्रे घेऊन कर्मचारी उभे असतात तसे ट्रे घेऊन "आपापला मेंदू ट्रे मध्ये टाका आणि टोकन घेऊन आत जा" असे सांगणारे कर्मचारी उभे करायला पाहिजेत. घरी परत जातांना आपापला मेंदू परत घेऊन जा अशी आठवण अनाउन्समेंट करून द्यावी लागेल बहुतेक, नाहीतर मेंदू नसल्याने लोक मेंदू परत घ्यायला विसरून जातील. 😃

थोडे विषयांतर:
प्रत्येकाचं चित्रपटाच्या सुरुवातीला आणि मध्यांतरानंतर सिगारेट बिडी गुटका दारू यांचे दुष्परिणाम दाखवणारी एक फिल्म दाखवतात जे बघून लगेच मतपरिवर्तन होऊन खरंच कुणी हे सगळे खाणे सोडतो का हे माहीत नाही, पण जे बिचारे प्रेक्षक खात नाहीत त्यांना विनाकारण हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटमध्ये असल्याचा फील येतो. धडधडणारे हृदय जिवंत माणसाच्या शरीरात कसे दिसते, ओह नो! कॅन्सरवर जणू आपण पीएचडी करायला थिएटरमध्ये आलो आहे असे वाटायला लागते.

Comments

  1. अजून एक सिक्वेल राहिला - दे धक्का १, २

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली